आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताने जिनिव्हा येथे सुरू असलेल्या 77 व्या जागतिक आरोग्य संमेलनादरम्यान नॉर्वे, युनिसेफ, युएनएफपीए आणि पीएमएनसीएच यांच्या सहकार्याने महिला, बालके आणि किशोरवयीन यांचे आरोग्य या विषयावर एका विशेष कार्यक्रमाचे केले आयोजन
Posted On:
30 MAY 2024 5:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 मे 2024
सध्या जिनिव्हा येथे सुरू असलेल्या 77 व्या जागतिक आरोग्य संमेलनादरम्यान, भारताने नॉर्वे, संयुक्त राष्ट्र बाल निधी (युनिसेफ), संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी (यूएनएफपीए) तसेच माता, नवजात आणि बाल आरोग्यासाठी भागीदारी (पीएमएनसीएच) यांच्या सहकार्याने महिला, बालके आणि किशोरवयीन यांचे आरोग्य या विषयावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नवनवी माहिती आणि शोध सामायिक करणे, माता, नवजात, बालक आणि किशोरवयीन यांचे आरोग्य आणि कल्याण यांमधील गुंतवणूकीच्या महत्त्वाच्या संधींवर संवाद वाढवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. लोकसंख्येच्या विविध गटांच्या गरजांना प्राधान्य देत निरंतर आणि वर्धित गुंतवणुकीचे समर्थन करणे, विविध भागधारक आणि क्षेत्रांमध्ये धोरणात्मक समायोजन आणि त्याचे परिणाम सूचित करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

किशोरवयीनांच्या आरोग्यावर या कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला. यावेळी अनेक वक्त्यांनी किशोरवयीन आरोग्याच्या विविध पैलूंसह या क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्याची गरज असल्याचे मत मांडले. केंद्रीय आरोग्य सचिव आणि भारतीय शिष्टमंडळाचे प्रमुख अपूर्व चंद्रा यांनी भारताची या विषयावरील प्रगती आणि या संदर्भात भारताने घेतलेल्या उपक्रमांवर भर दिला.
चंद्रा यांनी महिला, बालके आणि किशोरवयीन मुलांचे आरोग्य आणि कल्याण यासाठी सक्रिय उपक्रम राबविण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. त्यांनी भारताचे पुनरुत्पादक आणि बाल आरोग्य (RCH) - I, RCH - II उपक्रम तसेच किशोरवयीनांच्या आरोग्यावर भर देणारे राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम यावर प्रकाश टाकला. टेलीमानस हा याच दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेला भारताचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

किशोरवयीन प्रेक्षक गटापर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य संवाद धोरणांचा वापर करण्याच्या गरजेवरही भारताने भर दिला. कोणत्याही कार्यक्रमाच्या नियोजन आणि अंमलबजावणीसाठी महत्त्वाचा भागधारक म्हणून युवा गट प्रतिनिधींच्या सहभागावरही यावेळी चर्चा करण्यात आली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव हेकाली झिमोमी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आणि व्यवस्थापकीय संचालक (एनएचएम) आराधना पटनायक तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2022213)