शिक्षण मंत्रालय

शिशुपूर्व देखभाल आणि शिक्षण (ईसीसीई) विषयक अधिक विस्तृत उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन

Posted On: 09 MAY 2024 4:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 मे 2024

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे आज शिशुपूर्व देखभाल आणि शिक्षण (ईसीसीई) विषयक अधिक विस्तृत उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालय राज्य सरकारे तसेच शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा-पायाभूत पातळी (एनसीएफ-एफएस) मध्ये संकल्पित केल्यानुसार, सुलभ स्थित्यंतर तसेच दर्जेदार ईसीसीईसाठी शालेयपूर्व आणि शालेय शिक्षणात सातत्य आवश्यक आहे.

याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना संजय कुमार यांनी, बैठकीचा संदर्भ मांडला आणि दर्जेदार ईसीसीई साध्य करण्यात प्रत्येक भागधारकाचे महत्त्व अधोरेखित केले. महिला आणि बालविकास मंत्रालय तसेच विविध राज्य सरकारे/ केंद्रशासित प्रशासने यासंदर्भात विविध उपक्रम हाती घेत आहे हे पाहून आनंद होत आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

इयत्ता पहिलीचा वर्ग सुरु असलेल्या सर्व सीबीएससी आणि केंद्रीय विद्यालयांमध्ये पूर्व प्राथमिक गटामध्ये 3 ते 6 वर्ष वयोगटासाठी तीन बालवाटीकांची गरज आहे यावर या बैठकीत अधिक भर देण्यात आला. शाळापूर्व पातळीवर योग्य शिक्षण मिळणे आणि इयत्ता पहिलीकडे सुरळीत स्थित्यंतर होणे यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या सहकार्यासह विकेंद्रीकृत पद्धतीने गावांमधील अंगणवाड्या  प्राथमिक शाळांसोबत ठेवण्याची सूचना यावेळी करण्यात आली.

सर्वांगीण शैक्षणिक अनुभवासाठी पूर्व-प्राथमिक वर्ग असलेल्या सरकारी शाळांमध्ये जादुई पेटारा या संकल्पनेचा वापर केला जावा अशी सूचना देखील या बैठकीत मांडण्यात आली. एनसीएफ-एफएस उद्दिष्टांशी अनुकुलता सुनिश्चित करण्याच्या हेतूने, सध्या प्रचलित असलेल्या शैक्षणिक खेळण्यांचे मूल्यमापन करण्यासाठी एनसीईआरटी ही संस्था राज्य सरकारमधील अधिकाऱ्यांसह एकत्र येऊन कार्य करू शकेल अशी सूचना देखील करण्यात आली.

पूर्व प्राथमिक ते इयत्ता पहिली या स्थित्यंतराचा मागोवा घेण्यासाठी पोषण ट्रॅकर आणि युडीआयएसई प्लस यांच्याकडील माहिती जोडून घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालय यांनी एकमेकांशी सहयोगी राखावा  अशी सूचना देखील यावेळी मांडण्यात आली. खरेदीतील पारदर्शकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने जादुई पेटारा उपक्रमासाठी आवश्यक साहित्य खरेदीच्या संदर्भात राज्य सरकार मापदंड निश्चित करू शकतील आणि आरएफपीएस म्हणजेच प्रस्ताव सूचनांचा वापर करू शकतील.

निपुण भारत, जादुई पेटारा तसेच विद्या प्रवेश यांसारख्या कार्यक्रमांच्या बाबतीत ब्रँडींगचे प्रमाणीकरण करण्यासंदर्भात देखील या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.

जादुई पेटारा उपक्रमाचे स्वीकारण्यात आलेले तसेच रुपांतरीत स्वरूप एनसीईआरटीने जादूई पेटारा साठी निश्चित केलेल्या विहित शैक्षणिक निष्कर्षांशी सुसंगत असावेत असे यावेळी सांगण्यात आले. विहित शैक्षणिक निष्कर्षांचे अनुसरण करण्यात एनसीईआरटीने एससीईआरटीला पाठींबा देणे अपेक्षित आहे.

या  बैठकीमध्ये शाळा-पूर्व स्तरावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या योग्य प्रशिक्षणाच्या गरजेवर देखील तपशीलवार चर्चा करण्यात आली.

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2020085) Visitor Counter : 52