संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बीआरओ अर्थात सीमा रस्ते संघटनेचा 65 वा वर्धापनदिन साजरा


देशाच्या सुरक्षिततेत महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल आणि सीमाभागात सामाजिक-आर्थिक प्रगतीची सुनिश्चिती केल्याबद्दल संरक्षण सचिवांकडून बीआरओची प्रशंसा

Posted On: 07 MAY 2024 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 मे 2024

सीमा रस्ते संघटनेचा (बीआरओ) 65 वा वर्धापनदिन आज, दिनांक 07 मे 2024 रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त संरक्षण सचिव गिरधर अरमाने यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांना संबोधित करताना संरक्षण सचिव अरमाने यांनी प्रतिकूल प्रदेशात आणि खडतर हवामानाच्या परिस्थितीत यशस्वीपणे जबाबदाऱ्या पार पाडल्याबद्दल बीआरओची प्रशंसा केली. देशाच्या दुर्गम भागात सामाजिक-आर्थिक प्रगती होईल याची सुनिश्चिती करतानाच सीमावर्ती भागात पायाभूत सुविधाविषयक प्रकल्पांच्या माध्यमातून देशाच्या संरक्षणात प्रमुख भूमिका निभावणारी बीआरओ ही अत्यंत महत्त्वाची संस्था आहे असे त्यांनी सांगितले.

कालबद्ध पद्धतीने प्रकल्प पूर्ण करत असल्याबद्दल बीआरओची प्रशंसा करत गिरीधर अरमाने यांनी हे कर्मयोगी विक्रमी वेळात सीमा भागातील पायाभूत सुविधांचा विकास सुनिश्चित करणे यापुढेही सुरु ठेवतील असा विश्वास व्यक्त केला. प्रकल्पांच्या जलद पूर्ततेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तंत्रांचा वापर करण्याचा आग्रह त्यांनी बीआरओच्या अधिकाऱ्यांकडे व्यक्त केला. असे केल्याने मानवी प्रयत्न कमी प्रमाणात करावे लागतील आणि त्यांचा वापर अधिक कार्यक्षमतेने करता येईल असे त्यांनी सांगितले. स्वयंचलीकरण तसेच यांत्रिकीकरण ह्या बाबी भविष्यात बीआरओसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतील असे ते म्हणाले.

सिलक्यारा बोगदा कोसळण्याची दुर्घटना आणि सिक्कीममधील महापुराच्या काळात मदत आणि बचाव कार्यात बीआरओच्या जवानांनी दिलेल्या अनमोल योगदानाचे देखील संरक्षण सचिवांनी स्मरण केले. ते पुढे म्हणाले की सीमेवरील निवडक गावांचा सर्वसमावेशक विकास साधण्याच्या संकल्पनेतून सुरु केलेल्या व्हायब्रंट गावे कार्यक्रमात देखील ही संघटना महत्त्वाची भूमिका निभावेल.

याप्रसंगी बोलताना, सीमा रस्ते विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन यांनी बीआरओमधील सर्व श्रेणींमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की संपूर्ण भारतभरात जाणवणाऱ्या बीआरओच्या उपस्थितीतून या संघटनेच्या राष्ट्रीय सुरक्षा, संपर्क आणि विकासाप्रति असलेल्या कटिबद्धतेचे दर्शन घडते. ते पुढे म्हणाले की, ‘आपल्या महान पर्वतांच्या शांततेमध्ये- कार्याचा आवाज येतो’ या आमच्या घोषवाक्यातून या संघटनेची समर्पण वृत्ती, चिकाटी आणि देशाच्या अतिदुर्गम कोपऱ्यांमध्ये राहणाऱ्या जनतेच्या जीवनावर संघटनेच्या कार्याचा प्रभाव यांचे दर्शन घडते. ‘कनेक्टिंग प्लेसेस,कनेक्टिंग पीपल’ म्हणजेच स्थानांना जोडण्यासोबतच, तेथील जनतेची मने जोडण्याच्या शपथेचा पुनरुच्चार करत राहून प्रगती, समृद्धी आणि एकतेचा शाश्वत वारसा निर्माण करण्याची विनंती त्यांनी सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांना केली.

या कार्यक्रमादरम्यान, सेला बोगद्यावर आधारित सारग्रंथ तसेच ‘उंची सडकें’, ‘पथ प्रदर्शक’ आणि ‘पथ विकास’ यांसारख्या काही पुस्तकांचे संरक्षण सचिवांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी, गिरीधर अरमाने यांच्या हस्ते बीआरओ कर्मचाऱ्यांना वर्ष 2023-24 साठीचे उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आले आणि संघटनेतील यशस्वी कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. सेला बोगदा उभारणीसारख्या विविध प्रकल्पांमध्ये काम केलेल्या तसेच सिक्कीममधील पुराच्या वेळी मदतकार्य केलेल्या हंगामी कामगारांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

1960 मध्ये केवळ पूर्वेकडील प्रकल्प टस्कर (आता वर्तक) आणि उत्तरेकडील प्रकल्प बीकन या  दोन प्रकल्पांसह सुरु झालेली  बीआरओ आज 11 राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये 18 प्रकल्पांसह कार्यरत असून  ती आता एक प्रभावी संस्था बनली आहे. उंचावर  आणि कठीण हिमाच्छादित भागात या संस्थेने आता आघाडीची पायाभूत बांधकाम संस्था  म्हणून आपली ओळख प्रस्थापित केली आहे.

बीआरओ प्रामुख्याने सशस्त्र दलांच्या धोरणात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी उत्तर आणि पश्चिम सीमेवर 9000 फूट ते 19000 फूट उंचीवर रस्ते बांधणी आणि देखभालीचे  कार्य  करते. सहा दशकांहून अधिक कालावधीत भारताच्या सीमेवर प्रतिकूल हवामान आणि भौगोलिक परिस्थितीमध्ये तसेच भूतान, म्यानमार, अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तानसह मित्र राष्ट्रांमध्ये 1,005 पूल, सात बोगदे आणि 21 एअरफील्ड आणि 62,214 किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्ते बांधून या संस्थेने  राष्ट्राच्या उद्दिष्टपूर्तीसाठी योगदान दिले आहे.

2023-24 मध्ये, बीआरओने 3,611 कोटी रुपयांचे एकूण 125 पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण केले. यामध्ये बळीपारा-चारद्वार-तवांग रोडवरील अरुणाचल प्रदेशातील सेला बोगद्याच्या बांधकामाचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच इटानगर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे  कार्यक्रमाद्वारे हा बोगदा राष्ट्राला समर्पित केला. बीआरओ लवकरच 4.10 किमी लांबीच्या शिंकुन ला बोगद्याच्या बांधकामाला सुरुवात करेल. हे बांधकाम पूर्ण झाल्यावर हा बोगदा जगातील सर्वात उंचावरील बोगदा म्हणून विख्यात असलेल्या चीन मधील 15,590 फूट उंचीचा मिला बोगद्यापेक्षा जास्त उंच म्हणजेच 15,800 फूट उंचीचा बोगदा बनेल.

बीआरओने बागडोगरा आणि बराकपूर या दोन महत्त्वाच्या एअरफील्ड प्रकल्पांची पूर्तता केली आणि त्याच्या उत्कृष्टतेच्या प्रवासात आणखी एक मैलाचा दगड रोवला. त्याचबरोबर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते मूढ एअरफील्ड प्रकल्पाची पायाभरणी नुकतीच करण्यात आली. बीआरओने हा प्रकल्प फक्त दोन हंगामात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये बीआरओने अर्थसंकल्पीय खर्चात झपाट्याने वाढ पाहिली आहे आणि क्षमता आणि प्रभावामध्ये उल्लेखनीय झेप घेतली आहे. या वाढीव अर्थसंकल्पीय सहाय्याने संस्थेला महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देणारे महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्यास आणि तिची परिचालन तयारी वाढविण्यास सक्षम केले आहे.

बीआरओ लिंग समानता आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी, महिलांना महत्त्वाच्या भूमिका आणि संधी प्रदान करण्यात आघाडीवर आहे. कर्नल पोनुंग डोमिंग सारखे अधिकारी पूर्व लडाखमधील गंभीर प्रकल्पांचे नेतृत्व करत आहेत. सेला बोगदा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्यात सहायक कार्यकारी अभियंता (सीआयव्ही ) निकिता चौधरी यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

S.Patil/S.Chitnis/G.Deoda/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2019873) Visitor Counter : 131