नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
इरेडातर्फे भागधारकांच्या 16 व्या बैठकीचे आयोजन
Posted On:
04 MAY 2024 7:40PM by PIB Mumbai
इरेडा अर्थात भारतीय नवीकरणीय उर्जा विकास संस्थेने आज, 04 मे 2024 रोजी नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे भागधारकांच्या 16 व्या चर्चात्मक बैठकीचे आयोजन केले. भागधारकांच्या या बैठकीमध्ये सौर, पवन, जल, जैविक उर्जा तसेच नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानांसह नवीकरणीय उर्जा क्षेत्रातील विविध व्यापारी भागीदारांचा उत्साही सहभाग दिसून आला. उल्लेखनीय बाब अशी आहे की इरेडाने आतापर्यंत भागधारकांच्या एकूण 16 बैठका आयोजित केल्या असून आजची बैठक ही त्यातील प्रत्यक्ष स्वरुपात आयोजित करण्यात आलेली दुसरी बैठक आहे, आतापर्यंत 14 बैठका आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आल्या आहेत.
आजच्या कार्यक्रमात इरेडाने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये केलेल्या ऐतिहासिक वार्षिक कामगिरीवर अधिक भर देत संस्थेने नुकत्याच केलेल्या अनेक यशस्वी कामगिरी वर्णन करणारे सादरीकरण करण्यात आले. आजच्या बैठकीत नवीकरणीय उर्जा विकासासाठी हाती घेण्यात आलेले प्रमुख उपक्रम, यापूर्वीच्या परस्पर चर्चात्मक बैठकांमधील सूचनांवरील कार्यवाही तसेच भारत सरकारने आखून दिलेल्या उद्दिष्टांशी सुसंगत भविष्यकालीन योजना यासंदर्भात चर्चा झाली.
31 मार्च 2024 पर्यंत इरेडाच्या टायर-1 चे भांडवल 8,265.20 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्यासह संस्थेच्या इतर उल्लेखनीय आर्थिक यशांवर या बैठकीत अधिक भर देण्यात आला.
व्यापार करण्यातील सुलभता वाढवण्याप्रती इरेडाची वचनबद्धता अधोरेखित करणारी सुगम कर्ज मंजुरी प्रक्रिया आणि चेहेराविरहित देवघेव यासाठी कर्जदारांनी संस्थेचे अभिनंदन केले. इरेडाने नुकताच “नवरत्न” दर्जा प्राप्त केल्याबद्दल तसेच केवळ 19 दिवसांच्या कालावधीत लेखापरीक्षण झालेले आर्थिक निष्कर्ष प्रकाशित करणारी पहिलीच एनबीएफसी ठरल्याबद्दल भागधारकांनी इरेडाची प्रशंसा केली.
यावेळी उपस्थित भागधारकांना संबोधित करताना, इरेडाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) प्रदीपकुमार दास यांनी व्यापार करण्यातील सुलभता वाढवणे आणि माहिती तंत्रज्ञानविषयक पायाभूत सुविधांचा अधिकाधिक प्रमाणात वापर करणे यांचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी बोलताना त्यांनी शाश्वत कॉर्पोरेट प्रशासन, पारदर्शकता आणि जबाबदारी यांच्याप्रती इरेडाच्या वचनबद्धतेची पुन्हा एकदा ग्वाही दिली.विविध क्षेत्रांच्या गरजेनुसार वित्तीय उत्पादनांची रचना करण्याप्रती कंपनीची समर्पित वृत्ती आणि भागीदारांच्या अभिप्रायावर आधारित नव्या उत्पादनांची सुरुवात करण्याची तयारी यावर त्यांनी अधिक भर दिला. भारत सरकारने कॉप 26 बैठकीत निश्चित केलेल्या संकल्पनेशी सुसंगत ठरेल अशा रीतीने, वर्ष 2030 पर्यंत बिगर-जीवाश्म स्त्रोतांपासून 500 गिगावॅट स्थापित वीजनिर्मिती क्षमता गाठण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य साध्य करण्यात निर्णायक भूमिका निभावण्याचे उद्दिष्ट इरेडाने ठेवले आहे.
***
N.Chitale/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2019660)
Visitor Counter : 82