खाण मंत्रालय
खाण क्षेत्रात आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये विक्रमी उत्पादनाची नोंद
मुख्य खनिजे आणि ॲल्युमिनियम धातूच्या उत्पादनात लक्षणीय वाढ
Posted On:
03 MAY 2024 8:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मे 2024
मार्च 2024 या महिन्यात खनिज उत्पादनाचा निर्देशांक 156.1 इतका होता, यात मार्च 2023 या महिन्याच्या तुलनेत 1.2% इतकी वाढ झाल्याची माहिती खनिकर्म मंत्रालयाने दिली आहे. 2023-24 या संपूर्ण आर्थिक वर्षात खनिज उत्पादन निर्देशांकांत 2022-23 च्या तुलनेत 7.5 टक्क्यांची वाढ झाल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या मार्च 2024 मध्ये 2023 मधील याच महिन्याच्या कॉपर कॉन्सन्ट्रेट, सोने, मँगनीज ओर, हिरे, ग्रॅफाइट, कायनाइट, सिलिमॅनाइट, लाइमशेल, चुनखडी, मॅग्नेसाइट या बिगर इंधन खनिजांमध्ये तुलनेत सकारात्मक वाढ दिसून आली अशी माहितीही मंत्रालयाने दिली आहे.
खनिज संवर्धन आणि विकास नियमनाअंतर्गत एकूण खनिज उत्पादनमूल्यापैकी लोह खनिज आणि चुनखडीचे एकत्रित उत्पादन मूल्य सुमारे 80% इतके आहे. या प्रमुख खनिजांच्या उत्पादनांशी संबधित संभाव्य अंदाजित आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये या खनिजांच्या उत्पादनात देशात प्रचंड मोठी वाढ दिसून आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ते 258 दशलक्ष मेट्रिक टन इतके होते, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये त्यात 7.4% वाढ होऊन 277 दशलक्ष मेट्रिक टन इतके लोह खनिजाचे उत्पादन घेतले गेले. त्यामुळे हे विक्रम मोडीत काढणारे उत्पादन ठरले असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे. चुनखडीच्या उत्पादनातही अशाच वाढीचा कल दिसून आला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 406.5 दशलक्ष मेट्रिक टन इतके चुनखडीचे उत्पादन घेतले गेले होते, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये या विक्रमाला मागे टाकत, 10.7 टक्क्यांच्या वाढीसह चुनखडीचे 450 दशलक्ष मेट्रिक टन इतके उत्पादन घेतले गेले अशी माहिती मंत्रालयाने दिली आहे.
बिगर-लोह धातू क्षेत्रात प्राथमिक ऍल्युमिनियम धातूच्या उत्पादनाने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आर्थिक वर्ष 2022-23 चे सर्व विक्रम मोडीत काढले. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये प्राथमिक ऍल्युमिनियम धातूचे 40.73 लाख टन इतके उत्पादन झाले होते, 2.1% वृद्धी दरासह त्यात वाढ होऊन आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 41.59 लाख टन इतक्या अल्युमिनियमचे उत्पादन झाले आहे.
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ऍल्युमिनियम उत्पादक, तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा चुनखडी उत्पादक आणि चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा लोह खनिज उत्पादक देश आहे. लोह खनिज आणि चुनखडीच्या उत्पादनात आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये दिसून आलेली निकोप वाढ पोलाद आणि सिमेंट या वापरकर्त्या उद्योगांकडून येणाऱ्या मागणीमध्ये झालेल्या भक्कम वाढीची निदर्शक आहे. अल्युमिनियमच्या उत्पादनातील मोठ्या वाढीच्या सोबतीने, हे वृद्धीचे कल देशातील उर्जा, पायाभूत सुविधा, बांधकाम, वाहन उद्योग आणि यंत्रसामग्री यांसारख्या वापरकर्त्या क्षेत्रांमधील सशक्त आर्थिक व्यवहारांकडे निर्देश करतो.
* * *
S.Patil/Tushar/Sanjana/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2019596)
Visitor Counter : 182