संरक्षण मंत्रालय

नवी दिल्ली इथे 7 व्या भारत-इंडोनेशिया संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची [India-Indonesia Joint Defence Cooperation Committee (JDCC)] बैठक यशस्वीपणे संपन्न


संरक्षण उद्योग, सागरी सुरक्षा आणि बहुपक्षीय सहकार्य या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य वाढवण्यावर भारताच्या संरक्षण मंत्रालयाचे सचिव आणि इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या सरचिटणीसांमध्ये सहमती

Posted On: 03 MAY 2024 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 मे 2024

 

नवी दिल्ली इथे आज 7 व्या भारत-इंडोनेशिया संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची [India-Indonesia Joint Defence Cooperation Committee (JDCC)] बैठक झाली. संरक्षण सचिव गिरीधर अरमाने आणि इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे सरचिटणीस एअर मार्शल डॉनी एर्मावन तौफांटो, एमडीएस यांनी या बैठकीचे सहअध्यक्षपद भूषवले. दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याची व्याप्ती वाढल्याबद्दल, या भेटीत दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले. संरक्षण सहकार्य आणि संरक्षण उद्योग सहकार्याशी संबंधित कार्यकारी गटांच्या झालेल्या बैठकांमध्ये विविध द्विपक्षीय संरक्षण सहकार्य उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा बैठकीच्या सर्व अध्यक्षांनी घेतला.

यासोबतच या बैठकीत विद्यमान परस्पर भागीदारीच्या क्षेत्राची व्याप्ती वाढवण्याविषयी विशेषत: संरक्षण उद्योग भागीदारी, सागरी सुरक्षा आणि बहुपक्षीय सहकार्य क्षेत्रातील सहकार्याची व्याप्ती वाढवण्याचे मार्गही अधिकाऱ्यांनी निश्चित केले.

या भेटीदरम्यान इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे सरचिटणीस एअर मार्शल डॉनी एर्मावन तौफांटो, एमडीएस यांनी नवी दिल्लीतील डीआरडीओ मुख्यालय तसेच पुण्यातील टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स आणि एल अँड टी डिफेन्स सुविधा केंद्राला भेट दिली. भारत फोर्ज, महिंद्रा डिफेन्स आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांसारख्या भारतातील इतर संरक्षण उद्योग भागीदारांचीही त्यांनी भेट घेतली आणि संशोधन तसेच संयुक्त उत्पादनासाठीच्या परस्पर सहकार्याच्या माध्यमातून संरक्षण उद्योगविषयक क्षमतावृद्धी करण्याच्या उपाययोजनांवर चर्चा केली. आपल्या या भेटीदरम्यान एअर मार्शल डॉनी एर्मावन तौफांटो, एमडीएस यांनी भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांचीही भेट घेतली.

इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे सरचिटणीस एअर मार्शल डॉनी एर्मावन तौफांटो, एमडीएस हे कालपासून भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. उद्यापर्यंत त्यांचा हा दौरा असेल. भारताच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शहीद वीरांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजलीही वाहिली.

भारत आणि इंडोनेशिया यांच्यात व्यापक धोरणात्मक भागीदारी आहे. परस्पर संवादातून दोन्ही देशांमध्ये भारत प्रशांत क्षेत्रासंबंधी सामाईक दृष्टीकोन, मते आणि विचारही विकसित झाले आहेत. सध्याच्या काळात, द्विपक्षीय आणि बहुपक्षीय पातळीवर दोन्ही देशांचे संबंध दृढ भागीदारीचे असल्याचे म्हणता येईल. त्यामुळेच या दोन्ही देशांमध्ये ठराविक काळाने नियमितपणे उच्च-स्तरीय संवाद देखील होत आले आहेत. भारताच्या अॅक्ट ईस्ट धोरणात आणि भारत प्रशांत क्षेत्रासंबंधी मुद्यावर इंडोनेशिया हा भारताचा महत्त्वाचा भागीदार देश राहिला आहे.

 

* * *

S.Patil/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2019589) Visitor Counter : 45