ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक ऊर्जा काँग्रेसमध्ये झालेल्या मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत ऊर्जासुरक्षा, पोहोच आणि शाश्वतता या तीन उर्जा आयाम व्यवस्थापन मार्गावर चर्चा

Posted On: 25 APR 2024 1:49PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 एप्रिल 2024

 

नेदरलँड्समध्ये रॉटरडॅम येथे सुरु असलेल्या 26व्या जागतिक ऊर्जा काँग्रेसमध्ये 24 एप्रिल 2024 रोजी एक मंत्रीस्तरीय गोलमेज परिषद भरवण्यात आली. हवामानबदलाविषयी चर्चा करण्यासाठी दुबईमध्ये झालेली संयुक्त राष्ट्रांची कॉप28 परिषद कशी निर्णायक ठरली, यावर या गोलमेज परिषदेत चर्चा झाली. या मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत, ऊर्जा क्षेत्रातील नवोन्मेष आणि सहयोग यांवर चर्चा झाली. तसेच सध्या उदयाला येत असलेले ऊर्जाविषयक तीन आयाम व त्या संदर्भात व्यवस्थापन करताना लक्षात घेण्याचे परिणाम, याविषयीही गोलमेज परिषदेत चर्चा झाली. जागतिक ऊर्जा संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी झालेल्या या गोलमेज परिषदेसाठी नेदरलँड्सचे उपपंतप्रधान तथा हवामान आणि ऊर्जाधोरणमंत्री रॉब जेतेन, भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचे सचिव पंकज अग्रवाल यांच्यासह देशांचे आणि संघटनांचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते. 

या परिषदेदरम्यान केंद्रीय ऊर्जासचिवांनी कॉप28 मधील भारताची मध्यवर्ती भूमिका अधोरेखित केली. जागतिक पातळीवर ऊर्जाविषयक संक्रमण घडून येण्यासाठी धोरणांना वेग आणण्यामध्ये भारताने महत्त्वाचे दायित्व निभावले आहे, असे त्यांनी प्राधान्याने विशद केले. या संदर्भात जी-20 नेत्यांचे नवी दिल्ली घोषणापत्र कसे महत्त्वाचे ठरते, ते त्यांनी सांगितले. नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि ऊर्जा-कार्यक्षमता यांच्या बाबतीत कॉप28 ने घेतलेल्या वचनबद्धता- म्हणजेच ऊर्जा-कार्यक्षमतेत सुधारणा करण्याचा दर प्रतिवर्षी दुप्पट करणे आणि 2030 पर्यंत जगाची नूतनीकरणक्षम ऊर्जेची क्षमता तिप्पट करणे- या वचनबद्धतांच्या पूर्तीसाठी मतैक्य बांधण्याच्या दृष्टीने भारताने जे प्रयत्न केले आहेत, त्यांचे द्योतक म्हणजेच नवी दिल्ली घोषणापत्र होय, असे भारताच्या ऊर्जासचिवांनी नमूद केले.

प्रधानमंत्री-कुसुम योजना आणि छतावरील सौरऊर्जा निर्मितीविषयक कार्यक्रमांद्वारे होत असलेले पर्यावरण संतुलन आणि रोजगारनिर्मिती यांवर प्रकाश टाकत त्यांनी ऊर्जासुरक्षा, पोहोच आणि शाश्वतता यांमध्ये समतोल राखणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगितले. भारतातील कार्बन बाजारपेठेत शाश्वततेवर यापुढे अधिक काम केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ऊर्जाविषयक तीन आयामांबाबत प्रभावी मार्गदर्शनासाठी विकसनशील देशांना पतपुरवठा आणि स्वच्छ तंत्रज्ञान आवाक्यात येण्याबाबत सहकार्याची गरज असते, असे सचिवांनी परिषदेत सहभागी झालेल्यांना सांगितले.

 

26 व्या जागतिक ऊर्जा काँग्रेसविषयी:

जगभर स्वच्छ आणि सर्वसमावेशक ऊर्जा संक्रमणे घडून येण्याच्या दृष्टीने 26 वे जागतिक ऊर्जा काँग्रेस, नेत्यांसाठी क्रांतिकारी व निर्णायक ठरण्याची अपेक्षा आहे. 'लोक आणि वसुंधरा यांच्यासाठी ऊर्जा पुनर्रचना' अशी या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना असून, जगातील ऊर्जेच्या संदर्भात कार्यरत असणाऱ्या जागतिक ऊर्जा परिषदेच्या शताब्दीनिमित्त हे चार दिवसीय संमेलन भरवण्यात आले आहे.

जागतिक ऊर्जा परिषद भारत:

जागतिक ऊर्जा परिषद भारत म्हणजे त्या जागतिक ऊर्जा परिषदेचा राष्ट्र-सदस्य होय. ऊर्जेचा शाश्वत पुरवठा आणि संतुलित वापर यांस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या जागतिक परिषदेची 1923 मध्ये स्थापना करण्यात आली.

अधिक माहितीसाठी हेही वाचा:

 

* * *

N.Chitale/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2018820) Visitor Counter : 142