राष्ट्रपती कार्यालय

भारतीय वित्तीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

Posted On: 16 APR 2024 1:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 एप्रिल 2024

भारतीय वित्तीय सेवेतील (2022 आणि 2023 तुकडीच्या) परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांनी आज (16 एप्रिल 2024) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.

देशाच्या विकासात आर्थिक वाढ हा महत्त्वाचा घटक आहे. स्थूल आणि सूक्ष्म आर्थिक निर्देशक हे प्रगतीचे उपयुक्त मापदंड मानले जातात. त्यामुळे सरकारी धोरणे आणि योजना प्रभावी आणि उपयुक्त बनवण्यात अर्थतज्ज्ञांची भूमिका महत्त्वाची असते असे अधिकाऱ्यांशी संवाद साधताना राष्ट्रपतींनी नमूद केले. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, तुमच्या क्षमता वाढवण्याच्या आणि त्यांचा पुरेपूर वापर करण्याच्या अगणित संधी तुम्हाला लाभतील असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. या संधींचा योग्य फायदा घेऊन ते देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वित्तीय सेवा अधिकाऱ्यांनी आर्थिक विश्लेषण आणि विकास कार्यक्रमांची रचना तसेच संसाधन वितरण प्रणाली मजबूत करण्यासाठी आणि योजनांचे मूल्यांकन करण्यासाठी योग्य सल्ला देणे अपेक्षित आहे. ही अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे कारण त्यांनी दिलेल्या सूचनांच्या आधारे धोरणे ठरवली जातील असे राष्ट्रपतींनी नमूद केले.

डेटाचे विश्लेषण आणि पुराव्यावर आधारित विकास कार्यक्रमांच्या अंमलबजावणीमुळे सरकारला लोकांच्या आर्थिक उन्नतीला चालना देण्यात मदत झाल्याचे राष्ट्रपतींनी निदर्शनास आणले. नव संकल्पना, पद्धती आणि तंत्रांद्वारे कामाची कार्यक्षमता वाढवणे हे तरुण आयईएस अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे, असे मत त्यांनी मांडले. त्यांची सर्जनशीलता या वेगाने बदलणाऱ्या युगात देशासाठी प्रगतीची नवीन कवाडे उघडण्यास मदत करेल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

भारतीय वित्तीय सेवेतील  2022 आणि 2023 तुकडीतील 60 टक्क्यांहून अधिक अधिकारी या महिला आहेत हे नमूद करताना राष्ट्रपतींनी संतोष व्यक्त केला. महिलांचा वाढता सहभाग भारताच्या सर्वसमावेशक विकासाचा संकल्प पूर्ण करण्यास मदत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिला अधिकाऱ्यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रपतींनी तरुण अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात धोरणाशी संबंधित सूचना देताना किंवा कोणताही निर्णय घेताना देशातील गरीब आणि मागासलेल्या घटकांचे हित लक्षात घेण्याचे आवाहन केले.

S.Kane/V.Joshi/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2018014) Visitor Counter : 65