संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे उझबेकिस्तान दौऱ्यावर

Posted On: 15 APR 2024 1:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 एप्रिल 2024

भारत आणि उझबेकिस्तान प्रजासत्ताक यांच्यातील संरक्षणविषयक सहकार्याला चालना देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत लष्करप्रमुख (सीओएएस) जनरल मनोज पांडे आज उझबेकिस्तानच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. 18 एप्रिलपर्यंत  लष्करप्रमुखांचा दौरा आहे. आज, दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी, जनरल मनोज पांडे उझबेकिस्तानच्या संरक्षण विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत चर्चेत सहभागी होतील. दोन्ही देशांदरम्यान अधिक मजबूत लष्करी सहकार्याला चालना देण्याच्या दृष्टीने या चर्चा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. लष्करप्रमुखांच्या या दौऱ्याच्या कार्यक्रमपत्रिकेत उझबेकिस्तानच्या समृद्ध लष्करी इतिहासाची आणि यशस्वी कामगिरीची माहिती देणाऱ्या सशस्त्र सेनादल वस्तुसंग्रहालयाला आणि  हस्त इमाम एनसेम्बलला भेट  या कार्यक्रमांचा समावेश आहे.

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, 16 एप्रिल 2024 रोजी लष्करप्रमुख मनोज पांडे भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहतील. त्यानंतर ते, दुसऱ्या विश्वयुद्धात उझबेकिस्तानने दिलेले योगदान आणि बलिदानांचे स्मारकस्थळ असलेल्या व्हिक्टोरिया पार्कला भेट देतील. त्याच दिवशी लष्करप्रमुख नवोन्मेष तंत्रज्ञान एलएलसी केंद्राला भेट देणार असून तेथे त्यांना संरक्षण तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात उझबेकिस्तान सरकारतर्फे हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात येईल. या भेटीनंतर लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे उझबेकिस्तान सशस्त्र दल अकादमीला भेट देऊन भारताच्या मदतीने अकादमीत स्थापन करण्यात आलेल्या माहिती तंत्रज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन करतील.

17 एप्रिल 2024 रोजी जनरल पांडे समरकंद येथे जाणार असून तेथे ते केंद्रीय लष्करी जिल्हा कमांडरांची भेट घेतील. तर्मेझ येथे 18 एप्रिल 2024 रोजी नियोजित दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांच्या दस्तलिक या संयुक्त लष्करी सरावाला देखील जनरल मनोज पांडे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर लष्करप्रमुखांच्या या उझबेकिस्तान दौऱ्याचा समारोप होणार आहे. भारत आणि उझबेकिस्तान या देशांच्या सशस्त्र दलांच्या दरम्यान विकसित झालेले उत्तम आंतरपरिचालन आणि परस्पर विश्वास  यांचे दर्शन या सरावातून घडेल.

भारत आणि उझबेकिस्तान या देशांच्या दरम्यान असलेले लष्करी सहकार्यविषयक संबंध आणखी मजबूत करण्यासोबतच या दोन्ही देशांतील सहयोगाचे नवे मार्ग शोधण्याच्या उद्देशाने जनरल मनोज पांडे यांचा हा उझबेकिस्तान दौरा आयोजित करण्यात आला आहे.

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2017931) Visitor Counter : 92