खाण मंत्रालय

खाणकाम आणि खनिज प्रक्रिया क्षेत्रात संशोधन तसेच नवोन्मेषाला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्रीय खाण मंत्रालयातर्फे खाणकाम क्षेत्रातील स्टार्ट अप उद्योगांसाठी वेबिनारचे आयोजन

Posted On: 10 APR 2024 6:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 एप्रिल 2024

 

खाणकाम आणि खनिज प्रक्रिया क्षेत्रात संशोधन तसेच नवोन्मेषाला चालना देण्याचे नवनवीन मार्ग शोधण्याच्या उद्देशाने केंद्रीय खाण मंत्रालयाने खाणकाम आणि धातुशास्त्र क्षेत्रात कार्यरत स्टार्ट अप उद्योग, एमएसएमई तसेच संशोधकांसाठी आज नवी दिल्ली येथे विशेष वेबिनारचे आयोजन केले. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग सचिव प्रा.अभय करंदीकर यांनी या वेबिनारचे उद्घाटन केले तर केंद्रीय खाण विभागाचे सचिव व्ही.एल.कांताराव यांचे या प्रसंगी बीजभाषण झाले.

केंद्रीय खाण मंत्रालयाने नोव्हेंबर 2023 मध्ये “खाणकाम, खनिज प्रक्रिया, धातुशास्त्र  तसेच पुनर्वापर क्षेत्रात कार्यरत स्टार्ट अप उद्योग तसेच एमएसएमई उद्योगांमधील संशोधन आणि नवोन्मेषाला चालना (एसअँडटी-पीआरआयएसएम)” हा उपक्रम सुरु केला. खनिज क्षेत्र, खाणकाम आणि औद्योगिक वापरासाठी अप्लाईड तसेच शाश्वत दृष्टीकोन अशा क्षेत्रांमध्ये कार्यरत स्टार्ट अप्स तसेच एमएसएमई उद्योगांना संशोधन आणि नवोन्मेष करण्यासाठी निधी पुरवण्याच्या हेतूने हा कार्यक्रम हाती घेण्यात आला. हा उपक्रम संशोधन आणि विकास कार्य आणि व्यावसायिकीकरण यांच्यातील दरी भरून काढेल तसेच खाणकाम आणि खनिज क्षेत्रातील संपूर्ण मूल्यसाखळीसाठी परिसंस्था उभारण्यास देखील प्रोत्साहन देईल.

एसअँडटी-पीआरआयएसएम या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय खाण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली नागपूर येथील जवाहरलाल नेहरु अल्युमिनियम संशोधन विकास आणि संरचना केंद्र (जेएनएआरडीडीसी) या स्वायत्त संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे.

जेएनएआरडीडीसीने एसअँडटी-पीआरआयएसएम या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नवीन प्रस्ताव मागवले असून हे प्रस्ताव सादर करण्यासाठी 30 एप्रिल 2024 पर्यंतची कालमर्यादा देण्यात आली आहे. ईशान्य प्रदेशातील स्टार्ट अप उद्योग आणि एमएसएमईज तसेच महिलांनी चालवलेल्या उद्योगांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

या वेबिनारमध्ये स्टार्ट अप उद्योग, या क्षेत्रातील तज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी यांच्यासह 200 हून अधिक लोकांनी भाग घेतला.

या वेबिनारदरम्यान, उपस्थित प्रतिनिधींनी खाणकाम आणि खनिज प्रक्रिया क्षेत्रातील नवीनतम पद्धती, आव्हाने आणि संधी यांच्या संदर्भातील वैचारिक चर्चांमध्ये भाग घेतला.

 

* * *

S.Kane/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2017626) Visitor Counter : 61