राष्ट्रपती कार्यालय
जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते होमिओपॅथिक संमेलनाचे उद्घाटन
Posted On:
10 APR 2024 2:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 एप्रिल 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (10 एप्रिल 2024) जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त होमिओपॅथी क्षेत्रातील केंद्रीय संशोधन परिषदेने नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय होमिओपॅथिक संमेलनाचे उद्घाटन केले.
याप्रसंगी बोलताना, राष्ट्रपती म्हणाल्या की होमिओपॅथी ही साधीसोपी आणि सुलभतेने उपलब्ध उपचारपद्धती असल्याने जगातील अनेक देशांनी या पद्धतीचा स्वीकार केला आहे. संपूर्ण जगभरात, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील अनेक संस्था होमिओपॅथीला प्रोत्साहन देत आहेत. भारतात होमिओपॅथी उपचारपद्धतीला प्रोत्साहन देण्यात केंद्रीय आयुष मंत्रालय, होमिओपॅथी क्षेत्रातील संशोधनविषयक केंद्रीय परिषद, होमिओपॅथीसंदर्भातील राष्ट्रीय आयोग, राष्ट्रीय होमिओपॅथी संस्था तसेच केंद्र सरकारच्या अशा सर्व संस्था देत असलेल्या योगदानाची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली.
21 व्या शतकात संशोधनाचे महत्त्व सतत वाढत राहिले आहे असे राष्ट्रपतींनी सांगितले. म्हणूनच ‘संशोधनाला सक्षमता प्रदान करत नैपुण्य वाढवणे’ ही या संमेलनाची संकल्पना अत्यंत समर्पक असल्याचे त्या म्हणाल्या. होमिओपॅथी उपचारपद्धतीचा स्वीकार आणि लोकप्रियता आणखी वाढवण्यात संशोधन तसेच नैपुण्य यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल यावर त्यांनी अधिक भर दिला.
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की अनेक जण अशा एखाद्या व्यक्तीचा अनुभव सामायिक करतात ज्या व्यक्तीला विविध प्रणालींच्या उपचारातून निराशा पदरी आली मात्र होमिओपॅथीच्या उपचारांतून मिळालेल्या लाभांनी चमत्कार घडवला. मात्र, असे अनुभव जेव्हा तथ्ये आणि विश्लेषणासह मांडले जातात, तेव्हाच त्यांना वैज्ञानिक समुदायाची मान्यता प्राप्त होते. अशा प्रकारचे तथ्याधारित विश्लेषण जेव्हा मोठ्या प्रमाणावर केले जाते तेव्हा ते अस्सल वैद्यकीय संशोधन असते. वैज्ञानिक कसोट्यांना प्रोत्साहन दिल्याने लोकांचा या वैद्यकीय प्रणालीवरील विश्वास आणखी वाढेल असे त्या म्हणाल्या.
राष्ट्रपतींनी सांगितले की केवळ निरोगी लोकच निरोगी समाजाची निर्मिती करू शकतात आणि निरोगी समाजाच्या पायावर निरोगी देशाची उभारणी होत असते. निरोगी, समृद्ध तसेच विकसित भारताची उभारणी करण्यात आरोग्यसुविधा क्षेत्रातील व्यावसायिकांचे अत्यंत अनमोल योगदान असेल असे मत राष्ट्रपती मुर्मू यांनी यावेळी व्यक्त केले.
राष्ट्रपतींचे भाषण वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
* * *
S.Kane/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2017588)
Visitor Counter : 95