नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए), ने केली 6.43 दशलक्ष टीईयू इतकी विक्रमी माल हाताळणी


आर्थिक वर्ष 2023-24 साठी जेएनपीए ची एकूण वाहतूकक्षमता पोहोचली 85.82 दशलक्ष मेट्रिक टनांवर

Posted On: 03 APR 2024 2:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 एप्रिल 2024

 

देशातील कंटेनर हाताळणी करणाऱ्या प्रमुख बंदरापैकी एक असलेल्या महाराष्ट्रातील जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए)ने, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये मालाची विक्रमी हाताळणी करत 6.43 दशलक्ष टीईयू  इतकी उलाढाल गाठण्याचा आणखी एक पराक्रम केला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मधील 6.05 दशलक्ष टीईयू चा विक्रम मागे टाकत बंदराने आपला प्रगतीचा चढता आलेख कायम ठेवला आहे. त्या तुलनेत, जेएनपीए ने गेल्या वर्षीच्या याच कालावधीत एकूण माल हाताळणीमध्ये 6.27% इतकी लक्षणीय वाढ नोंदवून विक्रमी माल हाताळणी केली होती.

जेएनपीए ने एप्रिल-2023 ते मार्च-2024 या कालावधीत एकूण 85.82 दशलक्ष मेट्रिक मालवाहतूक हाताळली असून गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीत हाताळण्यात आलेल्या 83.86 दशलक्ष टनांच्या तुलनेत ती 2.33% जास्त आहे. यामध्ये 78.13 दशलक्ष टन कंटेनर वाहतूक आणि 7.70 दशलक्ष टन इतक्या कंटेनर शिवाय थेट जहाजावर चढवण्यात येणाऱ्या बल्क कार्गोचा समावेश आहे, हे प्रमाण गेल्या वर्षीच्या याच कालावधीत अनुक्रमे 76.19 दशलक्ष टन कंटेनर वाहतूक आणि 7.67 दशलक्ष टन बल्क कार्गो इतके होते.

कंटेनर वाहतुकीचे वर्गीकरण पाहिल्यास  BMCT येथे 2.03 दशलक्ष 2027781 टीईयू, APMT येथे 1.59 दशलक्ष टीईयू, न्हावा शेवा आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनल येथे 1.13 दशलक्ष टीईयू, न्हावा शेवा इंटरनॅशनल गेटवे टर्मिनल येथे 1.11 दशलक्ष टीईयू, न्हावा शेवा फ्रीपोर्ट टर्मिनल वर 0.56 दशलक्ष टीईयू  आणि न्हावा शेवा वितरण टर्मिनल वर 7,978 टीईयू असे आहे.

हा एक लक्षणीय टप्पा गाठल्याबद्दल आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे, असे जे एन पी ए चे अध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांनी सांगितले. आयात निर्यात व्यापारामध्ये बंदरांना एक मुख्य प्रवेशद्वार म्हणून नावारूपाला आणण्यासाठी आम्ही करत असलेल्या समर्पित प्रयत्नांना हे यश अधोरेखित करत असल्याचे ते म्हणाले. तसेच या कामगिरीमुळे केंद्रीकृत वाहन तळ, एक खिडकी योजना आणि व्यापार अनुकूल वातावरण निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या इतर उच्च दर्जाच्या सेवा देण्याच्या आमच्या टीमच्या अतूट वचनबद्धतेचे दर्शन होते आहे. मी आमच्या सर्व भागीदारांप्रति आणि भागधारकांप्रति  त्यांच्या निरंतर विश्वास आणि समर्थनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. जेएनपीए नेहमीच देशाच्या आर्थिक प्रगतीत योगदान देत राहील.” असे वाघ यांनी सांगितले. 

 

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) विषयी: 

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) हे भारतातील प्रमुख कंटेनर हाताळणी बंदरांपैकी एक आहे. 26 मे 1989 रोजी सुरू करण्यात आलेले,  जेएनपीए हे मोठ्या -कार्गो टर्मिनलमधून देशातील प्रमुख कंटेनर बंदरामध्ये रूपांतरित झाले आहे.

सध्या जेएनपीए पाच कंटेनर टर्मिनल चालवते: न्हावाशेवा फ्री पोर्ट टर्मिनल्स NSFT, न्हावा शेवा आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी), न्हावा शेवा इंटरनॅशनल गेटवे टर्मिनल (एनएसआयजीटी), भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेड (बीएमसीटीपीएल)आणि एपीएमटी. बंदरात सामान्य मालवाहतूक करण्यासाठी उथळ पाण्याचा धक्का आणि दुसरा द्रव मालवाहू टर्मिनल आहे जो BPCL-IOCL कन्सोर्टियम आणि नव्याने बांधलेल्या किनारी धक्क्याद्वारे व्यवस्थापित केला जातो. 277 हेक्टर जमिनीवर वसलेले, जेएनपीए भारतातील निर्यात-केंद्रित उद्योगांना चालना देण्यासाठी, अत्याधुनिक पायाभूत सुविधांसह, वैशिष्ट्यपूर्वक डिझाइन केलेले बहु-उत्पादन विशेष आर्थिक क्षेत्र (एस ई झेड) देखील चालवते.

 

* * *

JPS/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2017041) Visitor Counter : 125