आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वातावरणातील उष्मा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात रुग्णालयांमधील आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना संयुक्त मार्गदर्शक सूचना केल्या जारी


राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना, त्यांच्या अधिकारक्षेत्रातील सर्व मान्यताप्राप्त रुग्णालयांनी आग प्रतिबंधक उपाययोजना राबवत संबंधित राज्य अग्निशमन विभागांकडून वैध अग्निशमन एनओसी प्राप्त केल्याचे सुनिश्चित करावे, असे आरोग्य मंत्रालयाचे निर्देश 

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना अत्यावश्यक सुरक्षा उपायांची कठोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आणि आढावा घेण्याचे केले आवाहन

Posted On: 23 MAR 2024 8:11PM by PIB Mumbai

 

उन्हाळ्यामध्ये हवेतील तापमानात वाढ होत असताना, रुग्णालयांमधील आगीच्या दुर्घटनांचा मोठा धोका संभवतो. हे टाळण्यासाठी, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना संयुक्त मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, यामध्ये अशा विनाशकारी घटनांना रोखण्यासाठी सक्रीय उपायांचे सर्वोच्च महत्त्व अधोरेखित केले आहे.

राज्यांचे आरोग्य विभाग आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांना त्यांच्या अधिकारक्षेत्रातील सर्व मान्यताप्राप्त रुग्णालये पुढील बाबींवर त्वरित कारवाई करत आहेत, हे सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या निकट संपर्कात राहून त्यांनी काम करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

       काटेकोर तपासणी: अग्निसुरक्षा अनुपालनाचे मूल्यमापन करण्यासाठी सर्व रुग्णालयांचे सर्वसमावेशक अग्निसुरक्षा ऑडिट / ऑन-साइट (प्रत्यक्ष) तपासणी करणे. फायर अलार्म, फायर स्मोक डिटेक्टर, अग्निशामक यंत्रे, फायर हायड्रंट्स आणि फायर लिफ्ट्ससह अग्निरोधक यंत्रणा उपलब्ध आहे, आणि ती पूर्णपणे कार्यरत आहे, याची खात्री करणे.

       इलेक्ट्रिकल लोड ऑडिट (विद्युत भार लेखा परीक्षण): अपुऱ्या विद्युतभार क्षमतेमुळे निर्माण होणार्‍या समस्यांचे निराकरण करणे. रुग्णालयांनी नियमितपणे, विशेषत: नवीन उपकरणे जोडताना किंवा आयसीयू मध्ये (अतिदक्षता विभाग) उपकरणांची जागा बदलताना इलेक्ट्रिकल लोड ऑडिट करणे आवश्यक आहे. लक्षात आलेल्या कोणत्याही त्रुटी तत्काळ दूर कराव्यात.

        फायर एनओसी (आगीपासून सुरक्षिततेचे ना-हरकत प्रमाणपत्र) अनुपालन: रुग्णालयांनी नियामक अटींचे काटेकोरपणे पालन करायला हवे आणि त्यांच्या संबंधित राज्य अग्निशमन विभागांकडून वैध फायर नो-ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (एनओसी) प्राप्त करणे गरजेचे आहे. अग्निसुरक्षा नियमांचा अवलंब करण्यापूर्वी बांधलेल्या जुन्या इमारतींमधील विद्युतभारांचे री-कॅलिब्रेशन (पडताळणी) करण्याला प्राधान्य देणे.

अग्निसुरक्षेचे अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी रुग्णालयांनी अमलात आणायचे टप्पे आणि उपाययोजनांची रूपरेषा स्पष्ट करणाऱ्या सूचनांचा तपशीलवार संच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना देण्यात आला असून, त्यांनी सर्व मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये ही माहिती प्रसारित करावी अशी सूचना केली आहे.

रुग्णालये आणि इतर आरोग्य सेवा केंद्रांमध्ये आगीची दुर्घटना टाळण्यासाठी पुढील सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे:

1.   कार्यक्षम अग्निशमन प्रणाली: रुग्णालयांनी आपल्याकडे उपलब्ध असलेली अग्निशामक उपकरणे, हायड्रंट्स आणि अलार्म यासारख्या अग्निरोधक उपकरणांची नियमितपणे तपासणी करणे आवश्यक आहे. यामध्ये आग विझवणाऱ्या उपकरणांची कालबाह्यता तारीख तपासणे, हायड्रंट्स (पाण्याचे फवारे मारणारे उपकरण) उपलब्ध आहेत आणि पाण्याचा पुरेसा दाब आहे याची खात्री करणे आणि संपूर्ण अग्निरोधक सुविधेमध्ये फायर अलार्म कार्यरत आहेत, आणि ते ऐकू येण्याजोगे आहेत याची खात्री करणे समाविष्ट आहे.

2.   नियमित देखभाल आणि चाचणी: सर्व सुरक्षा उपकरणांसाठी देखभाल वेळापत्रक निश्चित करणे. यामध्ये अग्निशामक यंत्रांची मासिक तपासणी, फायर अलार्म आणि हायड्रंट्सच्या त्रैमासिक चाचण्या तसेच संबंधित भारतीय मानकांनुसार त्यांचा प्रभावीपणा प्रमाणित करण्यासाठी वार्षिक व्यावसायिक तपासणी या बाबींचा समावेश आहे.

3.   नियमित इलेक्ट्रिकल लोड ऑडिट: रुग्णालयाच्या वीज वापराचे मूल्यमापन करण्यासाठी, विशेषत: आयसीयू सारख्या विजेची उच्च-मागणी असलेल्या विभागात वर्षातून दोनदा इलेक्ट्रिकल ऑडिट करणे. नॅशनल इलेक्ट्रिकल कोड ऑफ इंडिया-2023 (भारतीय राष्ट्रीय विद्युत नियमन) अनुसार विद्युत प्रणालीवर विजेचा अतिरिक्त भार येऊ नये, याबाबतच्या सुरक्षा मानकांची पूर्तता होत असल्याची खात्री करण्यासाठी प्रमाणित इलेक्ट्रिशियनद्वारे अपग्रेड (श्रेणी सुधारणा) अथवा सुधारणांचे मूल्यांकन करावे.

4.   ऑक्सिजन सुरक्षितता: ऑक्सिजन टाक्या अथवा ऑक्सिजन पाईप असलेल्या भागात, धूम्रपान प्रतिबंधक धोरणांची कठोर अंमलबजावणी करणे आणि उष्णतेच्या स्रोतांवर नियंत्रण ठेवणे. या भागांना स्पष्टपणे चिन्हांकित करावे आणि कर्मचाऱ्यांना ऑक्सिजनचे उच्च प्रमाण असलेल्या वातावरणाशी संबंधित जोखमींचे प्रशिक्षण द्यावे.

5.   स्मोक डिटेक्टर आणि फायर अलार्मची स्थापना: संपूर्ण रुग्णालयात, विशेषत: रुग्णांच्या खोल्या, मधली जागा आणि सार्वजनिक भागात फायर स्मोक डिटेक्टर आणि फायर अलार्म स्थापित केले आहेत, याची खात्री करणे. IS2189 मध्ये नमूद केल्यानुसार या प्रणालींची मासिक चाचणी करणे आणि दरवर्षी किंवा आवश्यकतेनुसार बॅटरी बदलणे.

6.   ज्वलनशील सामग्रीवरील नियंत्रण: रूग्णालयाच्या बांधकामात आणि फर्निचरमध्ये वापरलेल्या साहित्याचे लेखापरीक्षण करणे. रुग्णांची काळजी घेण्याच्या विभागातील ज्वलनशील वस्तू काढून त्या जागी आगीत पेट न घेणाऱ्या वस्तू ठेवणे.

7.   इलेक्ट्रिकल डक्टसाठी अ-ज्वलनशील पदार्थांचा वापर: इलेक्ट्रिकल डक्टची तपासणी करून, वायर टेपने सील करणे, जेणेकरून उघड्या वायरद्वारे होणारा आग आणि धुराचा प्रसार रोखता येईल.

8.   विजेचा स्रोत ओव्हरलोड होऊ नये याची दक्षता घेणे: विजेच्या प्रवाहाचे निरीक्षण करण्यासाठी आणि ओव्हरलोडिंग टाळण्यासाठी पॉवर मॅनेजमेंट सिस्टम वापरणे. एकापेक्षा जास्त हाय-पॉवर उपकरणे एकाच सर्किटला जोडलेली नाहीत याची खात्री करणे. नवीन उपकरणे सुरक्षितपणे सामावून घेण्यासाठी वीज वितरणाचे नियमितपणे पुनरावलोकन करणे.

9.   पाणी फवारणी प्रणाली आणि होझ पाईप बसवणे: आयसीयु आणि शस्त्रक्रिया विभागासह अती महत्वाच्या विभागांमध्ये सहज उपलब्ध होईल अशी स्वयंचलित पाणी फवारणी प्रणाली आणि होझ पाईप बसवणे. ही प्रणाली फायर अलार्म प्रणालीशी जोडली जावी, जी आगीच्या वेळी कार्यान्वित होईल.

10. नॅशनल बिल्डिंग कोडचे (बांधकाम नियमन) कठोर पालन: नॅशनल बिल्डिंग कोड 2016 मध्ये नमूद केलेल्या नवीन अग्निसुरक्षा मानकांचे पालन करण्यासाठी रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांचे नियमितपणे पुनरावलोकन आणि अद्ययावतीकरण करणे. यामध्ये कॉरिडॉर आणि पायऱ्यांमध्ये योग्य पद्धतीने हवा खेळती ठेवणारी प्रणाली, आग-प्रतिरोधक दरवाजे आणि आपत्कालीन प्रकाश योजना सुनिश्चित करणे, या बाबींचा समावेश आहे.

11.  अग्निसुरक्षा एनओसी मिळवणे: राज्य अग्निसुरक्षा नियमांनुसार स्थानिक अग्निशमन विभागाकडून दरवर्षी अग्निसुरक्षा ना-हरकत प्रमाणपत्राचे नूतनीकरण करून घेणे. यामध्ये अद्ययावत अग्निसुरक्षा योजना आणि उपकरणांची देखभाल आणि कर्मचारी प्रशिक्षणाच्या नोंदी सादर करणे, याचा समावेश आहे. 

12. कर्मचारी प्रशिक्षण आणि कवायती: सर्व कर्मचाऱ्यांसाठी अग्निरोध, आपत्कालीन कार्यपद्धती आणि अग्निशामक उपकरणांचा वापर याविषयी सातत्याने प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे. कर्मचारी, डॉक्टर आणि रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत कसा प्रतिसाद द्यायचा हे माहीत आहे, याची खात्री करण्यासाठी, इव्हॅक्युएशन ड्रिलसह (बचाव कार्य कवायती) द्वैवार्षिक फायर ड्रिल आयोजित करणे.

13. इव्हॅक्युएशन (निर्वासन) योजना: सर्वसमावेशक निर्वासन योजना विकसित करणे, यामध्ये बाहेर जाण्याचा सुस्पष्ट चिन्हांकित मार्ग निश्चित करणे, अडथळे नसलेला सुटकेचा मार्ग, आणि एकत्र येण्याची सुरक्षित जागा निश्चित करणे या बाबींचा समावेश आहे. योजना संपूर्ण रुग्णालयात आणि कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये ठळकपणे प्रदर्शित करावी. प्रत्येक रुग्णालयाने आगीच्या प्रसंगी पालन करण्याची सर्वसामान्य कार्यपद्धती (एसओपी) विकसित करावी.

या सुरक्षा उपायांची कठोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी त्याचा पाठपुरावा आणि पुनरावलोकन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

***

M.Pange/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2016245) Visitor Counter : 117