नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

अर्थव्यवस्थेत, हायड्रोजन आणि इंधन सेल्स मधील आंतरराष्ट्रीय भागीदारीविषयक 41 व्या सुकाणू समितीच्या बैठकीत, हरित हायड्रोजन आणि त्याच्याशी संबंधित डेरिव्हेटिव्ह्जविषयी चर्चा

Posted On: 20 MAR 2024 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 20 मार्च 2024

अर्थव्यवस्थेत हायड्रोजन आणि इंधन सेल्ससाठी आंतरराष्ट्रीय भागीदारी(आयपीएचई) विषयक 41 व्या सूकाणू समितीच्या बैठकीचे नवी दिल्लीत 18 ते 22 मार्च 2024 दरम्यान आयोजन करण्यात आले असून, या समितीने 19 मार्च 2024 पासून आपल्या औपचारिक कामकाजाला सुरुवात केली. समितीच्या बैठकीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच, 19 आणि 20 तारखेला, नवी दिल्लीतल्या सुषमा स्वराज भवन इथे, 41 व्या सुकाणू समितीचे औपचारिक कामकाज होत आहे.

पहिल्या दिवशीच्या आयपीएचईच्या सुकाणू समितीच्या कामकाजात, समितीचे उपाध्यक्ष डॉ. नो व्हॅन हस्ट यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात, भारताच्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानाची प्रशंसा केली  तसेच समितीच्या प्रतिनिधींसाठी भारताने दिलेल्या आदरातिथ्याचेही कौतुक केले.

आपल्या स्वागतपर भाषणात, नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाचे संयुक्त सचिव अजय यादव यांनी अर्थव्यवस्थेला कार्बन मुक्त करण्यासाठी हरित हायड्रोजनचा वापर करण्याच्या महत्त्वावर भर देत, या संदर्भात परस्पर सहकार्य वाढवण्याची गरज व्यक्त केली.

आयपीएचईच्या या बैठकीत, ऑस्ट्रिया, चिली, फ्रान्स, युरोपियन कमिशन, जपान, जर्मनी, नेदरलँड्ससंयुक्त अरब अमिराती, ब्रिटन, अमेरिका, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया येथील प्रतिनिधींव्यतिरिक्त यजमान भारताच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला आणि हरित हायड्रोजन आणि त्याच्या डेरिव्हेटिव्ह्जच्या वापराशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा केली.

तसंच, या बैठकीत, आंतरराष्ट्रीय स्तरावर, हरित हायड्रोजनला चालना देण्यासाठी हाती घेण्यात आलेले उपक्रम, ज्यात, ग्लासगो अजेंडा, हायड्रोजन ऊर्जा मंत्रिस्तरीय बैठक, स्वच्छ ऊर्जा मंत्रिस्तरीय बैठक, एच 2 उपक्रम, क्लीन हायड्रोजन मिशन उपक्रम, जी 7 हायड्रोजन कृती आराखडा, जी 20, कॉप-28, आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था अशा विविध उपक्रमांची दखल घेण्यात आली. आयपीएचई उद्दिष्टे आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी या आंतरराष्ट्रीय उपक्रमांना अधिकाधिक सहकार्य करण्याच्या संधी कुठल्या असू शकतील, यावरही चर्चा झाली. (सर्व ठिकाणी तसेच विविध क्षेत्रांत हायड्रोजन आणि इंधन सेल तंत्रज्ञानाचा वापर करून, स्वच्छ आणि कार्यक्षम ऊर्जा आणि गतिमान प्रणालींकडे संक्रमण सुलभ आणि वेगवान करणे हे आयपीएचईचे मुख्य उद्दिष्ट आहे.)

 

पाच दिवसांच्या या सुकाणू समितीच्या बैठकीच्या पहिल्या दिवशी, म्हणजे 18 मार्च 2024 रोजी आयआयटी दिल्ली इथे आयपीएचई अकॅडेमिक आउटरिच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात,परिषदेच्या प्रतिनिधींनी हायड्रोजन आणि इंधन सेल तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दल महत्वाची माहिती दिली.

अधिक माहिती इथे वाचा.

S.Patil/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2015699) Visitor Counter : 58