संरक्षण मंत्रालय

राष्ट्रीय महामार्ग 16 वरील आपत्कालीन लँडिंग सुविधेच्या कार्याची सुरुवात

Posted On: 19 MAR 2024 10:06AM by PIB Mumbai

भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने तसेच मालवाहतूक विमानांनी काल, 18 मार्च 2024 रोजी बापटला जिल्ह्यातील अद्दनकी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्र.16 वर असलेल्या आपत्कालीन लँडिंग सुविधेच्या (ईएलएफ) वापराला सुरुवात केली. या सक्रीयीकरणादरम्यान एसयु-30 आणि हॉक लढाऊ विमानांनी या परिसरावर यशस्वीपणे भराऱ्या मारल्या तर एएन-32 आणि डॉर्नियर मालवाहू विमानांनी या धावपट्टीवरुन उड्डाण घेऊन लँडिंग देखील केले. या कार्यान्वयनादरम्यान, अत्यंत गुंतागुंतीच्या बहुआयामी प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), जिल्हा प्रशासन, राज्य पोलीस दल यांसारख्या नागरी संस्था आणि भारतीय हवाई दल यांच्यातील उच्च स्तरावरील समन्वय आणि उत्तम संपर्क व्यवस्थेचे दर्शन घडले.
यापूर्वी, 29 डिसेंबर 2022 रोजी अशाच पद्धतीची सक्रीयीकरण प्रक्रिया राबवण्यात आली होती. यासाठी, भारतीय हवाई दलाच्या निर्देशित तपशीलांबरहुकुम एनएचएआयने सिमेंटचा वापर करून  4.1 किमी लांब आणि 33 मीटर रुंद धावपट्टी बांधली आहे. देशाच्या इतर भागातील अशा पद्धतीच्या धावपट्ट्यांचा वापर यापूर्वीच सुरु झाला असून आंध्रप्रदेशातील या ईएलएफचा द्वीपकल्पीय भारतात नुकताच वापर सुरु करण्यात आला.
महामार्गांवर उभारलेल्या या ईएलएफमुळे आकस्मिक घटनांच्या काळात हवाई परिचालनातील लवचिकता वाढते आणि या प्रकारच्या धावपट्ट्या दुर्गम भागांमध्ये मानवतावादी मदत तसेच आपत्ती निवारण (एचएडीआर) कार्यादरम्यान अत्यंत अनमोल मालमत्ता ठरतात. देशभरात इतरत्र योग्य ठिकाणी अशाच पद्धतीच्या ईएलएफ्सची उभारणी करण्याच्या दिशेने भारतीय हवाई दल आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (एमओआरटीएच) संयुक्तपणे कार्य करत आहेत.

***

JPS/SC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2015503) Visitor Counter : 69