रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वे आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये मालवाहतूक व्यवसाय, एकूण महसूल आणि रेल्वे मार्गांची निर्मिती यामध्ये आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवण्याच्या दिशेने अग्रेसर
भारतीय रेल्वेने आज मालवाहतुकीत 1500 दशलक्ष टनांचा टप्पा ओलांडला
भारतीय रेल्वेचा आतापर्यंतचा एकूण महसूल 2. 40 लाख कोटी रुपये
चालू आर्थिक वर्षात भारतीय रेल्वेने 5100 किलोमीटर रेल्वेमार्गाचे काम केले पूर्ण
Posted On:
15 MAR 2024 2:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 मार्च 2024
भारतीय रेल्वे आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये मालवाहतूक व्यवसाय, एकूण महसूल आणि रेल्वे मार्गांची निर्मिती यामध्ये आपल्या आतापर्यंतच्या इतिहासातील उत्कृष्ट कामगिरी नोंदवण्याच्या दिशेने अग्रेसर आहे.
प्राथमिक आकडेवारीनुसार भारतीय रेल्वेने आज 15 मार्च 2024 रोजी मालवाहतुकीचा 1500 दशलक्ष टनांचा टप्पा ओलांडला आहे. याआधी भारतीय रेल्वेने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये मालवाहतुकीत 1512 दशलक्ष टनांची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवली होती.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतीय रेल्वेचा आजपर्यंतचा एकूण महसूल 2. 40 लाख कोटी रुपये इतका आहे. गेल्या वर्षी 15 मार्च रोजी, एकूण महसूल 2.23 लाख कोटी रुपये इतका होता, म्हणजेच यावर्षी 17000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतीय रेल्वेचा एकूण खर्च 2.26 लाख कोटी रुपये आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये प्रवाशांची एकूण संख्या 648 कोटी इतकी होती. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या आकडेवारीच्या तुलनेत यामध्ये 52 कोटी इतकी वृद्धी झाली आहे. गेल्या वर्षी एकूण 596 कोटी प्रवाशांनी रेल्वेमधून प्रवास केला होता.
चालू आर्थिक वर्षात आजपर्यंत भारतीय रेल्वेने 5100 किलोमीटर इतके रेल्वेमार्ग (ट्रॅक) टाकण्याचे काम साध्य केले आहे. या आर्थिक वर्षात, दररोज सरासरी 14 किलोमीटर लांबीचे रेल्वेमार्ग टाकण्यात आले.
* * *
S.Kane/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2014892)
Visitor Counter : 99