युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

खेलो इंडिया उदयोन्मुख प्रतिभेचा शोध, खेळांना महत्त्वाकांक्षी विजेत्या खेळाडूंच्या दारापर्यंत नेईल: अनुराग सिंह ठाकूर


9 ते 18 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांमधील प्रतिभा शोधण्याच्या उद्देशाने, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते चंदीगडमध्ये कीर्ती चे उद्घाटन

Posted On: 12 MAR 2024 7:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 मार्च 2024 

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी मंगळवारी चंदीगड येथील सेक्टर 7 क्रीडा संकुलात अनोख्या खेलो इंडिया उदयोन्मुख प्रतिभा शोध (कीर्ती) कार्यक्रमाचे उद्घाटन केले. देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेणे आणि अमली पदार्थांची व्यसनाधीनता आणि इतर लक्ष विचलित करणाऱ्या साधनांपासून रोखण्यासाठी खेळाचा एक साधन म्हणून वापर करणे ही नऊ ते 18 वर्षे वयोगटातील शालेय मुलांसाठी असलेल्या, देशव्यापी योजनेची दोन मुख्य उद्दिष्टे आहेत.

एका स्वच्छ, निरभ्र वातावरणात ठाकूर यांनी भर दिला की कीर्ती हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे क्रीडा संस्कृती रुजवण्याचे आणि ऑलिम्पिक आणि आशियाई खेळांसारख्या जागतिक स्पर्धांमध्ये भारताला पदके मिळवून देणारे प्रतिभावान खेळाडू घडवण्याचे स्वप्न होते.

कीर्तीचे भारतातील 50 केंद्रांवर भव्य उदघाटन झाले. ऍथलेटिक्स, मुष्टियुद्ध, कुस्ती, हॉकी, फुटबॉल सह 10 क्रीडाप्रकारातील पहिल्या टप्प्यात पन्नास हजार अर्जदारांचे मूल्यांकन केले जात आहे.अधिसूचित प्रतिभा मूल्यांकन केंद्रांद्वारे प्रतिभावान खेळाडू पारखण्यासाठी वर्षभरात देशभरात 20 लाख मूल्यांकन करण्याचे कीर्ती चे उद्दिष्ट आहे.

या प्रमाणात शोध आणि प्रशिक्षण कार्यक्रम हा भारतामधील पहिला कार्यक्रम आहे आणि तो अशा वेळी सुरू होत आहे जेव्हा देशाला “2036 पर्यंत जगातील अव्वल 10 क्रीडा राष्ट्रांपैकी एक राष्ट्र बनायचे आहे आणि 2047 पर्यंत अव्वल पाचमध्ये स्थान मिळवायचे आहे” असे ठाकूर यांनी उद्धृत केले.

युवक हे राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत आणि क्रीडा क्षेत्रात विजयासाठी लहानपणापासूनच प्रारंभ करायला हवा यावर ठाकूर यांनी भर दिला. ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी खेळाडूला किमान 10 वर्षांची तयारी आवश्यक असल्याचे सांगून मंत्री म्हणाले, “कीर्तीला देशातील प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचायचे आहे आणि अशा मुलांशी संपर्क साधायचा आहे ज्यांना खेळण्याची आवड आहे परंतु त्याचे तंत्र अवगत नाही. आम्हाला माहित आहे की खेळ खेळणारे प्रत्येक मूल पदक जिंकू शकत नाही परंतु किमान खेळाद्वारे तरुणांना अमली पदार्थ आणि इतर व्यसनांपासून दूर ठेवण्याचा आमचा मानस आहे. प्रत्येक मुलाने माय भारत पोर्टलवर नोंदणी करण्याचे मी आवाहन करतो आणि त्यांच्यापर्यंत पोहोचून कीर्ती द्वारे संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची असेल.”

कीर्ती चा खेळाडू -केंद्रित कार्यक्रम माहिती तंत्रज्ञानावर आधारित पारदर्शक निवड पद्धतीमुळे सुस्पष्ट आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित माहिती विश्लेषणाचा उपयोग एखाद्या आकांक्षी खेळाडूमधील क्रीडा नैपुण्य जोखण्यासाठी केला जात आहे. या विस्तृत प्रतिभा शोध प्रणालीसाठी राष्ट्रीय क्रीडा महासंघ आणि राज्य सरकार यांच्याशी धोरणात्मक सहयोगाची आवश्यकता असेल असे ठाकूर यांनी नमूद केले. सरकारने पायाभूत सुविधांवर आधीच 3000 कोटी रुपये खर्च केले आहेत आणि देशभरात 1000 हून अधिक खेलो इंडिया केंद्रे आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

चंदीगडच्या खासदार किरण खेर, चंदीगड प्रशासनाचे सल्लागार राजीव वर्मा, आणि हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्य पदक विजेता आणि उदयोन्मुख भालाफेकपटू आणि पॅरिस ऑलिम्पिक पदक स्पर्धक किशोर कुमार जेना, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.  

किरण खेर यांनी कीर्ती (KIRTI) कार्यक्रमाची प्रशंसा केली, आणि त्या म्हणाल्या की चंदीगडने कपिल देव, युवराज सिंह आणि अभिनव बिंद्रा यांच्या सारखे ख्यातनाम खेळाडू दिले असून, ही योजना खेळाडूंना प्रोत्साहन देणारी आहे.

“आपल्या मुलाने आयुष्यात काहीतरी मिळवावे अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. पण अनेकदा स्वप्न वास्तवात उतरत नाही. किमान खेळात तरी कीर्ती कार्यक्रम ही उणीव भरून काढायला  मदत करेल. आता खेळण्यासाठी आणि खेळात प्राविण्य मिळवू इच्छिणाऱ्या प्रत्येक मुलाला एक मार्ग मिळेल,” किरण खेर म्हणाल्या.

चंदीगडमधील सेक्टर 7 क्रीडा संकुलात आयोजित निवड प्रक्रियेमध्ये अनेक युवा मुले आणि मुली सहभागी झाले होते. 14 वर्षीय धावपटू अमन शर्मा आणि 17 वर्षीय वॉकर जसकरण सिंग यांच्यासाठी कीर्ती कार्यक्रमाने संधीचे मोठे दालन खुले केले आहे. “आम्हाला आता माहित आहे की प्रशिक्षण घेण्यासाठी कुठे जायचे. ‘किर्ती’ खरोखरच आम्हाला प्रेरित करत आहे,” पॅरिसला जाणाऱ्या जेनासोबत फोटो-ऑपसाठी प्रतीक्षा करणारा जसकरण म्हणाला.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी जेनाचा सत्कार केला. गेल्या वर्षी बुडापेस्ट येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा आणि जागतिक ऍथलेटिक्स परिषदेत नीरज चोप्राला आव्हान देणारा क्रीडापटू म्हणाला: “खेळाडूंना सुरुवातीच्या काळात पुरेसे सहकार्य मिळत नाही, हे मी यापूर्वी सांगितले केले आहे. जेव्हा ते पदके जिंकू लागतात तेव्हा त्यांना आर्थिक आणि नैतिक पाठिंबा मिळतो, असे होता कामा नये. कीर्ती (KIRTI) ही एक उत्तम योजना आहे आणि ती मुलांना योग्य वयात संधी देत आहे. हे खेळाडू ऊर्जेने परिपूर्ण असून, त्यांची प्रतिभा लक्षात आल्यावर त्याची जोपासना आणि संवर्धन करण्याची हीच वेळ आहे.” ठाकूर यांनी 2030 मध्ये युवा ऑलिम्पिक आणि 2036 मध्ये उन्हाळी ऑलिंपिकचे आयोजन करण्याची भारताची मनीषा असल्याचा पुनरुच्चार केला.

“आपल्याला जागतिक महासत्ता बनायचे असेल तर आपल्याला क्रीडा क्षेत्रातील सॉफ्ट पॉवरचे प्रदर्शन करावे लागेल आणि भांडवलाप्रमाणे त्याचा वापर करावा लागेल. संगीत, चित्रपट आणि खेळ ही माध्यमे आहेत आणि या सर्व क्षेत्रांमध्ये आपली चांगली कामगिरी आहे. कीर्ती (KIRTI) केवळ त्याला मजबुती देण्यासाठी उपयोगी ठरेल. सरकारच्या बाजूने, केवळ व्यवसाय सुलभता आणणे गरजेचे आहे आणि ते सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे,” केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.

 

अनुराग ठाकुर यांनी केलेल्या कीर्ती योजनेच्या उद्घाटनाच्या ट्विटर लिंक्स:

https://x.com/ianuragthakur/status/1767477378547142685?s=48&t=i-_pAF8vR1iF0agU_b9IbA

https://x.com/ANI/status/1767438111389204991?t=8ZMxw24qK_PTE22LLduWdw&s=08

 

खेलो इंडिया मिशन

खेलो इंडिया योजना ही केंद्रसरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाची महत्वाकांक्षी  योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून उतरलेल्या खेलो इंडिया मिशनचे उद्दिष्ट देशात क्रीडा संस्कृती रुजवणे आणि क्रीडा क्षेत्रात उत्कृष्टता प्राप्त करणे, हे आहे. ज्यामुळे देशातील क्रीडापटू आपल्या सर्वोत्तम कामगिरीमधून जागतिक क्रीडा क्षेत्रात प्रभाव पाडतील. खेलो इंडिया योजनेच्या "क्रीडा स्पर्धा आणि प्रतिभा विकास" उपक्रमांतर्गत, "प्रतिभा ओळख आणि विकास" हा घटक देशातील क्रीडा परिसंस्था विकसित करण्यासाठी तळागाळातील आणि उच्चभ्रू स्तरावरील खेळाडूंची निवड करून त्यांच्या विकासाकरता काम करण्यासाठी समर्पित आहे.

 

* * *

S.Patil/Vasanti/Rajshree/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2013902) Visitor Counter : 74