भारतीय निवडणूक आयोग

निवडणूक क्षेत्रात योग्य वातावरण राखण्यासह सैन्याची, कर्मचारी आणि यंत्र तैनाती तसेच प्रलोभन, बळजबरी आणि भय मुक्त निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी; मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे सुमारे 2100 निरीक्षकांना मार्गदर्शन


लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी सामान्य, पोलीस आणि खर्च निरीक्षकांना माहिती देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून एकदिवसीय सत्राचे आयोजन

Posted On: 11 MAR 2024 8:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 मार्च 2024

 

लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय निवडणूक आयोगाने आज राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये तैनात केलेल्या निरीक्षकांसाठी मार्गदर्शन  सत्र आयोजित केले होते.

नवी दिल्लीतील विज्ञान भवनात हायब्रीड पद्धतीने आयोजित केलेल्या मार्गदर्शन सत्राला भारतीय प्रशासकीय सेवेतील, भारतीय पोलीस सेवेतील तसेच भारतीय महसूल सेवेतील अधिकारी आणि इतर काही केंद्रीय सेवांमधील 2150 हून अधिक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. काही अधिकारी त्यांच्या संबंधित राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून आभासी माध्यमातून सामील झाले. आगामी निवडणुकीसाठी सुमारे 900 सामान्य निरीक्षक, 450 पोलीस निरीक्षक आणि 800 खर्च निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत.

निरीक्षकांना त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची आठवण करून देत, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी त्यांना मुक्त, निःपक्ष , भयमुक्त आणि प्रलोभनमुक्त निवडणुकांसाठी योग्य वातावरण  सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले.आयोगाचे प्रतिनिधी म्हणून निरीक्षकांचे वर्तन व्यावसायिक असावे  आणि उमेदवारांसह सर्व हितसंबंधितांना  त्यांच्याशी संपर्क साधता यावा यासाठी उपलब्ध असणे हे अपेक्षित आहे, यावर मुख्य निवडणूक आयुक्तांनी भर दिला. निरीक्षकांना निवडणूक क्षेत्रात  कठोर मात्र  विनम्र वागण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.निरीक्षकांनी  मतदान केंद्रांना भेट देऊन भौगोलिक परिस्थितीची   माहिती करून घ्यावी आणि कोणत्याही असुरक्षित आणि संवेदनशील भागांचा आढावा घेण्यास त्यांनी  सांगितले.

आयोगाने सर्व परिपत्रकांचा  मसुदा पुन्हा तयार केला आहे आणि  माहिती पुस्तिका  नियम पुस्तिका अद्ययावत केल्या असून  केंद्रीय निवडणूक आयोगाने  त्यांच्या संकेस्थस्थळावर  शोधण्यायोग्य आणि वाचण्यास सोप्या स्वरूपात उपलब्ध  करून दिल्या आहेत, असेही कुमार यांनी नमूद केले. काय करावे आणि काय करू नये या पडताळणी यादीसह विविध अधिकाऱ्यांच्या भूमिका आणि कार्यांच्या आधारे नियम पुस्तिका  आणि माहिती पुस्तिका  तयार करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

या मार्गदर्शन सत्रा  दरम्यान, सर्व निरीक्षकांना आयोगाच्या विविध नवीन उपक्रम आणि दिशानिर्देशांबद्दल संवेदनशील बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण सूक्ष्म दृष्टिकोनाबद्दल  माहिती देण्यात आली. मार्गदर्शन सत्रादरम्यान खालील गोष्टींवर जोर देण्यात आला:

निरीक्षकांना संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान, त्यांना नेमून दिलेल्या  संसदीय मतदारसंघाच्या हद्दीतून  कुठेही न हलण्याचे निर्देश देण्यात आले   त्यांच्या वाहनात जीपीएस ट्रॅकिंग बसवण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

निरीक्षकांना मुख्य निवडणूक अधिकारी /जिल्हा संकेतस्थळावर  त्यांचे मोबाइल/लँडलाइन क्रमांक/ईमेल पत्ते/मुक्कामाची ठिकाणे इत्यादी व्यापकपणे प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत; इलेक्ट्रॉनिक/मुद्रित माध्यमाद्वारे आणि ही माहिती  उमेदवार/मान्यताप्राप्त राजकीय पक्षांमध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी (डीईओ) /क्षेत्रीय अधिकारी (आरओ) यांच्याद्वारे त्यांच्या संबंधित मतदारसंघात निरीक्षकांच्या आगमनाच्या दिवशी प्रसारित केली  जाणे आवश्यक आहे.

निरीक्षकांना त्यांच्या फोनवर/ई-मेलवर नेहमी उपलब्ध राहण्यास आणि उमेदवार/राजकीय पक्ष/सामान्य  लोक/निवडणूक कर्तव्यावरील कर्मचारी इत्यादींनी संपर्क साधल्यास  उपस्थित राहण्यास/प्रतिसाद देण्यास सांगण्यात आले आहे . यासंदर्भातील कोणत्याही तक्रारींची आयोगाकडून गांभीर्याने दखल घेतली जाईल.

निरीक्षकांसह संपर्क अधिकारी आणि सुरक्षा अधिकारी म्हणून जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी  प्रामाणिक  लोक तैनात करावेत. या संपर्क अधिकारी/सुरक्षा अधिकाऱ्यांना तटस्थता राखण्यासाठी आणि त्यांच्या कर्तव्यात प्रामाणिकपणे आणि सचोटीने उपस्थित राहण्याबाबत योग्यरित्या माहिती दिली जाईल आणि जागरूक  केले जाईल.

निरीक्षकांना त्यांची अनिवार्य कर्तव्ये म्हणजे सुरक्षा दलांची तैनाती, यादृच्छिकीकरणाची प्रक्रिया, राजकीय पक्षांद्वारे सुविधा पोर्टलचा वापर आणि सर्व उमेदवार/राजकीय पक्षांसाठी योग्य वातावरण सुनिश्चित करण्याच्या प्रक्रियेत पूर्णपणे साक्षीदार आणि समाधानी राहणे  ही प्रामाणिकपणे पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले  आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान त्यांना त्यांच्या नियमित  कामकाजाच्या पलीकडे जाऊन काम करण्याची गरज आहे. 

निरीक्षकांनी जास्तीत जास्त मतदान केंद्रांच्या ठिकाणांना आणि संवेदनशील भागांना भेटी देऊन तेथील रहिवाशांशी संवाद साधावा आणि अशा क्षेत्रांतील असुरक्षितता/जोखीम ओळखून त्याबाबत उपाययोजनांची खातरजमा करावी असे सूचित करण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय निवडणूक अधिकारी (डीईओ)/निर्णय अधिकारी (आरओ) द्वारे बोलावलेल्या उमेदवार/राजकीय पक्षांच्या बैठकांचे निरीक्षण करणे आणि त्यांच्या तक्रारी योग्य रीतीने ऐकल्या जातात आणि त्यावर कार्यवाही केली जाते हे पाहण्याचे देखील निरीक्षकांना निर्देश देण्यात आले होते. 

मतदानाच्या दिवशी मतदानाच्या वेळी, शक्य तितक्या मतदान केंद्रांना भेटी देण्यासाठी आणि मतदान केंद्रांमधील परिस्थितीचे नियमितपणे मूल्यांकन करण्यासाठी आणि मतदान भयमुक्त आणि निष्पक्षपणे सुरू आहे याची खात्री करण्यासाठी निरीक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. 

केंद्रीय दले/राज्य पोलिस दलांचा न्याय्यपणे वापर केला जात आहे आणि तटस्थता राखली जात आहे तसेच त्यांची तैनाती कोणत्याही राजकीय पक्ष/उमेदवारांना अनुकूल नाही हे पाहण्यास निरीक्षकांना सांगण्यात आले. 

दिवसभराच्या मार्गदर्शन सत्रादरम्यान, वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त, डीईसी आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या डीजी द्वारे अधिकाऱ्यांना निवडणूक व्यवस्थापनाच्या विविध पैलूंबद्दल सर्वसमावेशक आणि सखोल माहिती देण्यात आली. निवडणूक नियोजन, निरीक्षकांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या, मतदार यादीतील समस्या, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, कायदेशीर तरतुदी, ईव्हीएम/व्हीव्हीपॅट व्यवस्थापन, मीडिया संलग्नता आणि आयोगाच्या स्वीप (सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन) या पथदर्शी कार्यक्रमांतर्गत मतदारांच्या सुविधेसाठी हाती घेतलेल्या विस्तृत उपक्रमांवर तपशीलवार संकल्पनात्मक सादरीकरण करण्यात आले. 

मतदारांच्या सुविधेसाठी आयोगाने सुरू केलेले विविध माहिती तंत्रज्ञान उपक्रम आणि मोबाईल ऍप्लिकेशन्स तसेच मतदान केंद्रावरील निवडणूक प्रक्रियेचे प्रभावी आणि कार्यक्षम व्यवस्थापन याबाबत निरीक्षकांना अवगत करण्यात आले.

निरीक्षकांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट चे कार्यात्मक प्रात्यक्षिक देण्यात आले आणि ईव्हीएम परिसंस्थेला पूर्णपणे सुरक्षित, मजबूत, भरवशाचे, बिनधोक आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी विविध तांत्रिक सुरक्षा वैशिष्ट्ये, प्रशासकीय नियमावली आणि प्रक्रियात्मक सुरक्षा उपायांची माहिती देण्यात आली.

निरीक्षकांना त्यांचे काम सुलभ करण्यासाठी निवडणूक व्यवस्थापनाशी संबंधित सर्व विषयांवर नुकतीच अद्ययावत आणि सर्वसमावेशक पुस्तिका, हँडबुक, सूचनांचे संकलन, काय करावे आणि काय करू नये याबद्दल माहिती देण्यात आली. कोणत्याही सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वांबाबत सहजतेने जाणून घेण्यासाठी हे सर्व भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ईबुक स्वरूपात उपलब्ध आहे.

 

पार्श्वभूमी

आयोग हा लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 20 ब आणि राज्यघटनेच्या पूर्ण अधिकारांनुसार निरीक्षक नियुक्त करतो. निरीक्षकांवर निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षण, भयमुक्त वातावरण, निष्पक्षता आणि विश्वासार्हता ही महत्त्वाची आणि जोखमीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे जी आपल्या लोकशाही राज्यव्यवस्थेचा पाया आहे. आयोग आपल्या सामान्य, पोलीस आणि खर्च निरीक्षकांवर खूप विश्वास ठेवतो आणि भयमुक्त तसेच निःपक्षपाती निवडणुकांमध्ये अशा निरीक्षकांची भूमिका आयोगासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

हे केंद्रीय निरीक्षक आयोगाला मुक्त, निष्पक्ष, पारदर्शक आणि सर्वसमावेशक निवडणुका घेण्याच्या संवैधानिक आदेशाची पूर्तता करण्यासाठीच मदत करत नाहीत तर मतदार जागरूकता आणि निवडणुकीत सहभाग वाढवण्यासाठी देखील मदत करतात. निवडणूक निरीक्षणाचा मुख्य उद्देश सुधारणांसाठी क्षेत्रे ओळखणे आणि ठोस आणि कार्यात्मक शिफारसी तयार करणे हा आहे. हे निरीक्षक आयोगाचे कर्ण चक्षू म्हणून ओळखले जातात.

 

* * *

S.Patil/SonalC/Vasanti/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2013579) Visitor Counter : 158