राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींनी वायुदलाला प्रेसिडेन्ट्स स्टँडर्ड आणि प्रेसिडेन्ट्स कलर्स हे सन्मान ध्वज केले प्रदान
प्रविष्टि तिथि:
08 MAR 2024 1:07PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (8 मार्च, 2024) हिंडन (उत्तर प्रदेश) येथील हवाई दल तळावर झालेल्या एका कार्यक्रमात 45 स्क्वाड्रन आणि 221 स्क्वाड्रनला प्रेसिडेन्ट्स स्टँडर्ड आणि 11 बेस रिपेअर डेपो आणि 509 सिग्नल युनिटला प्रेसिडेन्ट्स कलर्स हे सन्मानध्वज प्रदान केले.
आपल्या देशाच्या संरक्षणात भारतीय हवाई दलाचे योगदान सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिले गेले आहे. हवाई दलातील योद्ध्यांनी 1948,1965,1971 आणि 1999 च्या युद्धांमध्ये अदम्य धैर्य, समर्पण आणि आत्मत्याग केला आहे. देशा-विदेशातील आपत्तीच्या वेळी मदत आणि बचावकार्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आपल्या शूर हवाई सैनिकांनी दाखवलेली कर्तव्याप्रतीची निष्ठा आणि दृढनिश्चय हा सर्व नागरिकांसाठी प्रेरणेचा स्रोत आहे असे याप्रसंगी राष्ट्रपती म्हणाल्या.
भारतीय हवाई दल केवळ देशाचेच रक्षण करत नाही तर भारताच्या अंतराळ कार्यक्रमात देखील महत्त्वपूर्ण योगदान देत आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी निवडलेले चार अंतराळवीर हे हवाई दलाचे अधिकारी आहेत. हवाई दलाचे सर्व अधिकारी आणि सैनिकांसाठी ही अभिमानाची बाब आहे असे त्यांनी सांगितले.
वेगाने बदलत्या या युगात सुरक्षेच्या गरजा आणि प्राधान्यक्रमही वेगाने बदलत आहेत. इतर क्षेत्रांप्रमाणेच संरक्षण क्षेत्रातही तंत्रज्ञानाची भूमिका अधिक महत्त्वाची होत चालली आहे असे राष्ट्रपती म्हणाल्या. भारतीय हवाई दल गेल्या काही वर्षांपासून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहे हे पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपतींनी सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या आणि भारतीय हवाई दलाच्या सर्व शाखांमध्ये महिलांना समान संधी दिल्या जात आहेत ही आनंदाची बाब असल्याचे सांगितले. महिलांना हवाई दलात नोकरी करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. येणाऱ्या काळात अधिकाधिक मुली हवाई दलात भरती होतील आणि देशाची सेवा करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हवाई दलात महिलांचे प्रतिनिधित्व वाढल्याने हे दल अधिक समावेशक होईल, असेही त्या म्हणाल्या.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा-
***
JPS/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2012815)
आगंतुक पटल : 124