युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात 5 आणि 6 मार्च रोजी राष्ट्रीय युवा संसद महोत्सव, 2024 च्या अंतिम फेरीचे आयोजन
29 राज्यस्तरीय विजेत्यांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कारासाठी स्पर्धा
Posted On:
04 MAR 2024 7:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 मार्च 2024
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात 5 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 च्या अंतिम फेरीचे आणि 6 मार्च 2024 रोजी समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
'तरुणाईचा आवाज:राष्ट्र परिवर्तनासाठी कार्यरत आणि सक्षम' या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय युवा संसदेचे यंदा आयोजन करण्यात आले आहे.
9 फेब्रुवारी 2024 ते 6 मार्च 2024 या कालावधीत देशभरात राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले . या युवा संसदेचे आयोजन देशातील 785 जिल्ह्यांमध्ये तीन स्तरांवर करण्यात आले आहे.
9 फेब्रुवारी 2024 ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत जिल्हा युवा संसदेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा युवा संसद-2024 चे विजेते 19 ते 24 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आयोजित राज्य युवा संसदेत सहभागी झाले होते.
5 आणि 6 मार्च 2024 रोजी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये होणाऱ्या राष्ट्रीय युवा संसद-2024 च्या अंतिम फेरीसाठी सत्याऐंशी (87) राज्यस्तरीय विजेते नवी दिल्ली येथे एकत्र येतील.राष्ट्रीय युवा संसदेत सत्याऐंशी राज्य विजेते (प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक विजेते) सहभागी होतील, त्यापैकी 29 (प्रत्येक राज्य युवा संसदेतील प्रथम क्रमांकप्राप्त ) दिलेल्या विषयांवर आपले विचार मांडतील. उर्वरित 58 सहभागी राष्ट्रीय युवा संसदेत प्रेक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पार्श्वभूमी :
नेहरू युवा केंद्र संघटना (एनवायकेएस) आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांच्या माध्यमातून युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, जिल्हा युवा संसद, राज्य युवा संसद आणि राष्ट्रीय युवा संसदेचे आयोजन करते. लोकशाहीची मुळे घट्ट करण्यासाठी; आरोग्यदायी शिस्तीच्या सवयी, इतरांच्या दृष्टिकोनाबाबत सहिष्णुता आणि तरुणांना संसदेच्या पद्धती आणि कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी सक्षम करणे हा या युवा संसदेचा उद्देश आहे. सक्रिय नागरिकांच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यात आणि तरुणांच्या सहभागाला आणि कार्यरत राहण्याला प्रोत्साहन देण्यास युवा संसद मदत करते. ही युवा संसद तरुणांमधील नेतृत्व गुणांना प्रोत्साहन देते आणि त्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेची जाणीव करून देण्यास आणि राष्ट्र उभारणीत योगदान देण्यास सक्षम करते.
राष्ट्रीय युवा संसद महोत्सव (एनवायपीएफ) 31 डिसेंबर 2017 रोजी पंतप्रधानांनी त्यांच्या मन की बात भाषणात दिलेल्या संकल्पनेवर आधारित आहे.
* * *
S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2011381)
Visitor Counter : 131