पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील कृष्णनगर येथे 15,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची केली पायाभरणी आणि लोकार्पण


पुरुलियामध्ये रघुनाथपूर येथे रघुनाथपूर औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या दुसर्‍या टप्प्याची (2x660 MW) केली पायाभरणी

मेजिया औष्णिक ऊर्जा केंद्राच्या युनिट 7 आणि 8 च्या फ्लू गॅस डिसल्फ्युरायझेशन (FGD) प्रणालीचे केले उद्घाटन

राष्ट्रीय महामार्ग -12 वरील फरक्का-रायगंज विभागातील रस्त्याच्या चौपदरीकरण प्रकल्पाचे केले उद्घाटन

पश्चिम बंगालमधील 940 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या चार रेल्वे प्रकल्पांचे केले लोकार्पण

पश्चिम बंगालने आपल्या वर्तमान आणि भविष्यातील विजेच्या गरजांसाठी स्वावलंबी व्हावे यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन

पश्चिम बंगाल देशासाठी आणि अनेक पूर्वेकडील देशांसाठी ‘पूर्व द्वार’ म्हणून काम करते: पंतप्रधान

रस्ते, रेल्वे, हवाई मार्ग आणि जलमार्गांवर आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन

Posted On: 02 MAR 2024 11:29AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील कृष्णनगर येथे 15,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. आजचे विकास प्रकल्प वीज, रेल्वे आणि रस्ते या क्षेत्रांशी निगडीत आहेत.

कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, पश्चिम बंगालला विकसित राज्य बनवण्याच्या दिशेने आजचे हे आणखी एक महत्वाचे पाऊल आहे. त्यांनी कालच्या आरामबाग येथील कार्यक्रमाचे स्मरण केले, जेथे त्यांनी रेल्वे, बंदर आणि पेट्रोलियम क्षेत्रातील 7,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली होती. पंतप्रधान म्हणाले, “आजही मी स्वतःला भाग्यवान समजतो. कारण, 15,000 कोटींहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले जात आहे आणि पश्चिम बंगालच्या नागरिकांचे जीवन सुकर करण्यासाठी वीज, रस्ते आणि रेल्वे या क्षेत्रांशी संबंधित प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली जात आहे."  ते म्हणाले की या प्रकल्पांमुळे पश्चिम बंगालच्या विकासाला गती मिळेल आणि तरुणांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. आजच्या विकास प्रकल्पांसाठी पंतप्रधानांनी नागरिकांचे अभिनंदन केले.

विकासाच्या प्रक्रियेत विजेच्या महत्त्वावर भर देताना पंतप्रधान म्हणाले की, पश्चिम बंगालला त्याच्या विजेच्या गरजांसाठी स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने सरकार काम करत आहे. ते म्हणाले की, पुरुलिया जिल्ह्यातील रघुनाथपूर येथील रघुनाथपूर औष्णिक ऊर्जा केंद्र टप्पा II (2x660 MW), आणि दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनचा कोळसा आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्प राज्यात 11,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक आणेल. यामुळे राज्याच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण होतील आणि या परिसराच्या आर्थिक विकासालाही गती मिळेल, असे ते म्हणाले. शिवाय, ते म्हणाले की, मेजिया औष्णिक ऊर्जा केंद्राची युनिट 7 आणि 8 ची फ्लू गॅस डिसल्फरायझेशन (FGD) प्रणाली, सुमारे 650 कोटी रुपये खर्च करून विकसित करण्यात आली आहे, यामधून पर्यावरणाच्या समस्यांबाबत भारताचे गांभीर्य दिसून येते. 

पंतप्रधान म्हणाले की, पश्चिम बंगाल देशाचे पूर्वेकडील द्वारम्हणून काम करते, आणि या ठिकाणी देशासाठी पूर्वेकडील संधी खुल्या होण्याची अपार क्षमता आहे.

म्हणूनच रस्ते, रेल्वे, हवाई मार्ग आणि जलमार्ग यांच्या आधुनिक संपर्क सक्षमतेसाठी सरकार काम करत आहे. ते म्हणाले की आज उद्घाटन झालेल्या राष्ट्रीय महामार्ग-12 (100 किमी) वरील फरक्का-रायगंज विभागाच्या रस्त्याच्या चौपदरीकरण प्रकल्पासाठी सुमारे 2000 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे, आणि त्यामुळे प्रवासाचा वेळ निम्म्यावर येईल. यामुळे आसपासच्या शहरांमधील रहदारी सुलभ होईल आणि या परिसरातील आर्थिक उलाढाल वाढण्यासह शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल.

पायाभूत सुविधांच्या दृष्टिकोनातून, रेल्वे हा पश्चिम बंगालच्या गौरवशाली इतिहासाचा भाग आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला, आणि विकासा अभावी राज्याचा वारसा आणि क्षमता मागील योग्य पद्धतीने पुढे नेण्यामध्ये यापूर्वीचे सरकारे अपयशी ठरली, याबद्दल खंत व्यक्त केली. पश्चिम बंगालमधील रेल्वे पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी गेल्या 10 वर्षांतील सरकारच्या प्रयत्नांवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला आणि पूर्वीच्या तुलनेत दुप्पट पैसा खर्च केल्याचा उल्लेख केला. राज्याचे आधुनिकीकरण आणि विकासासाठी तसेच विकसित बंगालचा संकल्प पूर्ण करायला सहाय्य करण्यासाठी आज चार रेल्वे प्रकल्प समर्पित केले जात आहेत, ही गोष्ट महत्वाची असल्याचे त्यांनी  अधोरेखित केले. पश्चिम बंगालच्या नागरिकांना शुभेच्छा देऊन त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

पश्चिम बंगालचे राज्यपाल, डॉ सीव्ही आनंदा बोस आणि केंद्रीय बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाचे राज्यमंत्री शांतनू ठाकूर, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

पंतप्रधानांनी पुरुलिया जिल्ह्यातील रघुनाथपूर येथील रघुनाथपूर औष्णिक ऊर्जा केंद्र टप्पा II (2x660 MW) ची पायाभरणी केली. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनच्या या कोळसा आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पामध्ये अत्यंत कार्यक्षम सुपरक्रिटिकल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. नवीन केंद्र देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल ठरेल.

पंतप्रधानांनी मेजिया औष्णिक ऊर्जा केंद्राच्या युनिट 7 आणि 8 च्या फ्लू गॅस डिसल्फरायझेशन (FGD) प्रणालीचे उद्घाटन केले. सुमारे 650 कोटी रुपये खर्च करून विकसित केलेली, FGD प्रणाली फ्ल्यू वायूंमधून सल्फर डायऑक्साइड काढून टाकेल आणि स्वच्छ फ्ल्यू गॅस आणि जिप्सम तयार करेल, ज्याचा वापर सिमेंट उद्योगात केला जाऊ शकतो.

पंतप्रधानांनी राष्ट्रीय महामार्ग- 12 (100 किमी) वरील फरक्का-रायगंज विभागातील रस्याच्या  चौपदरीकरण प्रकल्पाचेही उद्घाटन केले. सुमारे 1986 कोटी रुपये खर्चाने विकसित केलेला हा प्रकल्प वाहतूक कोंडी कमी करेल, कनेक्टिव्हिटी (दळणवळण) सुधारेल आणि उत्तर बंगाल आणि ईशान्य प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात योगदान देईल.

पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमधील 940 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या चार रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण केले. यामध्ये दामोदर-मोहिशीला रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रकल्प, रामपुरहाट आणि मुराराई दरम्यानचा तिसरा रल्वे मार्गबाजारसौ - अजीमगंज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, आणि अझीमगंज मुर्शिदाबादला जोडणारा नवीन रल्वे मार्ग या प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रकल्प रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारतील, मालवाहतूक सुलभ करतील आणि प्रदेशातील आर्थिक आणि औद्योगिक विकासाला हातभार लावतील.

***

S.Tupe/R.Agashe/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2010869) Visitor Counter : 85