शिक्षण मंत्रालय

निवडणुकांमध्ये युवकांचा अभ्यासपूर्ण सहभाग सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण मंत्रालयातर्फे देशभरातील उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये “मेरा पहला वोट देश के लिए” कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 27 FEB 2024 9:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 फेब्रुवारी 2024

 

निवडणुकांमध्ये युवकांचा अभ्यासपूर्ण सहभाग सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण मंत्रालय 28 फेब्रुवारी ते 6 मार्च 2024 या कालावधीत “मेरा पहला वोट देश के लिए” कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.

केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील युवकांना  आपला आवाज उठवण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केल्याचा त्यांनी उल्लेख केला.

देशातील सर्व उच्च शिक्षण संस्थांनी 28 फेब्रुवारी ते 6 मार्च या कालावधीत त्यांच्या संकुलात सर्वसमावेशक मतदार जागृती उपक्रम राबवण्याचे निर्देश प्रधान यांनी दिले. युवा शक्तीला प्रेरित करणे, त्यांच्या मनावर  मतदानाचे महत्व बिंबवणे, माहिती घेऊन योग्य निवड करणे आणि अधिक प्रातिनिधिक लोकशाहीसाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणे यादृष्टीने उपक्रम आयोजित करायचे आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश तरुण मतदारांचा सहभाग वाढवून त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करणे आणि राष्ट्रहितासाठी मतदानाचे महत्त्व सांगणे हा आहे. हा उपक्रम निवडणुकीचे महत्त्व आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये मतदान करताना वाटणारा अभिमान याचे द्योतक आहे.

देशभरातील उच्च शैक्षणिक संस्था या उपक्रमात सहभाग नोंदवतील. विद्यापीठे/महाविद्यालये/ उच्च शिक्षण संस्थांमध्ये मतदार जागृतीपर उपक्रम हाती घेतले जतील. या उपक्रमाअंतर्गत MyGov प्लॅटफॉर्मवर प्रत्यक्ष कार्यक्रम तसेच ऑनलाइन स्पर्धा होणार आहेत.ब्लॉग लेखन, पॉडकास्ट, वादविवाद, निबंध लेखन, प्रश्नमंजुषा, एक्सटेम्पोर, बॅटल ऑफ बँड्स इत्यादी विषयांवरील स्पर्धांसह विविध उपक्रम आयोजित केले जातील. त्यामुळे त्यांची सर्जनशीलता दिसून येईल.

मतदानाचे महत्व , निवडणूक प्रक्रिया समजून घेणे इत्यादींवर भर देणाऱ्या संवादात्मक  कार्यशाळा आणि चर्चासत्रांचे आयोजनही संस्थांमध्ये केले जाईल. याशिवाय ही मोहीम अधिकृत वेबसाइट https://ecisveep.nic.in/pledge/ वर युवकांना मतदार प्रतिज्ञा घेण्यास प्रवृत्त करेल. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेशी त्यांची बांधिलकी अधिक दृढ होण्यास मदत होईल. त्यांनी व्होटर हेल्पलाइन ॲप डाउनलोड करावे यासाठी प्रोत्साहित केले जाईल.

एनएसएस अर्थात राष्ट्रीय सेवा योजना आणि तिचे स्वयंसेवक शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यक्रमाचे नेतृत्व करणार आहेत. व्यापक जनजागृतीसाठी MyGov पोर्टलवर या मोहिमेची माहिती दिली जाईल. या मोहिमेत शैक्षणिक संस्था क्लबही सहभागी होणार आहेत.

 

* * *

S.Kane/P.Jambhekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2009964) Visitor Counter : 67