पंतप्रधान कार्यालय
तामिळनाडूतील मदुराई येथे ऑटोमोटिव्ह एमएसएमईसाठी डिजिटल मोबिलिटी इनिशिएटिव्ह कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
27 FEB 2024 11:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2024
वणक्कम!
सर्वप्रथम मी आपणा सर्वांची क्षमा मागु इच्छीतो, कारण मला यायला उशीर झाला आणि त्यामुळे तुम्हाला बराच वेळ माझी वाट पाहावी लागली. मी सकाळी दिल्लीतून तर वेळेवर निघालो होतो, मात्र अनेक कार्यक्रमात सहभागी होता होता प्रत्येक ठिकाणी पाच दहा मिनिटे जास्त गेली, त्याचाच हा परिणाम हा असतो की जो कार्यक्रम सर्वात शेवटी होणार असतो त्याला ही विलंबाची शिक्षा मिळते. असे असले तरीही मी पुन्हा एकदा विलंबाने आल्याबद्दल क्षमा मागतो.
मित्रांनो,
तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रातील इतक्या साऱ्या बुद्धीवंताचा सहवास लाभणे हा माझ्यासाठी एक अत्यंत सुखद अनुभव आहे. भविष्याची रचना करणाऱ्या एखाद्या प्रयोगशाळेत आपण आलो आहोत, अशी अनुभूती इथे मला येत आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, खास करून ऑटोमोबाइल उद्योगात तामिळनाडूने आपली भूमिका जागतिक स्तरावर देखील सिद्ध केली आहे. आजच्या या आयोजनाला देखील तुम्ही ‘क्रिएटींग द फ्युचर’ असे नाव दिले आहे, याचा मला खुप आनंद आहे.
‘क्रिएटींग द फ्युचर - डिजिटल मोबीलिटी फॉर ऑटोमोटिव्ह एमएसएमई आंत्रप्रेन्यॉ’ या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्यासाठी सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना, हजारो प्रतिभावंत तरुणांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी टीव्हीएस कंपनीला मी खुप खुप शुभेच्छा देतो. या व्यासपीठावर ऑटोमोबाइल उद्योगाच्या सोबतीने विकसित भारताच्या निर्मितीला देखील गती मिळेल याचा मला विश्वास आहे. मी जे बोलतो आहे त्याचा अर्थ त्याचवेळी समजावून सांगणे सुरू आहे ना.
मित्रांनो,
तुम्ही सर्वजण जाणता की आपल्या सकल देशांतर्गत उत्पादनाचा 7 टक्के भाग देशातील ऑटोमोबाइल उद्योगातून येतो. सकल देशांतर्गत उत्पादनाचा 7 टक्के सहभाग म्हणजे खूप मोठा वाटा आहे. म्हणूनच, ऑटोमोबाइल्स केवळ रस्त्यावरच वेगात धावत नाहीत तर ऑटोमोबाइल उद्योगामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला, देशाच्या प्रगतीला देखील तितकीच गती मिळत आहे. उत्पादन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यात देखील ऑटोमोबाइल उद्योगाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.
मित्रांनो,
आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत ऑटोमोबाइल उद्योगाचे जितके महत्वपूर्ण योगदान आहे, तशीच भूमिका सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची या उद्योगामध्ये आहे. दरवर्षी भारतात 45 लाख कार तयार होतात. भारतात सुमारे 2 कोटी दुचाकी, 10 लाख व्यावसायिक वाहने आणि 8 लाख तीन चाकी वाहने देखील तयार केली जातात. कोणत्याही प्रवासी वाहनात सुमारे 3 ते 4 हजार सुटे भाग असतात, हे तुमच्यापेक्षा जास्त चांगले कोणाला ठाऊक असेल.
म्हणजेच दर दिवशी अशी वाहने तयार करण्यासाठी लाखो सुट्या भागांची गरज पडते. आणि ते सुटे भाग पुरवण्याची खूप मोठी जबाबदारी आपले लाखो सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग लिलया पार पाडतात. यातले बहुसंख्य उद्योग श्रेणी - 1 आणि श्रेणी - 2 शहरांमध्ये आहेत. आज जगभरातील अनेक वाहनांमध्ये भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाद्वारे तयार करण्यात आलेले सुटे भाग वापरले जात आहेत. म्हणजेच, अनेक जागतिक संधी देखील आपला दरवाजा ठोठावत आहेत.
मित्रांनो,
आपल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी आजची ही खूप मोठी संधी आहे की ते जागतिक पुरवठा साखळीचा मजबूत भाग बनू शकतील. पण यासाठी आपल्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी स्वतःच्या उत्पादनांचा दर्जा, गुणवत्ता आणि टिकाऊपणा सुधारण्यासाठी काम केले पाहिजे. जागतिक मानकांच्या कसोटीवर स्वतःला सिद्ध करण्यासाठी काम केले पाहिजे.
एकदा लाल किल्ल्यावरून बोलताना मी म्हणालो होतो की, आता भारताला जगभरात पोहचवायचे असेल तर एक सुत्र गांभीर्याने स्वीकारले पाहिजे, आणि मी म्हणालो होतो की आता आपली उत्पादने ‘झिरो डिफेक्ट, झिरो इफेक्ट’ अशी असली पाहिजेत. आणि आता मी जेव्हा ‘झिरो डिफेक्ट, झिरो इफेक्ट’ म्हणतो तेव्हा ‘झिरो डिफेक्ट’ त्या उत्पादनाच्या गुणवत्तेशी संबंधित आहे तर ‘झिरो इफेक्ट’ पर्यावरणावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही या संदर्भात आहे. हा मूल मंत्र लक्षात घेऊन वाटचाल करणे गरजेचे आहे.
मित्रांनो,
डिजिटल मोबीलिटी फॉर ऑटोमोटिव्ह एमएसएमई आंत्रप्रेन्यॉ’ यामधून देशातील लघुउद्योगांना नवी दिशा मिळेल आणि भविष्यासाठी सज्ज होण्यात मदत मिळेल.
मित्रांनो,
कोरोना महामारीच्या काळात जगाने भारताच्या लघु उद्योगांचे सामर्थ्य अनुभवले आहे. भारताने कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये जो विजय प्राप्त केला आहे त्यात लघु उद्योगांची खूप मोठी भूमिका आहे. म्हणूनच आज देश सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या भविष्याला देशाच्या भविष्याच्या रूपात पाहत आहे. धनापासून प्रतिभेपर्यंत; सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या पायाभूत सुविधांमध्ये वृद्धी व्हावी यासाठी सर्व दिशांनी काम केले जात आहे.
प्रधानमंत्री मुद्रा योजना आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या अशा योजना आहेत ज्या यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. कोरोना महामारीच्या काळात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग पत हमी योजनेने लाखो रोजगार वाचवण्यात मदत केली, लक्षात घ्या, तो संकटाचा काळ असताना लाखो रोजगार वाचवण्यात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राने मदत केली होती.
मित्रांनो,
आज प्रत्येक क्षेत्राशी संबंधित सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी कमी व्याजदरातील कर्ज आणि खेळते भांडवल ही सुविधा सुनिश्चित केली जात आहे. पायाभूत सुविधांमध्ये वृद्धी झाल्यामुळे या उद्योगांच्या कल्पना क्षेत्राचा देखील विस्तार होत आहे. आपले लघु उद्योग नवनवीन क्षेत्रांमधील नवोन्मेषावर आणि आणि दिवसागणित त्यात होत असलेल्या आद्यतनावर जास्तीत जास्त लक्ष देत आहेत. यामुळे हे क्षेत्र आणखीन सशक्त बनेल.
आमचे सरकार आजच्या काळात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना आवश्यक असलेल्या नव्या तंत्रज्ञानाच्या आणि नव्या कौशल्याच्या आवश्यकतेवर देखील लक्ष देत आहे. याच उद्देशाने, विशेष कौशल्य विकास कार्यक्रम राबवले जात आहेत, प्रशिक्षण संस्था चालवल्या जात आहेत. पूर्वी आपल्या इथे कौशल्य विकास एक नित्यक्रमाचे काम मानले जात होते.
मात्र, जेव्हापासून तुम्ही मला तुमची सेवा करण्याची संधी दिली आहे, मी कौशल्य विकासासाठी वेगळे मंत्रालय बनवले आहे. नव्या पिढीला तयार करण्यात कौशल्याची खूप मोठी भूमिका असते असा माझा समज आहे. आणि म्हणूनच अत्याधुनिक आणि निरंतर अद्यावत होणाऱ्या कौशल्य विद्यापीठांची आपल्याला खूप जास्त गरज आहे.
मित्रांनो,
सरकार आज ज्या प्रकारे इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे त्यामुळे देखील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रांसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत. आपण देखील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेत आपले सामर्थ्य वाढवावे, असा माझा इथे उपस्थित असलेल्या सर्व लघु उद्योजकांना आग्रह आहे.
आणि तुम्हां सर्वांना माहिती असेलच, भारत सरकारने आता ‘रूफ टॉप सोलर’ ची एक खूप मोठी योजना सुरू केली आहे. अशा प्रकारे घराच्या छतावर बसविण्यात येणा-या सौर ऊर्जा पॅनेलमुळे खूप मोठ्या प्रमाणावर प्रत्येक कुटुंबाला आर्थिक मदत होऊ शकणार आहे. एका कुटुंबाला 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळेल आणि अतिरिक्त वीज खरेदी केली जाईल, असे हे पॅकेज आहे. प्रारंभी एक कोटी घरांसाठी या योजनेची अंमलबजावणी करण्याचं लक्ष्य निश्चित केले आहे. आणि आम्ही कल्पना अशी केली आहे की, या योजनेमुळे ई-वाहनांचेही चार्जिंग स्टेशन स्वतःच्या घरामध्ये बनविता येईल. रूफ टॉप सोलरच्या माध्यमातून ई-वाहनांचे चार्जिंग केले गेले तर, वाहतुकीचा खर्च शून्य होईल. आणि ही योजना तुम्हां लोकांसाठी नवनवीन संधी घेवून येणार आहे.
मित्रांनो,
सरकारने ऑटो आणि ऑटो म्हणजे स्वयंचलित वाहनांसाठी लागणा-या विविध सुट्या भागांसाठी 26 हजार कोटी रूपयांची ‘पीएलआय‘ योजना तयार केली आहे. या योजनेमुळे वाहनांच्या निर्मितीबरोबरच हायड्रोजन वाहनांनाही प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी मदत म्हणून आम्ही 100 पेक्षा जास्त ‘अॅडव्हान्स्ड ऑटोमोबाइल टेक्नॉलॉजीं’ना प्रोत्साहन दिले आहे. ज्यावेळी देशामध्ये नवीन तंत्रज्ञान येईल, त्या नवीन तंत्रज्ञानाशी मिळती-जुळती, त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेण्यासाठी वैश्विक गुंतवणूकही येणार आहे. ही गोष्टही आपल्या एमएसएमईसाठी अनेक मोठ्या संधी निर्माण करणारी आहे. म्हणूनच, आपल्या एमएसएमईच्या क्षमतांचा विस्तार करण्यासाठी, नवीन क्षेत्रांमध्ये काम सुरू करण्यासाठी हा काळ अतिशय योग्य आहे.
मित्रांनो,
ज्या ठिकाणी अनेक संधी निर्माण होण्याच्या शक्यता असतात, त्याच ठिकाणी आव्हानेही येत असतात. आज डिजिटलायझेशन, इलेक्ट्रिफिकेशन म्हणचे विद्युतीकरण, पर्यायी इंधनावर चालणारी वाहने आणि बाजारपेठेतील मागणीमध्ये होणारी चढ-उतार यासारख्या अनेक आव्हानांना एमएसएमईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशाच योग्य वेळी आणि योग्य दिशेने आवश्यक ती पावले उचलून आपण या आव्हानांचे रूपांतर संधीमध्ये करू शकतो. यासाठी स्वतःला अद्ययावत करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर एमएसएमईचे ‘फॉर्मलायझेशन’ हे सुद्धा एक खूप मोठे आव्हान आहे. आमच्या सरकारने या दिशेने अनेक पावले उचलली आहेत. आम्ही एमएसएमईची व्याखाही बदलली आहे. या निर्णयानंतर एमएसएमईच्या विकास- वृद्धीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मित्रांनो,
विकसित भारत बनविण्यासाठी भारत सरकार, आपल्या प्रत्येक उद्योग व्यवसायांबरोबर खांद्याला खांदा लावून उभी आहे. याआधी मोठा उद्योगधंदा असो अथवा व्यक्तिगत व्यवसाय असो, लहान- सहान कामासाठी सरकारी कार्यालयांमध्ये वारंवार फे-या घालाव्या लागत होत्या. परंतु, आज सरकार प्रत्येक क्षेत्रातील समस्यांवर तोडगा काढत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही 40 हजारांपेक्षा जास्त अनुपालने रद्द करून त्यांचा व्याप संपुष्टात आणला आहे. आम्ही व्यवसायाशी संबंधित अनेक लहान-लहान चुकांना जे गुन्हा समजले जात होते, गुन्हे काढून टाकले आहेत. यापेक्षाही तुम्हाला आश्चर्य वाटेल, अशी गोष्ट सांगतो, आपल्या देशामध्ये असे काही विचित्र कायदे होते की, जर तुमच्या कारखान्यातील शौचालयाला सहा महिन्यातून एकदा रंगवले नाही तर तुम्हाला तुरूंगवासाची शिक्षा दिली जात होती. या सर्व गोष्टी आता आम्ही बदलून टाकल्या आहेत. या गोष्टी काढून टाकण्यासाठी देशाची 75 वर्षे गेली.
मित्रांनो,
नवीन ‘लॉजिस्टिक‘ धोरण असो, जीएसटी असो, या सर्वांमध्ये ऑटोमोबाइल उद्योगाला पूरक असलेल्या लघुउद्योगांनाही मदत मिळाली आहे. सरकारने पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा बनवून भारतामध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी एक निश्चित दिशा दिली आहे. पीएम गतिशक्तीमध्ये दीड हजारांपेक्षा जास्त स्तरावर डेटा प्रोसेस करून भविष्यासाठी पायाभूत सुविधा बनविल्या जात आहेत. यामध्ये मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी म्हणजे विविध साधनांव्दारे बहुउद्देशिय संपर्क यंत्रणा तयार केल्यामुळे वाहतूक व्यवस्थेमध्ये खूप मोठी सुधारणा घडून ती वेगवान होत आहे. आम्ही प्रत्येक उद्योग व्यवसायासाठी ‘सपोर्ट मेकॅनिझम’ म्हणजेच समर्थन यंत्रणा - मदत होईल अशी व्यवस्था विकसित करण्यावर भर देत आहोत. ऑटोमोबाइल एमएसएमई क्षेत्राला माझे असे सांगणे आहे की, या समर्थन यंत्रणेचा लाभ घ्यावा. नवोन्मेषी संकल्पना आणि स्पर्धात्मकता यांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देवून आपल्याला पुढे जायचे आहे. या वाटचालीमध्ये सरकार पूर्णपणे आपल्याबरोबर आहे. मला विश्वास आहे की, या दिशेने टीव्हीएसचे हे प्रयत्न तुम्हाला खूप मदत करतील.
मित्रांनो,
दोन -तीन गोष्टी आपल्याला मी सांगू इच्छितो. तुम्हा मंडळींना माहिती आहे की, भारत सरकारने स्क्रॅपविषयी एक धोरण तयार केले आहे. आम्हाला वाटते की, जितकी जुनी वाहने आहेत, ती मोडीत काढली पाहिजेत. आणि नवीन अत्याधुनिक वाहने बाजारात आली पाहिजेत. आता आगामी काळात खूप मोठ्या संधी येणार आहेत, आणि म्हणूनच मी आपल्या उद्योग विश्वातील लोकांना सांगू इच्छितो की, भारत सरकारच्या स्क्रॅप धोरणाचा लाभ घेवून ‘स्क्रॅपिंग’च्या दिशेने पुढे आले पाहिजे. आता आपला देश जहाज बांधणीमध्ये जगामध्ये क्रमांक – एक वर आहे. आणि जहाज बनविण्यासाठीही जी पुर्नवापरात येणारी जी सामुग्री आहे, त्याची खूप मोठी बाजारपेठ देशात आहे. मला असे वाटते की, जर आपण चांगल्या पद्धतीने नियोजन करून पुढे गेलो तर आपले शेजारी देशही त्यांची वाहने बदलण्यासाठी प्रवृत्त होतील. आखाती देशांमध्ये अतिशय वेगाने वाहने बदलली जात आहेत. त्यांचीसुद्धा वाहने मोडीत काढण्यासाठी भारतामध्ये येतील आणि अशा प्रकारचा एक प्रचंड मोठा उद्योग आपल्या देशात सुरू होण्याची शक्यता वाढेल. आणि या सर्व गोष्टी कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्याकडील एमएसएमईच्या उपयोगी ठरतील. आपण या सर्व गोष्टींचा कसा फायदा घेवू शकतो, हे पाहिले पाहिजे. मला आत्ताच सांगण्यात आले की, आज इथे वाहतूक क्षेत्राशी संबंधित असलेले लोकही आलेले आहेत. ज्यावेळी मी एखाद्या विषयावर विचार करायला लागतो, त्यावेळी त्या गोष्टीचा सर्व बाजूंनी, समग्र विचार करण्याची मला सवय आहे. मोबिलिटीविषयी चर्चा करायची, वाहतुकीविषयी चर्चा करायची, मात्र मी जर वाहन चालकांविषयी चर्चा केली नाही, त्यांची चिंता केली नाही तर, मात्र माझे ते काम अगदीच अर्धवट राहणार आहे. आणि म्हणूनच तुम्ही काही दिवसांपूर्वीच कदाचित वर्तमानपत्रांमध्ये वाचले असेल की, आम्ही पर्थदर्शक प्रकल्पाच्या स्वरूपामध्ये प्रमुख महामार्गांवर एक हजार ठिकाणी लवकरच केंद्रांची निर्मिती करणार आहोत. या केंद्रांवर वाहन चालकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. आणि त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळेल. त्यांना आवश्यक विश्रांती मिळेल, गरजेच्या सर्व सुविधा या केंद्रांवर मिळतील. वैश्विक दर्जाच्या सुविधा असलेल्या या केद्रांचे सुरूवातीचे काम करण्याची सर्व सिद्धता याआधीच केली जात आहे. त्यामुळे वाहतूक क्षेत्रातील माझे जे बंधू -भगिनी आहेत, त्यांना सांगू इच्छितो की, आपल्या चालकांना आणखी जास्त सुरक्षाही मिळेल, आनंदही मिळेल आणि तुमच्या व्यवसायाचा विकास करण्यासाठी नवीन संधीही मिळतील. अशा सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत.
मित्रांनो,
आज आपल्यामध्ये येण्याची आणि काही बोलण्याची संधी मिळाली. तुमच्याही अनेक आकांक्षा आहेत. तुमची अनेक स्वप्नेही आहेत आणि तुम्हा सर्वांच्या स्वप्नांना मी माझे संकल्प बनवून त्यांच्या पूर्तीसाठी अगदी जीव तोडून कार्य करीत आहे. तुम्ही आगामी पाच वर्षात ज्या कोणत्या योजना पूर्ण करण्याचे मनाशी ठरवले असेल, त्यांच्या पूर्तीसाठी पुढे मार्गक्रमण करावे; विश्वास ठेवा, मी आपल्याबरोबर असणार आहे. तुमच्यासाठी असेन, आपण देशाला नवीन उंचीवर नेणारच आहोत. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा अनेक- अनेक शुभेच्छांसह खूप-खूप धन्यवाद देतो !!
* * *
H.Akude/NM/Shraddha/Suvarna/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2009820)
Visitor Counter : 71