पंतप्रधान कार्यालय

गुजरातमधे तारभ येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 22 FEB 2024 4:27PM by PIB Mumbai

जय वाड़ीनाथ! जय-जय वाड़ीनाथ। 

पराम्बा हिंगलाज माताजी की जय! हिंगलाज माताजी की जय! 

भगवान श्री दत्तात्रेय की जय! भगवान श्री दत्तात्रेय की जय!

कसे आहात तुम्ही सर्वजण? या गावातील जुन्या साधुंचे दर्शन घडले, जुन्या - जुन्या साथीदारांची भेट घडली. बंधूंनो, वाडीनाथ भेटीने तर रंगत आणली, मी यापूर्वी देखील वाडीनाथला आलो आहे, अनेकदा आलो आहे, मात्र आजचा उत्साह काही आगळाच आहे. जगात माझे कितीही जोशात स्वागत झालेले असो, सन्मान झालेला असो, परंतु जेव्हा हे स्वागत, हा सन्मान जेव्हा आपल्या घरात होतो तेव्हा त्याचा आनंद काही वेगळ्याच स्वरुपाचा असतो. माझ्या गावामधले काही जण अधून-मधून दिसत होते आज, आणि मामाच्या घरी आलो आहे तर त्याचा आनंद देखील खुप अनोखा असतो, असे वातावरण मी पाहिले आहे, त्याच्याच आधारे मी सांगतो आहे की श्रद्धा आणि आस्थेने ओतप्रोत भरलेल्या तुम्हा सर्व भक्त गणांना माझा सादर प्रणाम. योगायोग पहा कसा आहे, आजपासून बरोबर एका महिन्यांपूर्वी, 22 जानेवारीला मी अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या चरणी लीन होतो. तिथे मला प्रभु रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेच्या ऐतिहासिक आयोजनात सहभागी होण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. त्यानंतर 14 फेब्रुवारीला, वसंत पंचमीच्या दिवशी अबु धाबीमध्ये, आखाती देशातील पहिल्या हिंदू मंदिराचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली आणि आत्ताच, दोन तीन दिवसांपूर्वीच मला उत्तर प्रदेशातील संभल येथील कल्की धाम मंदिराची पायाभरणी करण्याची देखील संधी मिळाली. आणि आता आज, मला येथे, तरभ गावात या भव्य, दिव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठेनंतर पूजा करण्याच्या समारंभात सहभागी होण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे.

मित्रांनो,

देश आणि दुनियेसाठी तर वाडीनाथ हे शिवधाम तीर्थ आहे. मात्र रबारी समाजासाठी पुज्य गुरू गादी आहे. देशभरातून आलेले रबारी समाजाचे आणि अन्य भक्तगण आज येथे मला दिसत आहेत, विविध राज्यातून आलेले लोक देखील मला येथे दिसत आहेत. तुम्हा सर्वांचे मी अभिनंदन करतो.

मित्रांनो,

भारताच्या विकास यात्रेचा हा एक अद्भुत कालखंड आहे. हा एक असा कालखंड आहे, जेव्हा देव कार्य असो किंवा मग देश कार्य असो, दोन्ही जलद गतीने होत आहेत. देव सेवा देखील होत आहे आणि देश सेवा देखील होत आहे. आज एकीकडे हे पवित्र कार्य संपन्न झाले आहे तेथेच 13 हजार कोटी रुपये खर्चाच्या विकास कार्यांची पायाभरणी आणि लोकार्पण देखील झाले आहे. हे प्रकल्प रेल्वे, रस्ते, बंदर वाहतूक, पाणीपुरवठा, राष्ट्रीय सुरक्षा, शहरी विकास, पर्यटन अशा अनेक महत्त्वपूर्ण विकास क्षेत्रांशी संबंधित आहेत. आणि, या प्रकल्पामुळे लोकांचे जीवन सुकर बनेल तसेच या भागातील युवकांसाठी रोजगाराच्या आणि स्व रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.

माझ्या कुटुंबीयांनो,

आज मी या पवित्र भूमीवर एक दिव्य ऊर्जा अनुभवत आहे. ही ऊर्जा आपल्याला हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या आध्यात्मिक चेतनेशी जोडत आहे, या चेतनेचा संबंध भगवान कृष्ण यांच्याशी आहे आणि तसाच महादेवाशी देखील आहे. ही ऊर्जा आपल्याला त्या यात्रेशी देखील जोडते जी यात्रा प्रथम गादीपती महंत विरम गिरी बापूंनी सुरू केली होती. मी गादीपती पूज्य जयराम गिरी बापू यांना देखील आदरपूर्वक प्रणाम करतो. आपण गादीपती महंत बलदेवगिरी बापू यांचा संकल्प पुढे नेत त्याला सिद्धीपर्यंत पोहोचवले आहे. तुमच्यापैकी अनेक जणांना हे माहित आहे की बलदेव गिरी बापू यांच्याबरोबर माझा जवळपास 3-4 दशके जुना खूपच दृढ ऋणानुबंध होता. जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा अनेक वेळा मला माझ्या निवासस्थानी त्यांचे स्वागत करण्याची संधी मिळाली होती. ते जवळपास शंभर वर्ष आपल्यामध्ये अध्यात्मिक चेतना जागृत करण्याचे काम करत राहिले, आणि 2021 मध्ये जेव्हा ते आपल्याला सोडून निघून गेले तेव्हा देखील मी दूरध्वनीद्वारे माझ्या भावना प्रकट केल्या होत्या. मात्र आज जेव्हा त्यांचे स्वप्न साकार होत असताना मी पाहत आहे तेव्हा माझा अंतरात्मा म्हणतो की, आज ते जिथे असतील तेथून ही सिद्धी पाहून ते प्रसन्न होत असतील आणि आपल्याला आशीर्वाद देत असतील. शेकडो वर्ष जुने हे मंदिर, आज 21 व्या शतकाची भव्यता आणि पुरातन दिव्यतेच्या संगमातून तयार झाले आहे. हे मंदिर म्हणजे शेकडो शिल्पकार आणि श्रमिकांच्या अनेक वर्षांच्या अथक परिश्रमाची परिणिती आहे. याच परिश्रमामुळे या भव्य मंदिरात वाड़ीनाथ महादेव, पराम्बा श्री हिंगलाज माता आणि भगवान दत्तात्रेय विराजमान झाले आहेत. मंदिर निर्माणात सहकार्य करणाऱ्या आपल्या सर्व श्रमिक साथीदारांना देखील मी वंदन करतो. 

बंधू आणि भगिनींनो,

ही आपली केवळ देवालये किंवा मंदिरे आहेत, असे नाही. फक्त पूजा अर्चना करण्याची ठिकाणे आहेत, असेही नाही. ही तर आपल्या हजारो वर्ष जुन्या संस्कृती आणि परंपरेची प्रतिके आहेत. आपली  मंदिरे  ज्ञान आणि विज्ञानाची केंद्र राहिली आहेत, देशाला आणि समाजाला अज्ञानाच्या तिमिराकडून ज्ञानाच्या तेजाकडे घेऊन जाणारे माध्यम राहिले आहे.शिवधाम, श्री वाड़ीनाथ आखाड्याने तर शिक्षण आणि समाज सुधारणेच्या पवित्र परंपरेचे संपूर्ण निष्ठेने पालन केले आहे. आणि, मला चांगले आठवते की पूज्य बलदेवगिरी महाराजांच्या सोबत जेव्हा माझा संवाद व्हायचा तेव्हा ते आध्यात्मिक किंवा मंदिरांच्या विषयावर बोलण्यापेक्षा समाजातील मुला मुलींच्या शिक्षणाबाबत जास्त प्रमाणात चर्चा करत होते. पुस्तक पर्वाच्या आयोजनामुळे लोकांमध्ये जागरूकता वाढत आहे. विद्यालये आणि वसतिगृहांच्या निर्मितीमुळे शिक्षणाचा स्तर आणखीन सुधारला आहे. आज स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या शेकडो परीक्षार्थींना राहण्याची, भोजनाची आणि वाचनालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. देव कार्य आणि देश कार्य यांचे याहून उत्तम उदाहरण काय असू शकते.अशा परंपरांचे पालन केल्यामुळे रबारी समाज प्रशंसेला पात्र आहे. पण रबारी समाजाची म्हणावी तशी प्रशंसा आजवर झालेली नाही. 

बंधू आणि भगिनींनो,

आज देश ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्रानुसार वाटचाल करत आहे. ही भावना आपल्या देशाच्या रोमारोमात कशी भिनलेली आहे याची प्रचिती देखील आपल्याला वाड़ीनाथ धाममध्ये येते. हे एक असे स्थान आहे, जिथे भगवंतांनी प्रकट होण्यासाठी एका रबारी गोपालाची माध्यम म्हणून निवड केली होती. येथे पूजाअर्चा करण्याची जबाबदारी रबारी समाजाकडे आहे. मात्र, संपूर्ण समाज दर्शनाला येतो. संतांच्या याच भावनेचे अनुसरण करत आमचे सरकार आज देशाच्या प्रत्येक क्षेत्रातील, प्रत्येक वर्गातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्नरत आहे.

मोदी यांची हमी , मोदी यांच्या हमीचे लक्ष्य, समाजामध्ये  तळाच्या  पायरीवर असलेल्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्‍याचे आहे. म्हणूनच देशामध्ये एकीकडे मंदिराची उभारणी केली जात आहे, तर दुसरीकडे कोट्यवधी गरीबांसाठी  पक्की घरे  बनविण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये गरीबांसाठी सव्वा लाखांपेक्षा जास्त घरकुलांचे लोकार्पण आणि पायाभरणी करण्याची मला संधी मिळाली. सव्वा लाख घरे लोकांना मिळाली. या गरीब कुटुंबांकडून किती भरभरून आशीर्वाद मिळतील, याची तुम्ही कल्पना करावी. गरीबाच्या घरी चूल पेटलेली राहावी, यासाठी  आज देशामध्ये 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिले जात आहे. हा एकप्रकारे भगवंताचाच प्रसाद आहे. आज देशातल्या 10 कोटी नवीन कुटुंबांना नळाव्दारे पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. ज्यांना पाण्याची गरज भागवण्यासाठी दूर-दूर पर्यंत  पायपीट करावी लागत होती, त्यांच्या दृष्टीने घरामध्ये पाणी मिळणे ही गोष्ट,  त्या कुटुंबांसाठी कोणत्याही  अमृतापेक्षा कमी नाही. आमच्या उत्तर गुजरातमध्ये वास्तव्य करणा-या नागरिकांना तर चांगले माहिती आहे, पाण्यासाठी किती परिश्रम करावे लागतात. डोक्यावर पाण्याच्या घागरी ठेवून दोन-दोन, तीन-तीन किलोमीटर अंतरावरून त्या आणाव्या लागत होत्या. आणि मला आठवतेय, ज्यावेळी मी सुजलाम -सुफलाम योजना तयार केली, त्यावेळी उत्तर गुजरातच्या कॉंग्रेस आमदारानेही मला म्हटले होते की, तुम्ही ज्या पद्धतीने काम केले आहे, ते दुसरे कोणीही करू शकले नसते. तुमचे हे काम 100 वर्षांपर्यंत कोणीही विसरू शकणार नाही. या गोष्टीचे साक्षीदारही आज इथे बसलेले आहेत.

मित्रांनो,

गेल्या दोन दशकांमध्ये आम्ही गुजरातच्या विकासाबरोबरच वारसा जतन करण्याचे काम करीत आहोत.  प्राचीन वास्तूंची  पूर्वीची भव्यता राखण्यासाठी  आम्ही काम केले आहे. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये प्रदीर्घ काळापर्यंत विकास आणि वारसा यांच्या दरम्यान संघर्षाची स्थिती निर्माण केली गेली. एक प्रकारे वैरभाव निर्माण केला गेला. यासाठी जर दोष कुणाला द्यायचा तर, ज्यांनी  अनेक दशके देशावर  शासन केले ,त्या  कॉंग्रेसला द्यावा लागेल. याच लोकांनी सोमनाथसारख्या  पवित्र स्थानाला  वादाचे कारण बनवले. याच लोकांनी पावागढमध्ये धर्म ध्वजा फडकवण्याची इच्छाही दाखवली नाही. याच लोकांनी अनेक दशकांपर्यंत मोढेराच्या सूर्यमंदिरालाही मतपेटीशी जोडण्याचे राजकारण करून पाहिले. याच लोकांनी भगवान श्रीरामाच्या अस्तित्वावरही प्रश्न उपस्थित केले. श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यामध्ये अडथळे आणले. आणि आज ज्यावेळी श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिराची निर्मिती झाली आहे, यामुळे संपूर्ण देश आनंदी झाला आहे, तरीही नकारात्मक भावनेमध्ये जगणारी मंडळी व्देषाचा, विरोधाचा मार्ग काही सोडत नाही.

बंधू आणि भगिनींनो,

कोणताही देश आपला वारसा जतन-संवर्धन करूनच पुढे जावू शकतो. गुजरातमध्येही भारताच्या प्राचीन संस्कृतीच्या अनेक खुणा आहेत. त्यांचा  इतिहास समजून घेतला पाहिजे,  त्यासाठी  आणि भावी पिढ्यांना आपल्या मूळांशी जोडण्यासाठी हा  इतिहास जाणून घेण्‍याची अतिशय आवश्यकता आहे. म्हणूनच आमच्या सरकारचा सातत्याने प्रयत्न असतो की, या प्रतीकांचे जतन केले जावे.  त्यांच्या स्थानांचा जागतिक  वारसा या स्वरूपामध्ये विकास केला जावा.  आता तुम्हीही  पाहिले असेल , वडनगर परिसरामध्ये खोदकाम करताना नवनवीन ऐतिहासिक गोष्टी समोर येत आहेत. वडनगरमध्ये 2800 वर्ष जुन्या काळाच्या वस्तीच्या खुणा गेल्या महिन्यातच सापडल्या आहेत. म्हणजेच 2800 वर्षांपूर्वी या भागामध्ये लोक वास्तव्य करीत होते. धोलावीरामध्येही  प्राचीन भारताचे दिव्य दर्शन  दिसून येत आहे. ही गोष्ट भारतासाठी अभिमानाची आहे. आम्हाला  आपल्या या समृद्ध भूतकाळाविषयी अभिमान वाटतो.

मित्रांनो, 

आज नवीन भारतात केला जाणारा प्रत्येक  प्रयत्न  भावी पिढीसाठी वारसा बनवण्याचे काम  करत आहे. आज जे नवीन आणि आधुनिक रस्ते बनविण्यात येत आहेत रेल्वे मार्ग  बनविले जात आहेत, हे विकसित भारताचेच रस्ते आहेत. आज मेहसाणावरून रेल्वे संपर्क व्यवस्था अधिक मजबूत झाली आहे. रेल मार्गाच्या दुपदरीकरणामुळे आता बनासकांठा आणि पाटणच्या कांडला, टुना आणि मुंद्रा बंदरापासून संपर्क व्यवस्था उत्तम  झाली आहे. यामुळे नवीन रेल्वे गाड्या धावणे शक्य झाले आहे आणि मालगाड्यांसाठीही सुविधा झाली आहे. आज डीसाच्या हवाईदल स्थानकाच्या धावपट्टीचेही लोकार्पण झाले आहे. आणि भविष्यामध्ये ही काही फक्त धावपट्टी  राहणार आहे;  असे नाही, तर भारताच्या सुरक्षेसाठी हवाई दलाचे एक खूप मोठे केंद्र म्हणून विकसित होणार आहे. मला चांगले आठवते की, मुख्यमंत्री असताना मी, या प्रकल्पाची मागणी करणारी  अनेक पत्रे  तत्कालीन केंद्र सरकारला पाठवली होती. खूप प्रयत्न हा  प्रकल्प व्हावा,  यासाठी केले होते. परंतु कॉंग्रेस सरकारने हे काम केले नाही. या प्रकल्पाचे काम रोखण्यामध्ये कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. हवाई दलाचे लोक सांगत होते की, हे स्थान भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार केला तर, अतिशय महत्वाचे आहे. तरीही करत नव्हते. 2004 पासून ते 2014 पर्यंत कॉंग्रेस सरकारने या सुरक्षा प्रकल्पाची फाईल तशीच प्रलंबित ठेवली.  दीड वर्षांपूर्वी मी या धावपट्टीची पायाभरणी केली होती. मोदी ज्यावेळी एखादा संकल्प करतात, त्यावेळी तो पूर्ण करतातच. त्याचे उदाहरण म्हणजे,  डीसा इथल्या या धावपट्टीचे आज लोकार्पण झाले आहे. आणि हीच तर मोदी यांची  हमी आहे.

मित्रांनो,

20-25 वर्षांपूर्वीचा असा काळ होता की, त्यावेळी उत्तर गुजरातमध्ये संधी खूप मर्यादित होत्या. कारण त्यावेळी  या भागातल्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये पाणीच नव्हते. पशुपालकांच्याही समोर आव्हाने होती. औद्योगिकीकरणाच्या कक्षा अतिशय मर्यादित होत्या. परंतु भाजपा सरकारच्या काळात या स्थितीमध्ये सातत्याने परिवर्तन घडून येत आहे. आज इथले शेतकरी वर्षभरात वेगवेगळी 2-3 पिके घेत आहेत. या संपूर्ण भागाचा जलस्तरही आज  उंचावला आहे. आज इथे पाणी पुरवठा  आणि जलस्त्रोतांशी संबंधित 8 प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली गेली आहे. या प्रकल्पांसाठी 1500 कोटी रूपयांपेक्षा जास्त निधी खर्च केला जाणार आहे. यामुळे उत्तर गुजरातचा पाणी प्रश्न संपुष्टात येण्यासाठी मदत होणार आहे. उत्तर गुजरातच्या शेतकरी बांधवांनी  ठिबक सिंचनासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे, ही गोष्ट खूप चांगली आहे. आता तर मी पाहतो आहे की, रसायनमुक्त, नैसर्गिक  शेती करण्याकडे कल अधिकाधिक वाढत आहे. तुम्ही अशा पद्धतीने  केलेले चांगले प्रयत्न पाहून,  देशभरातील शेतकरी बांधवांचाही उत्साह वाढेल.

बंधू आणि भगिनींनो,

आपण अशाच पद्धतीने विकासही साधणार आहोत  आणि वारसाही जतन करणार  आहोत. शेवटी  या दिव्य अनुभवाचे भागीदार बनविण्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. तुम्हा सर्वांना खूप -खूप धन्यवाद. माझ्या बरोबर  जयघोष करावा ....

भारत माता की जय!

भारत माता की जय!

भारत माता की जय!

धन्यवाद !!

***

Nilima C/Shraddha M/Suvarna /CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2008325) Visitor Counter : 48