युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
गुवाहाटी येथे 19 फेब्रुवारी रोजी आयोजित खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2023 च्या उद्घाटन समारंभाला अनुराग सिंग ठाकूर लावणार हजेरी
Posted On:
17 FEB 2024 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2024
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर येत्या 19 फेब्रुवारी रोजी गुवाहाटी येथे आयोजित खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2023 च्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
प्रसिद्ध पार्श्वगायक आणि संगीतकार पापोन 19 फेब्रुवारी रोजी गुवाहाटी येथील सरूसजाई क्रीडा संकुल येथे आपला कलाविष्कार सादर करणार आहेत.
या क्रीडा स्पर्धेतील सामन्यांचे आयोजन ईशान्येतील सात बहिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सात राज्यांमध्ये केले जाणार असून 29 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेची सांगता होईल.
केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्यासह आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा हे देखील खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ संदेशाद्वारे खेळाडूंचा उत्साह वाढवतील. ही या क्रीडा स्पर्धेची चौथी आवृत्ती आहे. खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये 200 विद्यापीठांमधील जवळपास 4500 खेळाडू सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.

पापोन नावाने ओळखले जाणारे अंगराग महंता, या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2023 अष्टलक्ष्मीच्या शुभारंभी कलाविष्कार सादर करणार आहेत.
पापोन यांच्या सादरीकरणामुळे उद्घाटन समारंभाला वेगळीच शोभा प्राप्त होईल असे आसामच्या क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री नंदिता गार्लोसा यांनी सांगितले. “पापोन हा भारताचा युवा आयकॉन असून या उद्घाटन सोहळ्यात गुवाहाटीतील लोकांना त्याचा कलाविष्कार प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळेल, असे त्या म्हणाल्या. आपल्याकडे भूपेन हजारिकांसारखे दिग्गज संगीतकार आहेत. उत्कृष्ट संगीताला पिढीचे बंधन नसते. हजारिका आणि पापोन हे दोघेही आपापल्या परीने अद्वितीय आहेत. आणि हो! झुबीन गर्ग यांना विसरू नका,” असेही गार्लोसा म्हणाल्या.
सर्व उपस्थितांना विनामूल्य प्रवेश देऊन त्यांचे स्वागत करणाऱ्या या भव्य उद्घाटन सोहळ्यात एकता, विविधता आणि खेळाडू वृत्तीची मूल्ये ठळकपणे मांडणारे संकल्पनात्मक कार्यक्रम देखील सादर केले जाणार आहेत. याव्यतिरिक्त, आसामची चैतन्यदायी संस्कृती स्थानिक कलाप्रकारांच्या आकर्षक प्रदर्शनांसह सर्वांशी चित्त मोहून घेईल, आणि आयोजनाला सांस्कृतिक सृजनाची अनोखी किनार प्रदान करेल.
उल्लेखनीय बाब म्हणजे खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2023 अष्टलक्ष्मीची सुरुवात शनिवारी सरुसजाई स्टेडियमवर कबड्डीच्या सामन्यांनी झाली आहे. दोन गटात विभागलेले तब्बल आठ संघ चषकासाठी एकमेकांशी स्पर्धा करत आहेत.
खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा हा भारत सरकारच्या खेलो इंडिया उपक्रमाचा एक भाग असून 2016 मध्ये यांचा प्रारंभ करण्यात आला होता. खेलो इंडिया मिशन तळागाळातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यावर आणि देशभरातील तरुण प्रतिभावंतांचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रित करते. गुवाहाटी येथील सरूसजाई क्रीडा संकुल 19 फेब्रुवारी रोजी खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2023 अष्टलक्ष्मी उद्घाटन समारंभासाठी सज्ज झाले आहे.
* * *
M.Pange/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2006847)