पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान  16 फेब्रुवारीला ‘विकसित  भारत विकसित राजस्थान’  या कार्यक्रमाला करणार संबोधित


पंतप्रधान राजस्थानमध्ये 17,000 कोटी रुपये खर्चाच्या  बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन ,लोकार्पण आणि पायाभरणी करणार

रस्ते, रेल्वे, सौर ऊर्जा, वीज पारेषण, पेयजल आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील प्रकल्पांचा यात समावेश

या प्रकल्पांच्या शुभारंभातून राजस्थानच्या पायाभूत सुविधांच्या परिदृश्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी तसेच वृद्धी आणि विकासाच्या संधी निर्माण करण्याचे  पंतप्रधानांचे अथक प्रयत्न अधोरेखित

Posted On: 15 FEB 2024 3:07PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून  विकसित भारत विकसित राजस्थान’  या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान 17,000 कोटी रुपयांहून  अधिक खर्चाच्या  अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन , लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. हे प्रकल्प रस्ते, रेल्वे, सौरऊर्जा, वीज पारेषण,पेयजल  तसेच  पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमधील आहेत.

राजस्थानमध्ये 5000 कोटी रुपयांहून अधिक  खर्चाच्या विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.पंतप्रधान आठ पदरी  दिल्ली-मुंबई ग्रीन फील्ड अलाइनमेंट (एनई -4) द्रुतगती मार्गाच्या , बाओली-झालाई रस्ता ते मुई गाव विभाग; हरदेवगंज गाव ते मेज नदी विभाग; आणि टाकळी ते राजस्थान/ मध्य प्रदेश सीमेपर्यंत या  तीन विभागांचे लोकार्पण करतील. हे विभाग या प्रदेशात जलद आणि सुधारित कनेक्टिव्हिटी प्रदान करतील वन्यप्राण्यांचा  विनाअडथळा संचार  सुलभ करण्यासाठी ॲनिमल अंडरपास म्हणजेच  प्राण्यांच्या रहदारीसाठी खालून रस्ता   आणि ॲनिमल ओव्हरपास म्हणजेच प्राण्यांसाठी रस्त्याच्या वरून पूल या सुविधेने हे विभाग  सुसज्ज आहेत.वन्यजीवांवर वाहनांच्या आवाजाचा  होणारा परिणाम कमी करण्यासाठी ध्वनी रोधकांची  तरतूद करण्यात आली आहे.काया गावात राष्ट्रीय महामार्ग -48 च्या उदयपूर-शामलाजी विभागासह  देबारी येथे  राष्ट्रीय महामार्ग  -48 च्या चित्तोडगड-उदयपूर महामार्ग विभागाला जोडणाऱ्या सहापदरी ग्रीनफिल्ड उदयपूर बाह्य वळण रस्त्याचे  लोकार्पणही  पंतप्रधान करणार आहेत. या बाह्यवळण रस्त्यामुळे  उदयपूर शहरातली   गर्दी कमी होण्यास मदत होईल. राजस्थानमधील झुंझुनू, अबू रोड आणि टोंक जिल्ह्यांतील रस्ते पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणाऱ्या इतर विविध प्रकल्पांचेही पंतप्रधान लोकार्पण  करतील.

या प्रदेशातील रेल्वे पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्याच्या अनुषंगाने , सुमारे 2300 कोटी रुपये खर्चाच्या  राजस्थानमधील आठ महत्त्वाच्या  रेल्वे प्रकल्पाचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणी देखील पंतप्रधान करणार आहेत. राष्ट्रार्पण  करण्यात येणाऱ्या  रेल्वे प्रकल्पांमध्ये  रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाचे  विविध प्रकल्प असून यात जोधपूर-राय का बाग-मेरता रोड-बिकानेर विभाग (277  किमी); जोधपूर-फलोदी विभाग ((136  किमी); आणि बिकानेर-रतनगड-सादुलपूर-रेवाडी विभाग (375 किमी)  या विभागांचा अमावेश आहे. पंतप्रधान  खातीपुरा रेल्वे स्थानकराष्ट्राला समर्पित करतील. हे रेल्वे स्थानक जयपूरसाठी उपस्थानक  (सॅटेलाईट स्थानक ) म्हणून विकसित करण्यात आले आहे आणि ते टर्मिनल सुविधाने सुसज्ज आहे जिथून रेल्वेगाड्या रवाना होतील आणि थांबतील.  ज्या रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत त्यात भगत की कोठी (जोधपूर) येथे वंदे भारत शयनयान रेल्वेगाडीच्या   देखभाल सुविधेचा ; खातीपुरा (जयपूर) येथील वंदे भारत, एलएचबी इत्यादी सर्व प्रकारच्या डब्यांसाठी  देखभाल सुविधा ; हनुमानगड येथे गाड्यांच्या देखभालीसाठी कोच केअर संकुलाचे  बांधकाम; आणि बांदीकुई ते आग्रा किल्ला  रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण या प्रकल्पांचा समावेश आहे. रेल्वे पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे, सुरक्षा उपाय वाढवणे, कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक अधिक कार्यक्षमतेने उपलब्ध करून देणे  हे रेल्वे क्षेत्रातील प्रकल्पांचे उद्दिष्ट आहे.

या प्रदेशात नवीकरणीय  ऊर्जेच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी पंतप्रधान राजस्थानमध्ये सुमारे 5300 कोटी रुपयांच्या महत्त्वाच्या सौर प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि  लोकार्पण देखील करतील. राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील बारसिंगसर औष्णिक ऊर्जा केंद्राच्या परिसरात स्थापन करण्यात येणाऱ्या एनएलसीआयएल बारसिंगसर सौर प्रकल्प या 300 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. आत्मनिर्भर भारतच्या अनुषंगाने भारतात उत्पादित उच्च कार्यक्षमतेच्या बायफेशियल मॉड्यूल्ससह अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सौर प्रकल्प उभारला जाईल. ते राजस्थानमधील बिकानेर येथे विकसित होणाऱ्या सीपीएसयू योजना टप्पा -II (भाग -III) अंतर्गत एनएचपीसी लिमिटेड च्या 300 मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी देखील करतील. राजस्थानातील बिकानेर मध्ये विकसित केलेला 300 मेगावॅटचा एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड नोखरा सौर पीव्ही प्रकल्पही पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील. सौर प्रकल्प हरित उर्जा निर्माण करतील, कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी करण्यास मदत करतील आणि क्षेत्राच्या आर्थिक विकासात अग्रेसर राहतील.

पंतप्रधान राजस्थानमधील 2100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे विद्युत पारेषण क्षेत्रातील प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. हे प्रकल्प राजस्थानमधील सौरऊर्जा परिमंडळातून विद्युत ऊर्जा पारेषण करतील जेणेकरून या परिमंडळात निर्माण होणारी सौर ऊर्जा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल. प्रकल्पांमध्ये टप्पा -II भाग ए अंतर्गत राजस्थानमधील सौरऊर्जा क्षेत्रांतून (8.1 गिगावॅट) विद्युत ऊर्जा पारेषणासाठी पारेषण यंत्रणा बळकटीकरण योजनेचा; टप्पा -II भाग-बी 1 अंतर्गत राजस्थानमधील सौरऊर्जा क्षेत्रांमधून (8.1 गिगावॅट) विद्युत ऊर्जा पारेषणासाठी पारेषण प्रणाली बळकटीकरण योजना; आणि बिकानेर (पीजी), फतेहगढ-II आणि भाडला-II येथे अक्षय ऊर्जा प्रकल्प जोडणीसाठी पारेषण यंत्रणा यांचा समावेश आहे.

राजस्थानमध्ये शुद्ध पेयजल पुरवण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या उद्देशाने जल जीवन मिशन अंतर्गत प्रकल्पांसह सुमारे 2400 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होईल. हे प्रकल्प देशभरात वैयक्तिक घरगुती नळ जोडणीद्वारे शुद्ध पेयजल पुरवण्याच्या पंतप्रधानांच्या समर्पणाचे द्योतक आहेत.

पंतप्रधान जोधपूर येथे इंडियन ऑइलचा एलपीजी बॉटलिंग प्रकल्पाचे लोकार्पण करतील. कार्यान्वयन आणि सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि स्वयंचलित यंत्रणेने सुसज्ज बॉटलिंग प्रकल्प, रोजगार निर्मितीला कारणीभूत ठरेल आणि या भागातील लाखो ग्राहकांच्या एलपीजी गरजा पूर्ण करेल.

राजस्थानमध्ये या विकास प्रकल्पांचे उदघाटन राजस्थानच्या पायाभूत सुविधांचे परिदृश्य बदलण्यासाठी आणि वाढ आणि विकासाच्या संधी निर्माण करण्यासाठी पंतप्रधानांच्या अथक प्रयत्नांना अधोरेखित करते.

जयपूर येथे मुख्य कार्यक्रमासह राजस्थानमधील सर्व जिल्ह्यांमध्ये सुमारे 200 ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला जाईल. राज्यव्यापी कार्यक्रमात विविध सरकारी योजनांचे लाखो लाभार्थी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात राजस्थानचे मुख्यमंत्री, राजस्थान सरकारचे इतर मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत.

***

S.Kane/S.Chavan/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2006290) Visitor Counter : 154