पंतप्रधान कार्यालय

आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या मंत्रिस्तरीय बैठकीत पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 14 FEB 2024 3:10PM by PIB Mumbai

 

महामहिम, महोदया आणि महोदय, नमस्कार.

आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या मंत्रिस्तरीय बैठकीत सर्वांना अभिवादन.आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था  50 वा वर्धापन दिन साजरा करत आहे, हे महत्वपूर्ण आहे. हा महत्वाचा टप्पा गाठल्याबद्दल अभिनंदन.  या बैठकीच्या सह-अध्यक्षतेबद्दल मी आयर्लंड आणि फ्रान्सचेही आभार मानतो.

मित्रांनो,

भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे.  शाश्वत विकासासाठी ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वतता आवश्यक आहे.एका दशकात आम्ही 11 व्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या स्थानावरून झेप घेत  पाचव्या क्रमांकावर पोहोचलो. याच काळात आमची सौरऊर्जा क्षमता 26 पटींनी वाढली! भारताची नवीकरणीय  ऊर्जा क्षमताही दुप्पट झाली आहे.  या संदर्भात आम्ही आमच्या पॅरिस करारातील  वचनबद्धता निर्धारित वेळेपूर्वीच पूर्ण केल्या आहेत.

मित्रांनो,

जागतिक लोकसंख्येच्या 17% लोक भारतामध्ये राहतात. आम्ही जगातील काही सर्वात मोठे ऊर्जा उपलब्धता उपक्रम राबवत आहोत.  तरीही, आमचे कार्बन उत्सर्जन हे जागतिक एकूण उत्सर्जनाच्या केवळ 4% आहे. तथापि, आम्ही हवामान बदलावर उपाययोजना   करण्यासाठी कटिबद्ध आहोत.  आमचा एक सामूहिक आणि सक्रिय दृष्टीकोन आहे. भारताने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसारख्या उपक्रमांचे नेतृत्व स्वीकारले  आहे. आमचे मिशन लाईफ सामूहिक प्रभावासाठी पर्यावरण स्नेही जीवनशैली निवडीवर लक्ष केंद्रित करते.  कमी वापर, पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रियाहा भारताच्या पारंपरिक जीवनशैलीचा एक भाग आहे. भारताच्या जी20 अध्यक्षपदानेही  या आघाडीवर महत्त्वपूर्ण कृती केली आहे .जागतिक जैव इंधन आघाडीचा प्रारंभ  हे त्यातील एक वैशिष्ट्य होते.  या उपक्रमासाठी आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

मित्रांनो,

सर्वसमावेशकता कोणत्याही संस्थेची विश्वासार्हता आणि क्षमता वाढवते.1.4 अब्ज भारतीय प्रतिभा, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष सादर करतात. आम्ही प्रत्येक मोहिमेमध्ये व्याप्ती आणि वेग, प्रमाण आणि गुणवत्ता आणतो.  मला खात्री आहे की भारत जेव्हा आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेत मोठी भूमिका बजावेल तेव्हा संस्थेला त्याचा  फायदा होईल.

आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या मंत्रिस्तरीय बैठकीच्या यशस्वीतेसाठी मी  शुभेच्छा देतो. विद्यमान सहकार्य बळकट  करण्यासाठी आणि नवीन सहकार्य तयार करण्यासाठी चला या व्यासपीठाचा लाभ घेऊया.  चला स्वच्छ, हरित आणि सर्वसमावेशक जग निर्माण करूया.

धन्यवाद

खूप खूप धन्यवाद.

***

S.Kakade/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2005937) Visitor Counter : 72