पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये यु पी आय सेवांची सुरूवात करताना पंतप्रधानांच्या संबोधनाचा मजकूर

Posted On: 12 FEB 2024 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 फेब्रुवारी 2024

 

सन्माननीय राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे जी, सन्माननीय पंतप्रधान प्रविंद जुगनौथ जी, भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर जयशंकर जी, श्रीलंका, मॉरीशस आणि भारत यांच्या  मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर आणि आज या महत्वपूर्ण कार्यक्रमाशी संबंधित सर्व सहकारी 

हिंद महासागर क्षेत्रातल्या तीन मित्र देशांसाठी आजचा दिवस विशेष आहे. आपल्यातल्या ऐतिहासिक संबंधांना आज आपण आधुनिक डिजिटल स्वरूपात जोडत आहोत. आपल्या जनतेच्या विकासासाठी आमच्या वचनबद्ध्तेचे हे मानक आहे. फिनटेक कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून केवळ सीमापार व्यवहारच नव्हे तर सीमापार संबंधही दृढ होतील. भारताचा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI आता नव्या रुपात प्रकट होत आहे - Uniting Partners with India म्हणजेच  भारतासोबत एकत्रित भागीदारी.

मित्र हो,

भारतामध्ये डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून एक क्रांतिकारी परिवर्तन झाले आहे . आमचे लहानात लहान गाव, लहानात लहान व्यापारी, डिजिटल प्रदाने करत आहेत. कारण यात सुविधे सोबतच गती देखील आहे. गेल्या वर्षी UPI च्या माध्यमातून 100 अब्जाहून अधिक व्यवहार झाले आहेत. याचे मूल्य 2 लाख कोटी रुपये, म्हणजे 8 लाख कोटी श्रीलंकन रुपये आणि 1 लाख कोटी मॉरिशस रुपयांहून अधिक आहे. JAM ट्रिनिटी- म्हणजे जन धन बँक खाते, आधार आणि मोबाईल फोनच्या माध्यमातून  आम्ही शेवटच्या व्यक्तीपर्यंत वितरण करत आहोत. या प्रणालीच्या माध्यमातून 34 लाख कोटी रुपये, म्हणजेच 400 अब्ज डॉलरहून अधिक थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले गेले आहेत. कोविड महामारीच्या वेळी कोविन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम आखण्यात आली. तंत्रज्ञानाच्या वापरातून पारदर्शकता वाढत आहे; भ्रष्टाचार संपुष्टात येत आहे; समाजात समावेशकता वाढत आहे. आणि लोकांचा सरकारवरचा विश्वास वाढीस लागत आहे.

मित्र हो,

शेजारी प्रथम हे भारताचे धोरण आहे. आमचा सागरी दृष्टीकोनच आहे 'SAGAR', म्हणजे 'क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षा आणि वाढ'. संपूर्ण क्षेत्रात शांती, सुरक्षा आणि विकास हेच आमचे उद्दिष्ट आहे. आपल्या शेजारी मित्रांना स्वतःपासून वेगळे ठेवून भारत आपला विकास पाहत नाही. श्रीलंकेसोबत प्रत्येक क्षेत्रात संपर्कव्यवस्था सातत्याने वाढवत आहोत . गेल्या वर्षी राष्ट्रपती विक्रमसिंघे यांच्या भारत यात्रेदरम्यान आम्ही एक दृष्टीकोन आत्मसात केला होता. आर्थिक संपर्कव्यवस्था वाढवणे हा त्याचा एक प्रमुख भाग होता. आज आम्ही हा संकल्प पूर्ण केला ही आनंदाची बाब आहे. पंतप्रधान जुगनौथ यांच्याशी सुद्धा  गेल्या वर्षी विस्तृत चर्चा झाली होती. जी-२० परिषदेत तुम्ही आमचे विशेष अतिथी होतात. मला विश्वास आहे की श्रीलंका आणि मॉरिशस यू पी आय प्रणालीशी जोडले गेल्याने दोन्ही देशांचाही फायदा होईल. डिजिटल परिवर्तनाचा वेग वाढेल. स्थानिक अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण बदल होतील. आपल्या देशांदरम्यान पर्यटनात वाढ होईल. मला विश्वास आहे की भारतीय पर्यटक देखील, UPI उपलब्ध असणाऱ्या पर्यटन स्थळांना प्राधान्य देतील. श्रीलंका आणि मॉरीशसमध्ये वास्तव्यास असणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांना आणि तिथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा विशेष लाभ होईल. आशियात नेपाळ, भूतान, सिंगापूर आणि आखाती प्रदेशात संयुक्त अरब अमिराती नंतर आता मॉरीशस मधून आफ्रिकेत रुपे कार्डची सुरूवात होत आहे. याद्वारे मॉरीशस मधून भारतात येणाऱ्या लोकांचीही सोय होणार आहे. रोख चलन खरेदी करण्याची गरजही कमी होईल. UPI आणि RuPay कार्ड व्यवस्थेमुळे आपल्या स्वतःच्या चलनात वेळ वास्तविकता, कमी खर्च आणि सोयीस्कर पद्धतीने प्रदान करता येईल. येणाऱ्या काळात आपल्याला सीमापार प्रदान म्हणजेच व्यक्तीसापेक्ष (P2P) प्रदानता सुविधेच्या दिशेने वाटचाल करता येऊ शकते.

महोदय हो,

आजची ही सुरुवात ग्लोबल साऊथ सहकार्याच्या यशस्वितेचे प्रतीक आहे. आपले संबंध केवळ देवाण घेवाणीचे नाहीत, हे ऐतिहासिक संबंध आहेत. याच्या बळावर आपल्या व्यक्तीसापेक्ष संबंधांना सामर्थ्य मिळत आहे. गेल्या दहा वर्षात आम्ही दाखवून दिले आहे की संकटाच्या प्रत्येक क्षणी भारत कसा कायम आपल्या शेजारी मित्रांच्या बरोबर उभा राहतो. संकट नैसर्गिक असो, आरोग्यविषयक असो, आर्थिक असो किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर सोबत करणे असो भारत कायमच प्रथम प्रतिसाद देत आला आहे आणि यापुढेही देत राहील. जी-20 चे अध्यक्षपद भूषवतानाही आम्ही ग्लोबल साऊथच्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले होते. भारताचे जी-20 डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा लाभ, ग्लोबल साऊथ देशांना देण्यासाठी आम्ही सामाजिक दायित्व निधीचीही स्थापना केली आहे.

मित्र हो,

या उपक्रमाची सुरुवात करण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या राष्ट्रपती रनिल विक्रमसिंघे आणि पंतप्रधान प्रविंद जुगनौथ जी यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. या प्रसंगी तिन्ही देशांच्या मध्यवर्ती  बँका आणि संबंधित संस्थांना देखील हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मी धन्यवाद देतो. धन्यवाद.

 

* * *

Jaydevi PS/S.Naik/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2005517) Visitor Counter : 95