पंतप्रधान कार्यालय

मध्य  प्रदेशातल्या झाबुआ येथे सुमारे 7300 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांची पंतप्रधानांनी केली पायाभरणी आणि राष्ट्रार्पण


विशेष मागास जमातीतील सुमारे 2 लाख महिला लाभार्थ्यांना आहार अनुदानाचा  मासिक हप्ता केला वितरित

स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना  1.75 लाख अधिकार अभिलेखाचे केले  वितरण

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत  559 गावांना  55.9 कोटी रुपये हस्तांतरित

रतलाम आणि मेघनगर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी पायाभरणी

रस्ते, रेल्वे, वीज आणि जल क्षेत्राशी संबंधित बहुविध प्रकल्पांची केली पायाभरणी आणि राष्ट्रार्पण

Posted On: 11 FEB 2024 7:07PM by PIB Mumbai

 

मध्य  प्रदेशातल्या झाबुआ येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 7300 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांची  पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले.  या विकास प्रकल्पांमुळे या क्षेत्रातील आदिवासी लोकसंख्येला मोठा लाभ होणार आहे.  या क्षेत्रातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होऊन पेयजलाची तरतूद होईल. तसेच मध्य प्रदेशातील रस्ते, रेल्वे, वीज आणि शिक्षण क्षेत्राला यामुळे चालना मिळणार आहे. यावेळी पंतप्रधानांनी विशेष मागास जमातीतील सुमारे 2 लाख महिला लाभार्थ्यांना आहार अनुदानाचा  मासिक हप्ता वितरित केला. तसेच  स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना  1.75 लाख अधिकार अभिलेखाचे वितरण केले आणि प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत  559 गावांना  55.9 कोटी रुपये हस्तांतरित केले.

पंतप्रधानांनी हाती घेतलेल्या उपक्रमांसाठी अंत्योदयाची संकल्पना दीपस्तंभासारखी असून लक्ष्यीत क्षेत्रांपैकी एक प्रमुख क्षेत्र म्हणजे स्वातंत्र्यानंतर अनेक दशके उलटूनही विकासाच्या लाभापासून वंचित असलेल्या मोठ्या घटकापर्यंत, आदिवासी समाजापर्यंत विकासाचे  लाभ पोहोचतील, हे सुनिश्चित करण्याचे आहे.  या अनुषंगाने, पंतप्रधानांनी या प्रदेशात लक्षणीय असलेल्या  आदिवासी लोकसंख्येला लाभदायक ठरणाऱ्या अनेक उपक्रमांचे राष्ट्रार्पण  आणि पायाभरणी केली.

आहार अनुदान योजनेंतर्गत सुमारे 2 लाख महिला लाभार्थ्यांना आहार अनुदानाचा मासिक हप्ता यावेळी पंतप्रधानांनी  वितरित केला. या योजनेंतर्गत मध्य प्रदेशातील विविध विशेष मागास जमातींमधील महिलांना पोषण  आहारासाठी दरमहा 1500 रुपये  दिले जातात.

स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना 1.75 लाख अधिकार अभिलेख पंतप्रधानांनी वितरित केले. यामुळे लोकांना त्यांच्या जमिनीच्या हक्काचा कागदोपत्री पुरावा मिळणार आहे.

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत 559 गावांना 55.9 कोटी रुपये त्यांनी हस्तांतरित केले. ही रक्कम अंगणवाडी भवन, रास्त भाव दुकाने, आरोग्य केंद्रे, शाळांमध्ये अतिरिक्त वर्गखोल्या आणि अंतर्गत रस्त्यांसह विविध प्रकारच्या बांधकामासाठी वापरण्यात येणार आहे.

झाबुआ येथे पंतप्रधानांनी सीएम राइज  स्कूलची पायाभरणी केली. विद्यार्थ्यांना स्मार्ट क्लास, ई लायब्ररी इत्यादी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शाळा तंत्रज्ञान एकात्मीकरण  करेल.

मध्य प्रदेशातील पाणीपुरवठा आणि पिण्याच्या पाण्याची सोय  करणाऱ्या अनेक प्रकल्पांची पंतप्रधानांनी पायाभरणी केली, तसेच काही राष्ट्राला समर्पित केले.  पायाभरणी झालेल्या प्रकल्पांमध्ये, धार आणि रतलाममधील एक हजाराहून अधिक गावांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना असलेला तलावडा प्रकल्प’  आणि अटल मिशन फॉर रिजुवेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (AMRUT) 2.0 अंतर्गत, मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमधील 50 हजाराहून अधिक शहरी कुटुंबांना लाभ देणाऱ्या 14 शहरी पाणीपुरवठा योजना आहेत.  त्यांनी झाबुआच्या 50 ग्रामपंचायतींसाठी नल जल योजनादेशाला समर्पित केली. या योजनेमुळे सुमारे 11 हजार घरांना नळाद्वारे पाणी मिळेल.

पंतप्रधानांनी या कार्यक्रमात, अनेक रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी केली तसेच काही देशाला समर्पित केले.  यामध्ये रतलाम रेल्वे स्थानक आणि मेघनगर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या पायाभरणीचा समावेश आहे.  अमृत ​​भारत रेल्वेस्थानक योजनेअंतर्गत या स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे.  राष्ट्राला समर्पित केलेल्या रेल्वे प्रकल्पांमध्ये, इंदूर- देवास- उज्जैन सी केबिन रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, इटारसी- उत्तर-दक्षिण ग्रेड सेपरेटर यार्ड रीमॉडेलिंग आणि बरखेरा-बुदनी-इटारसी यांना जोडणारी तिसरी मार्गिका, यांचा समावेश आहे.  या प्रकल्पांमुळे रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत होण्यास मदत होईल आणि प्रवासी आणि मालगाड्यांसाठी प्रवासाचा वेळ कमी होईल.

पंतप्रधानांनी मध्य प्रदेशातील 3275 कोटींहून अधिक किमतीचे अनेक रस्ते विकास प्रकल्प, राष्ट्राला समर्पित केले. यात हरदा-बेतुल चे चौपदरीकरण बेतुल (पॅकेज-I),  राष्ट्रीय महामार्ग-47 च्या 0.00 किमी ते 30.00 किमी (हरदा-टेमागाव) चौपदरीकरण, राष्ट्रीय महामार्ग-752D चा उज्जैन देवास विभागराष्ट्रीय महामार्ग-47 च्या इंदूर-गुजरात मध्य प्रदेश  सीमा विभागाचे चौपदरीकरण (16 किमी) आणि राष्ट्रीय महामार्ग-47 च्या चिचोली-बेतुल (पॅकेज-III) हरदा-बेतुल  चे चौपदरीकरण आणि राष्ट्रीय महामार्ग-552G चा उज्जैन झालावाड विभाग, यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे रस्ते दळणवळण सुधारेल आणि या भागातील आर्थिक विकासालाही मदत होईल.

पुढे, त्यांनी इलेक्ट्रिक सबस्टेशन यासह इतर विकास उपक्रमांचे लोकार्पण केले आणि पायाभरणी केली.

पंतप्रधानांच्या समवेत मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई सी. पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा आदी उपस्थित होते.

***

N.Chitale/S.Kakade/A.Save/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2005103) Visitor Counter : 81