पंतप्रधान कार्यालय

महर्षी दयानंद सरस्वती यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित


"ज्या काळात आपल्या परंपरा आणि अध्यात्म लोप पावत चालले होते, तेव्हा स्वामी दयानंद यांनी आपल्याला 'वेदांकडे परत' जाण्याचे आवाहन केले"

"महर्षी दयानंद हे केवळ वैदिक ऋषी नव्हे तर राष्ट्रीय ऋषीही होते"

"स्वामीजींना भारताविषयी जो विश्वास होता, स्वातंत्र्याच्या अमृत काळात आपल्याला त्या विश्वासाचे आपल्या आत्मविश्वासात रुपांतर करावे लागेल"

"प्रामाणिक प्रयत्न आणि नवीन धोरणांद्वारे देश आपल्या मुलींची प्रगती साधत आहे"

Posted On: 11 FEB 2024 12:32PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वामी दयानंद सरस्वती यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त गुजरात राज्यातील मोरबीमधील टंकारा येथील स्वामी दयानंद यांच्या जन्मस्थानी आयोजित विशेष कार्यक्रमाला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले.

स्वामीजींच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी तसेच त्यांची शिकवण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आर्य समाजाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल पंतप्रधानांनी  आपल्या भाषणात आनंद व्यक्त केला. "अशा महान आत्म्याचे इतके थोर योगदान असताना, त्यांच्याशी संबंधित उत्सव व्यापक असणे स्वाभाविक आहे.", असे मत पंतप्रधानांनी गेल्या वर्षीच्या महोत्सवाच्या उद्घाटनातील त्यांच्या सहभागावर  बोलताना  व्यक्त केले.

"हा कार्यक्रम आपल्या नवीन पिढीला महर्षी दयानंदांच्या जीवनाची ओळख करून देण्यासाठी एक प्रभावी माध्यम म्हणून काम करेल," असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. स्वामीजी सारख्या उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वांचा वारसा पुढे नेण्याच्या महत्त्वावर पंतप्रधानांनी जोर दिला.

स्वामी दयानंद यांचा जन्म गुजरातमध्ये झाला होता आणि हरियाणा हे त्यांचे कार्यक्षेत्र होते, असे पंतप्रधानांनी सांगितले.  पंतप्रधानांनी या दोन्ही प्रदेशांशी त्यांचे संबंध अधोरेखित केले आणि स्वामी दयानंद यांचा आपल्या जीवनावर खोल प्रभाव असल्याचे सांगितले. "स्वामीजींच्या शिकवणींने  माझ्या विचारांना आकार दिला आहे आणि त्यांचा वारसा माझ्या जीवन प्रवासाचा अविभाज्य भाग आहे." असे पंतप्रधान म्हणाले. स्वामीजींच्या जयंतीनिमित्त भारत आणि विदेशातील लाखो अनुयायांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.

स्वामी दयानंदांच्या शिकवणीच्या परिवर्तनात्मक प्रभावावर चिंतन करताना पंतप्रधान म्हणाले की, "इतिहासात असे काही क्षण असतात ज्यामुळे भविष्याचा मार्ग बदलतो. दोनशे वर्षांपूर्वी, स्वामी दयानंद यांचा जन्म हा देखील असाच एक अभूतपूर्व क्षण होता." अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या बंधनातून भारताला जागृत करण्यात महत्वपूर्ण योगदान आणि वैदिक ज्ञानाचे सार पुन्हा एकदा जाणून घेण्याच्या चळवळीचे नेतृत्व या स्वामीजींच्या भूमिकेवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.  "ज्या काळात आपल्या परंपरा आणि अध्यात्म लोप पावत होते, त्या काळात स्वामी दयानंद यांनी आपल्याला 'वेदांकडे परत' जाण्याचे आवाहन केले," असे ते म्हणाले. वेदांवर विद्वत्तापूर्ण भाष्य करणे आणि तर्कशुद्ध व्याख्या प्रदान करण्याच्या स्वामीजींच्या प्रयत्नांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. सामाजिक नियमांवरील स्वामीजींच्या निर्भय आलोचनेवर आणि भारतीय तत्त्वज्ञानाच्या खऱ्या साराच्या स्पष्टीकरणावर पंतप्रधानांनी भर दिला. स्वामीजींच्या या कार्यामुळे समाजात आत्मविश्वास पुन्हा निर्माण झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. स्वामी दयानंद यांची शिकवण एकात्मता वाढवण्यासाठी आणि भारताच्या प्राचीन वारशाबद्दल अभिमानाची भावना निर्माण करण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावत आहे याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

आपल्या सामाजिक अपप्रवृत्तींचा वापर ब्रिटीश सरकारने आपली प्रतिमा निकृष्ट म्हणून दाखवण्यासाठी केला. काहींनी सामाजिक बदलांचा संदर्भ देत ब्रिटिश राजवटीचे समर्थन केले. स्वामी दयानंदांच्या आगमनाने या षडयंत्राला तीव्र  धक्का बसला." असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. "लाला लजपत राय, राम प्रसाद बिस्मिल आणि स्वामी श्रद्धानंद यांसारख्या क्रांतिकारकांची मालिका आर्य समाजाच्या प्रभावाने उदयास आली. त्यामुळे दयानंद जी केवळ वैदिक ऋषी नव्हते तर ते राष्ट्रीय ऋषीही होते.यावर पंतप्रधानांनी भर दिला,

अमृत काळाच्या सुरुवातीच्या वर्षांत 200 वा वर्धापन दिन आला असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी स्वामी दयानंद यांनी ठेवलेल्या दूरदृष्टीचे पंतप्रधान मोदी यांनी स्मरण केले. स्वामीजींचा भारताविषयी असलेल्या  विश्वासाचे  आपल्याला अमृत कालात आपल्या आत्मविश्वासात रुपांतर करावे लागेल. स्वामी दयानंद हे आधुनिकतेचे पुरस्कर्ते आणि मार्गदर्शक होते,” असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

जगभरातील आर्य समाज संस्थांच्या विस्तृत जाळ्याची प्रशंसा करत पंतप्रधान मोदी म्हणाले की  "2,500 हून अधिक शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे आणि 400 हून अधिक गुरुकुलात विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत असून, आर्य समाज हा आधुनिकतेचा आणि मार्गदर्शनाचा झळाळता पुरावा आहे." 21व्या शतकात राष्ट्र उभारणीच्या उपक्रमांची जबाबदारी नव्या सामर्थ्याने घेण्याचे आवाहन त्यांनी समुदायाला केले. डीएव्ही संस्थांना 'स्वामीजींची जिवंत स्मृती' असे संबोधत पंतप्रधानांनी त्यांच्या सतत सक्षमीकरणाची ग्वाही दिली.

स्वामीजींचा दृष्टीकोन पुढे राबवणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. त्यांनी विद्यार्थी आणि आर्य समाजाच्या संस्थांना वोकल फॉर लोकल, आत्मनिर्भर भारत, मिशन लाइफ, जल संधारण, स्वच्छ भारत, क्रीडा आणि शारीरिक तंदुरुस्तीत योगदान देण्याचे आवाहन केले. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांनी स्वतःची जबाबदारी समजून घेण्यावरही त्यांनी भर दिला.

आर्य समाजाच्या स्थापनेच्या येत्या 150 व्या वर्धापन दिनाचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी यांनी सामूहिक प्रगती आणि स्मरणाची संधी म्हणून या महत्त्वपूर्ण प्रसंगाचा लाभ घेण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित केले.

नैसर्गिक शेतीचे महत्त्व सांगताना पंतप्रधानांनी आचार्य देवव्रत जी यांनी केलेले प्रयत्न अधोरेखित करताना सांगितले की, "स्वामी दयानंद जी यांच्या जन्मस्थानाहून सेंद्रीय शेतीचा संदेश देशातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचू द्या."

महिला हक्कांसाठी स्वामी दयानंदांनी केलेल्या पुरस्काराची प्रशंसा करताना पंतप्रधान मोदी यांनी नुकताच नारी शक्ती वंदन अधिनियम झाल्याचे सांगून  "प्रामाणिक प्रयत्न आणि नवीन धोरणांद्वारे देश आपल्या कन्यांना आघाडीवर नेत आहे." असे ते म्हणाले. या सामाजिक उपक्रमांद्वारे लोकांना जोडण्याचे महत्त्व विषद करत ही महर्षी दयानंद यांना खरी आदरांजली ठरेल असे त्यांनी सांगितले.

डीएव्ही नेटवर्कच्या तरुणांना नव्याने स्थापन झालेल्या माय-भारत या युवा संघटनेत सामील होण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना केले. " स्वामी दयानंद सरस्वती यांच्या सर्व अनुयायांना आपण डीएव्ही शैक्षणिक नेटवर्कमधील विद्यार्थ्यांना माय भारतमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन  करतो." असे ते म्हणाले.

***

N.Chitale/S.Mukhedkar/S.Naik/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2004995) Visitor Counter : 87