युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
नाडाने 'रोड टू पॅरिस 2024: चॅम्पियनिंग क्लीन स्पोर्ट्स अँड युनिटिंग फॉर अँटी-डोपिंग" परिषदेचे केले आयोजन
अनुराग सिंह ठाकूर यांनी पोषण पूरक चाचणीसाठीच्या उत्कृष्टता केंद्राचे (सी. ओ. ई.-एन. एस. टी. एस.) केले उद्घाटन
Posted On:
09 FEB 2024 8:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2024
राष्ट्रीय उत्तेजक द्रव्यविरोधी संस्थेने (नाडा) आज नवी दिल्ली येथे 'रोड टू पॅरिस 2024: चॅम्पियनिंग क्लीन स्पोर्ट्स अँड युनिटिंग फॉर अँटी-डोपिंग' परिषदेचे आयोजन केले.
गुजरातमधील गांधीनगर येथील प्रतिष्ठित राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठात (एन. एफ. एस. यू.) पोषण पूरक चाचणीसाठी उत्कृष्टता केंद्राचे (सी. ओ. ई.-एन. एस. टी. एस.) अनुराग सिंह ठाकूर यांनी यावेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केले.
नवी दिल्लीतील भारतीय आंतरराष्ट्रीय केन्द्र येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता. क्रीडा समुदायातील हितधारकांसाठी पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या आधी प्रमुख उत्तेजक विरोधी उपक्रमांवर एकत्र येण्यासाठी, विचारपूर्वक रणनीती आखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून हा कार्यक्रम मोलाची भूमिका बजावतो.
निष्पक्ष खेळाची मूलभूत तत्त्वे, स्पर्धेची भावना आणि खेळातील सचोटी कायम ठेवण्याच्या अनिवार्यतेवर त्यांनी आपल्या बीजभाषणात भर दिला. भारतीय खेळाडूंनी दाखवलेल्या समर्पण आणि जिद्दीचे त्यांनी कौतुक केले. देशाच्या उत्तेजक द्रव्य विरोधी रुपरेषेला बळकटी देण्यात नाडाची महत्त्वपूर्ण भूमिकाही त्यांनी अधोरेखित केली.
"खेळाडूंसाठी पोषण पूरक चाचण्यां करीता उत्कृष्टता केंद्राची स्थापना ही भारतात पोषण पूरक चाचणी सुविधा विकसित करण्याच्या, मंत्रालयाच्या दीर्घकालीन उद्दिष्टाशी सुसंगत आहे" असे ते म्हणाले.
जागतिक क्रीडा मंचावर एक राष्ट्र म्हणून 'रोड टू पॅरिस 2024' ही संकल्पना आपल्या आकांक्षांशी खोलवर जुळते असे केंद्रीय मंत्री अनुराग सिंग ठाकूर पुढे म्हणाले. "आपण खूप मोठा पल्ला गाठला आहे आणि आपल्या देशाला गौरव मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आपल्या खेळाडूंच्या समर्पण आणि कठोर परिश्रमाने हा प्रवास चिन्हांकित झाला आहे" असेही त्यांनी सांगितले.
नाडाच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. “निकोप खेळ आणि उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी उपायांना प्रोत्साहन देण्यासाठी नाडाचे अथक प्रयत्न प्रशंसनीय आहेत. खेळाडूंना शिक्षित करण्यात, चाचण्या घेण्यात आणि उत्तेजक द्रव्यविरोधी नियम आणि धोरणांची अंमलबजावणी करण्यात नाडाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे असे ते म्हणाले.
उत्तेजक द्रव्य विरोधी प्रयत्न हे निष्पक्ष आणि निकोप क्रीडा वातावरणाची खातरजमा करण्यासाठी अविभाज्य आहेत. हे ध्येय साध्य करण्यासाठी नाडाने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेला सरकारची मान्यता आहे असेही केंद्रीय मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनीही अधोरेखित केले.
"राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य चाचणी प्रयोगशाळा (एन. डी. टी. एल.) देखील अचूक आणि विश्वासार्ह चाचणी प्रक्रियेची खातरजमा करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. निधीचे वाटप तसेच पायाभूत सुविधांच्या सुधारेबाबत सरकारचे पाठबळ, या संस्थांना त्यांच्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्यासाठी सक्षम करेल" असे ते पुढे म्हणाले.
नाडाने "द पॅरिस पिनाकलः नाडाज् गाईड टू एथिकल स्पोर्टिंग" चे अनावरण केले. पॅरिस ऑलिम्पिक 2024 ची तयारी करणाऱ्या खेळाडूंसाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करणारे एक महत्वाचे संसाधन आहे. हे मार्गदर्शक साहित्य, खेळाडूंसाठी दिशादर्शक म्हणून काम करते, त्यांना नैतिकदृष्ट्या स्पर्धा खेळण्यास आणि निष्पक्ष खेळाच्या तत्त्वांचे पालन करण्यास सक्षम करते.
2024 च्या ऑलिम्पिकसाठी जागतिक क्रीडा समुदाय पॅरिसमध्ये एकत्र येत असताना, 'रोड टू पॅरिस 2024' ही परिषद निकोप खेळांचे विजेतेपद मिळवण्याच्या आणि उत्तेजक पदार्थांविरूद्ध एकत्र येण्याच्या भारताच्या संकल्पाचा पुरावा म्हणून काम करते. सहयोगात्मक प्रयत्न आणि सामूहिक वचनबद्धतेसह, खेळातील निष्पक्षता, सचोटी आणि नैतिक स्पर्धेचा पथप्रदर्शक म्हणून आपली भूमिका भारत अधोरेखित करतो.
* * *
S.Bedekar/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2004725)
Visitor Counter : 66