नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत एअरबस A220 चे दरवाजे उत्पादनाचे केले अनावरण

Posted On: 08 FEB 2024 9:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 8 फेब्रुवारी 2024


केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य माधवराव सिंधिया यांनी आज एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात "मेक-इन-इंडिया" उपक्रमांतर्गत एअरबसच्या महत्त्वपूर्ण विस्ताराचे अनावरण केले. भारतात सिंगल-आइसल A220 फॅमिली एअरक्राफ्टसाठी आवश्यक असणारे सर्व दरवाजे तयार करण्याच्या उद्देशाने एअरबस आणि डायनामॅटीक टेक्नॉलॉजीज् एकत्र आले आहेत.

“जगभरातील एरोस्पेस उत्पादनासाठी भारत आता  एक महत्त्वपूर्ण ठिकाण बनत आहे, एअरबससोबत आधीच कार्यरत असलेल्या डायनॅमॅटिक टेक्नॉलॉजीज् ला विमानाच्या दरवाजांची सर्वात मोठी ऑर्डर मिळणे हा माननीय पंतप्रधानांच्या कार्यकाळातील ‘मेक इन इंडियाचा’ संकल्प साकार करणारा एक उत्तम क्षण आहे”, असे या नवीन उत्पादन सुविधेबाबत बोलताना सिंधिया यांनी सांगितले.  

“एअरबस ही कंपनी आधीच 750 दशलक्ष डॉलर्स किमतीची भारतात बनवलेली उत्पादने निर्यात करत आहे आणि पुढील काही वर्षात ते दुप्पट करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे,” असे सिंधिंया यांनी मेक इन इंडिया मिशनमध्ये एअरबसच्या योगदानाबद्दल बोलताना सांगितले. इंडिया इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सेंटर, एअरबस इंडिया इनोव्हेशन सेंटर अशा व्यवस्थापन केंद्रापासून ते पायलट प्रशिक्षण केंद्रापर्यंत, एअरबसने भारतात तंत्रज्ञान हस्तांतरण तसेच मानव संसाधन विकास या दोन्ही क्षेत्रांमध्ये प्रचंड गुंतवणूक केली आहे. तसेच, भारत-फ्रान्स संबंध बळकट केल्याबद्दल मी एअरबसचे आभार मानतो,” असेही ते म्हणाले.

“1100 व्यावसायिक पायलट परवाने देऊन आपण यामध्ये नवीन उच्चांकावर पोहोचलो आहोत. भारतात मानवी संसाधन क्षमता विकसित करण्याच्या या मार्गावर आम्ही वचनबद्ध आहोत," असे विमान वाहतूक उद्योगाबाबत सरकारच्या प्रयत्नांची माहिती देताना सिंधिया यांनी सांगितले.

मेक इन इंडिया मिशनला चालना

एअरबसने दरवाजासाठी भारतीय पुरवठादाराबरोबर केलेला हा दुसरा करार आहे. यामुळे भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ दृष्टीकोनाला बळ मिळाले आहे.

याआधी, एअरबसने ॲक्वस, डायनामॅटीक, गार्डनर आणि महिंद्रा एरोस्पेस  सोबत एअरबस च्या A320neo, A330neo आणि A350 या प्रकारामध्ये एअरफ्रेम आणि विंग पार्ट पुरवठ्यासाठी करार केले आहेत.


N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2004231) Visitor Counter : 110