संरक्षण मंत्रालय
जागतिक मंचावर सशस्त्र दलांतील नारीशक्तीचा आविष्कार: रियाध येथे आयोजित जागतिक संरक्षण प्रदर्शन 2024 मध्ये स्क्वाड्रन लीडर भावना कांत, कर्नल पोनुंग डोमिंग आणि लेफ्टनंट कमांडर अन्नू प्रकाश यांनी त्यांच्या उल्लेखनीय वाटचालीची माहिती सामायिक केली
Posted On:
08 FEB 2024 2:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 8 फेब्रुवारी 2024
विविध क्षेत्रांत नारी शक्तीचा उपयोग करून घेण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दूरदृष्टीचा पुरावा देत रियाध येथे सध्या सुरु असलेल्या जागतिक संरक्षणविषयक प्रदर्शन (डब्ल्यूडीएस) 2024 मध्ये तिन्ही भारतीय सेनादलांच्या प्रतिनिधित्वाचे दर्शन घडले. स्क्वाड्रन लीडर भावना कांत, कर्नल पोनुंग डोमिंग आणि लेफ्टनंट कमांडर अन्नू प्रकाश यांनी डब्ल्यूडीएस 2024 मध्ये आयोजित विविध चर्चासत्रांमध्ये, विशेषतः संरक्षण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय महिला या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन सशस्त्र दलांचे प्रतिनिधित्व केले.
अमेरिकेतील सौदी राजदूत राजकुमारी रीमा बिंत बांदर अल-सौद यांनी दिनांक 07 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित केलेल्या ‘संरक्षण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय महिला – सर्वसमावेशक भविष्यामधील गुंतवणूक’ या संकल्पनेवर आधारित गटचर्चेत भारतीय हवाई दलातील लढाऊ वैमानिक स्क्वाड्रन लीडर भावना कांत यांनी विषयतज्ञ म्हणून भाग घेतला. स्क्वाड्रन लीडर भावना यांनी अडथळ्यांची बंधने तोडण्याचा, आकाशात उंच भरारी घेण्याचा आणि त्यातून भारतातील मान्यवर लढाऊ वैमानिकांच्या गटाचा भाग होण्याचा प्रेरणादायी प्रवास उपस्थितांशी सामायिक केला.नेतृत्व, लवचिकता आणि आधुनिक युध्द क्षेत्रात महिलांची भूमिका यासंदर्भात मांडलेल्या विचारातून त्यांच्या प्रवासाने प्रभावित झालेल्या विविध प्रकारच्या श्रोत्यांना त्यांनी मुग्ध केले.प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात (2021) सहभागी झालेल्या त्या पहिल्याच लढाऊ महिला वैमानिक आहेत.या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या हवाई कसरतींमध्ये देखील त्यांनी भाग घेतला.
भारतीय लष्करात कार्यरत कर्नल पोनुंग डोमिंग या उत्तर भागात 15,000 फुटांहून अधिक उंचीवरील जगातील सर्वोच्च उंचावर असलेल्या सीमा कृती दलाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. त्यांच्या 20 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी प्रथमच होणाऱ्या उपक्रमांत भाग घेऊन असे अनेक विक्रम स्थापित केले आहेत. अभियांत्रिकी अधिकारी म्हणून त्या अनेक आव्हानात्मक मोहिमांमध्ये आघाडीवर राहिल्या आहेत.
भारतीय नौदलातील लेफ्टनंट कमांडर अन्नू प्रकाश यांनी सागरी सुरक्षा तसेच आघाडीवरील फळीत काम करण्यासंदर्भातील त्यांच्या तज्ञतेचे दर्शन घडवले. त्यांच्या सहभागाने भारताचा विशाल सागरकिनारा सुरक्षित राखण्यात आणि प्रादेशिक सुरक्षेची सुनिश्चितता करण्यात महिला निभावत असलेल्या भूमिकेला अधोरेखित केले. या कार्यक्रमातील त्यांची उपस्थिती सागरी क्षेत्रात भारत आणि इतर देश यांच्या दरम्यान अधिक मजबूत बंध आणि सहयोग यांची जोपासना करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरली.
डब्ल्यूडीएस 2024 मध्ये या तीन असाधारण महिलांचा सहभाग संरक्षण क्षेत्रातील भारतीय महिलांच्या वाढत्या जबाबदारीचा पुरावा आहे. रियाध येथील आंतरराष्ट्रीय भारतीय विद्यालय येथे आयोजित कार्यक्रमासाठी विविध विद्यालयांतून आलेल्या सुमारे 600 शालेय विद्यार्थ्यांसमोर दिनांक 08 फेब्रुवारी 2024 रोजी या तिघीजणी त्यांच्या उल्लेखनीय वाटचालीबद्दल प्रेरणादायी चर्चा करतील. हा कार्यक्रम म्हणजे गणवेशधारी भारतीय महिलांची वैविध्यपूर्ण प्रतिभा आणि नेतृत्वगुण यांचे सादरीकरण करणारा मंच असेल आणि त्यातील चर्चेतून भविष्यातील पिढ्यांना आपापल्या स्वप्नांचा पाठलाग करून नव्या क्षेत्रांमध्ये यश मिळवण्याची प्रेरणा मिळेल..
दिनांक 04 फेब्रुवारी 2024 रोजी सुरु झाली. डब्ल्यूडी’एस 2024 हे प्रदर्शन 08 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न होईल. या कार्यक्रमासाठी रियाध येथे गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे प्रमुख म्हणून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी रियाधला भेट दिली.
S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2003918)
Visitor Counter : 108