नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सरकार, 24 तास अक्षय ऊर्जा पुरवण्यासाठी हरित हायड्रोजनच्या वापराला प्रोत्साहन देण्याकरता धोरणात्मक यंत्रणेवर करत आहे काम

Posted On: 07 FEB 2024 4:42PM by PIB Mumbai

 नवी दिल्ली , 7 फेब्रुवारी 2024


राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानाच्या संकल्पनेनुसार, अक्षय ऊर्जेचा अधिकाधिक वापर करता यावा आणि हरित हायड्रोजनच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने, चोवीस तास वीजपुरवठ्यासाठी हरित हायड्रोजनच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या पद्धतींवर नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय काम करत आहे.

सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेसारख्या इतर पद्धतींच्या संयोगाने हरित हायड्रोजनचा वापर, 24 तास अक्षय उर्जेसाठी करण्याबाबत 6 फेब्रुवारी 2024 रोजी नवी दिल्लीत केंद्रीय ऊर्जा तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय, एनटीपीसी, केंद्रीय विद्युत आयोग आणि भारतीय सौर ऊर्जा महामंडळाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

चोवीस तास वीज आणि विजेची प्रचंड मागणी पूर्ण करता यावी याकरता ग्रीन हायड्रोजनचा साठवण माध्यम म्हणून वापर करण्याच्या विविध संभाव्य पर्यायांवर अधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. अशा प्रकल्पांसाठी सरकारी सहाय्य पुरवण्याच्या विविध यंत्रणांबाबतही बैठकीत चर्चा झाली. या संदर्भात विचार केल्या जात असलेल्या धोरणात्मक यंत्रणांमधे कॉन्ट्रॅक्ट फॉर डिफरन्स (सी. एफ. डी.) पद्धतीवर आधारित यंत्रणेचा समावेश आहे. बाजारभाव आणि मान्य केलेल्या दरामधील ('स्ट्राइक प्राइस’) फरकांवर तो आधारित आहे.

हरित हायड्रोजन आणि ऊर्जा क्षेत्राचे अर्थशास्त्र, तंत्रज्ञान आणि सध्याच्या तसेच भविष्यातील बाजारपेठेच्या परिस्थितीवर आधारित योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा तयार करण्याचे निर्देश मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

 

N.Chitale/V.Ghode/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2003530) Visitor Counter : 118