पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी गोव्यात 'विकसित भारत, विकसित गोवा 2047 "या कार्यक्रमात 1330 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी


गोव्यातील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या कायमस्वरूपी प्रांगणाचे केले उद्घाटन

राष्ट्रीय जल क्रीडा संस्थेच्या नवीन प्रांगणाचे केले लोकार्पण

संबंधित पर्यटन उपक्रम आणि 100 एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पासह प्रवासी रोपवेची केली पायाभरणी

100 टी. पी. डी. एकात्मिक कचरा व्यवस्थापन सुविधेचे केले उद्घाटन

रोजगार मेळ्याअंतर्गत विविध विभागांमध्ये भरती झालेल्या नवीन 1930 सरकारी कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश वितरित

विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे सुपूर्द

"एक भारत श्रेष्ठ भारत गोव्यात कोणत्याही हंगामात अनुभवता येतो"

"डबल इंजिन सरकारमुळे गोव्याचा वेगाने विकास"

'सर्वांपर्यंत लाभ पोहचवणे ही खरी धर्मनिरपेक्षता, हाच खरा सामाजिक न्याय आणि हीच गोवा आणि देशाला मोदींची हमी"

"डबल इंजिन असलेले सरकार गरीबांच्या कल्याणासाठी मोठ्या योजना राबवण्याबरोबरच पायाभूत सुविधांवर करत आहे विक्रमी गुंतवणूक"

"आमचे सरकार गोव्यातील संपर्क व्यवस्था सुधारण्यासाठी आणि लॉजिस्टिक हब बनवण्यासाठी कार्यरत.

"भारतातील सर्व प्रकारचे पर्यटन एकाच देशात, एकाच व्हिसावर उपलब्ध"

Posted On: 06 FEB 2024 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 फेब्रुवारी 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यात 'विकसित भारत, विकसित गोवा 2047 "या कार्यक्रमात 1330 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी आयोजित  प्रदर्शनाचीही पंतप्रधानांनी पाहणी केली. आज पायाभरणी तसेच उद्घाटन झालेल्या विकास प्रकल्पांमध्ये शिक्षण, क्रीडा, जलसंस्करण, कचरा व्यवस्थापन आणि पर्यटन क्षेत्रातील पायाभूत सुविधांना चालना देणे आदींचा समावेश आहे. पंतप्रधानांनी रोजगार मेळाव्याअंतर्गत विविध विभागांमध्ये  नव्याने भरती झालेल्या 1930 सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेशही वितरित केले. विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांनी मंजुरी पत्रेही सुपूर्द केली.

गोव्याचे प्राचीन समुद्रकिनारे आणि नैसर्गिक सौंदर्य अधोरेखित करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. भारत आणि परदेशातील कोट्यवधी पर्यटकांचे हे सुट्टीचा आनंद घेण्याचे लाडके ठिकाण आहे असे ते म्हणाले. "एक भारत श्रेष्ठ भारत गोव्यात कोणत्याही हंगामात अनुभवला जाऊ शकतो", असेही त्यांनी सांगितले. गोव्यात जन्मलेले महान संत, प्रसिद्ध कलाकार आणि विद्वान यांच्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. संत सोहिरोबानाथ अंबिये, नाटककार कृष्ण भट्ट बंडकर, गायक केसरबाई केरकर, आचार्य धर्मानंद कोसंबी आणि रघुनाथ अनंत माशेलकर यांचे त्यांनी स्मरण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आणि जवळच्या मंगेशी मंदिराशी असलेले त्यांचे जवळचे संबंध अधोरेखित केले. "स्वामी विवेकानंदांना मडगावमधील दामोदर सालमधून नवीन प्रेरणा मिळाली", असे ते पुढे म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी कुंकोलिम येथील लोहिया मैदान आणि सरदारांच्या स्मारकाविषयीही भाष्य केले.

पंतप्रधानांनी “गोयंचो सायब” म्हणून प्रसिद्ध असलेल्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेषांच्या प्रदर्शनाविषयी सांगितले. पंतप्रधानांनी जॉर्जियाच्या संत राणी केतेवन यांचेही स्मरण केले आणि शांतता तसेच एकसंघतेचे प्रतीक म्हणून या राणीचे पवित्र अवशेष परराष्ट्र मंत्र्यांनी जॉर्जियाला नेले होते याचा उल्लेख केला. “ख्रिस्ती आणि इतर समुदायांचे शांततापूर्ण सहअस्तित्व हे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चे उत्तम उदाहरण आहे,” असेही ते म्हणाले.

आज ज्या 1300 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन किंवा पायाभरणी करण्यात आली त्याबद्दल माहिती देताना पंतप्रधान म्हणाले की, शिक्षण, आरोग्य आणि पर्यटनाशी संबंधित हे प्रकल्प गोव्याच्या विकासाला नवी गती देतील.  " राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या कायमस्वरूपी परिसर आणि राष्ट्रीय जल क्रीडा संस्था परिसर तसेच एकात्मिक कचरा व्यवस्थापन सुविधा यातील 1930 नियुक्ती पत्रे राज्याच्या विकासाला नव्या उंचीवर नेतील" असेही ते म्हणाले.

“गोवा क्षेत्रफळ आणि लोकसंख्येने लहान राज्य असले तरीही ते सामाजिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे तसेच विविध समाज आणि धर्माचे लोक गोव्यात अनेक पिढ्यांपासून शांततेने एकत्र राहत आहेत.” असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी ‘सबका साथ सबका विकास’ या मंत्रावर प्रकाश टाकला आणि राज्याचा सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नेहमीच चोख प्रत्युत्तर देण्याच्या गोव्यातील लोकांच्या भावनेचे कौतुक केले.

स्वयंपूर्ण गोव्याचा संदर्भ देत पंतप्रधानांनी गोवा सरकारच्या सुशासन मॉडेलची प्रशंसा केली आणि यामुळेच गोव्यातील लोक कल्याणाच्या मापदंडावर आघाडीवर आहेत, असे सांगितले.  "डबल इंजिन सरकारमुळे गोव्याचा विकास वेगाने होत आहे", असे ते म्हणाले.  केंद्र सरकारच्या अनेक योजनांमध्ये प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी, वीज जोडणी, एलपीजी गॅस जोडणी, केरोसिन मुक्तता, हागणदारी मुक्त तसेच  केंद्र सरकारच्या इतर योजनांची संपृक्तता याचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.  “संपृक्ततेमुळे भेदभाव नाहीसा होतो आणि सर्व लाभार्थ्यांना लाभांचे पूर्ण हस्तांतरण होते.  म्हणूनच  "संपृक्तता हीच खरी धर्मनिरपेक्षता, संपृक्तता हाच खरा सामाजिक न्याय आणि संपृक्तता हीच गोवा आणि देशाला मोदींची हमी आहे", असे आपण मानत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. गोव्याच्या जनतेला विविध लाभ देणाऱ्या विकसित भारत संकल्प यात्रेत 30 हजारांहून अधिक लोक सहभागी झाल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला.

विविध योजनांच्या संपृक्ततेच्या सरकारच्या संकल्पाला यावर्षीच्या अर्थसंकल्पामुळे चालना मिळाली आहे, असे पंतप्रधानांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पाबाबत बोलताना सांगितले. गरिबांसाठी 4 कोटी पक्क्या घरांचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर सरकार आता गरिबांना दोन कोटी घरांची हमी देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.  पक्की घरे मिळवण्यात मागे राहिलेल्या लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे आवाहनही त्यांनी गोव्यातील जनतेला केले.  यंदाच्या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री आवास योजना आणि आयुष्मान योजनांचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पंतप्रधानांनी यंदाच्या अर्थसंकल्पातील मत्स्य संपदा योजनेचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी सांगितले की ही योजना मच्छीमार समुदायाला आणखी मदत आणि संसाधने पुरवेल, ज्यामुळे समुद्री खाद्य निर्यातीत आणि मच्छीमारांच्या उत्पन्नात वाढ होईल. अशा प्रयत्नांमुळे मत्स्य व्यवसाय क्षेत्रात लाखो रोजगाराच्या संधी निर्माण होतात याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मत्स्यपालकांच्या कल्याणासाठी सरकारच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकताना, पंतप्रधान मोदींनी समर्पित मंत्रालयाची निर्मिती, पीएम किसान क्रेडिट कार्ड सुविधा, विमा रकमेत 5 लाख रुपयांपर्यंत वाढ आणि बोटींच्या आधुनिकीकरणासाठी अनुदानाचा उल्लेख केला.

देशातील रस्ते, रेल्वे आणि विमानतळांच्या वेगवान विकासावर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी “दुहेरी इंजिन सरकार पायाभूत सुविधांमध्ये विक्रमी गुंतवणूक करत असून गरिबांच्या कल्याणासाठी मोठ्या योजना राबवत असल्याचे नमूद केले.” 10 वर्षांपूर्वीच्या 2 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 11 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. ते म्हणाले की, विकास प्रकल्प सुरू असलेल्या ठिकाणी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतात आणि प्रत्येक व्यक्तीच्या मिळकतीत वृद्धी होते.

संपर्क यंत्रणा वाढवण्याच्या आणि गोव्याला लॉजिस्टिक केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान म्हणाले, "आमचे सरकार गोव्यातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि त्याचे लॉजिस्टिक हबमध्ये रूपांतर करण्याच्या दिशेने काम करत आहे. गोव्यातील मनोहर पर्रिकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उदघाटनामुळे देशांतर्गत अव्याहत आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुविधा उपलब्ध झाली आहे." गतवर्षी लोकार्पण करण्यात आलेल्या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात लांब केबल ब्रिज, न्यू झुआरी पुलाचाही त्यांनी उल्लेख केला. नवीन रस्ते, पूल, रेल्वे मार्ग आणि शैक्षणिक संस्थांसह गोव्यातील जलद पायाभूत सुविधांचा विकास अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले, "या घडामोडी गोव्याच्या विकासाला नवीन उंचीवर नेत आहेत."

पंतप्रधान मोदींनी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशावर प्रकाश टाकला आणि भारताला सर्वांगीण पर्यटन स्थळ म्हणून स्थान देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर भर दिला. "आपल्या देशात प्रत्येक प्रकारचे पर्यटन एकाच व्हिसावर उपलब्ध आहे. पूर्वीच्या सरकारांकडे पर्यटन स्थळे, किनारी भाग आणि बेटांच्या विकासासाठी दूरदृष्टी नव्हती" अशी टिप्पणी त्यांनी केली. गोव्याच्या ग्रामीण भागात पर्यावरणस्नेही पर्यटनाची क्षमता ओळखून, स्थानिक रहिवाशांच्या फायद्यासाठी गोव्याच्या दुर्गम भागात पर्यटनाला चालना देण्यावर सरकारचे लक्ष पंतप्रधानांनी अधोरेखित केले. गोव्याला आणखी आकर्षक स्थळ बनवण्यासाठी फूड कोर्ट, रेस्टॉरंट्स आणि विश्राम कक्ष यासारख्या आधुनिक सुविधांच्या विकासासह गोव्यातील पर्यटन पायाभूत सुविधा वाढवण्याच्या उपक्रमांचीही पंतप्रधानांनी माहिती दिली.

“गोव्याला परिषद पर्यटनासाठीचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,” भारत उर्जा सप्ताह 2024 या कार्यक्रमाला दिवसाच्या सुरुवातीला दिलेल्या भेटीचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले. गोवा येथे झालेल्या महत्त्वाच्या विविध जी-20 बैठका तसेच गेल्या काही वर्षांमध्ये येथे आयोजित होत आलेल्या मोठ्या राजनैतिक बैठका यांचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा, जागतिक बीच व्हॉलीबॉल दौरा, 17 वर्षांखालील महिलांच्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा यांची देखील उदाहरणे त्यांनी दिली. ते म्हणाले की गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या 37 व्या राष्ट्रीय स्पर्धांमुळे गोव्याला संपूर्ण जगात ओळख मिळाली आहे. येत्या काही वर्षांमध्ये गोवा हे अशा कार्यक्रमांच्या आयोजनाचे मोठे केंद्र झाले असेल अशी ग्वाही त्यांनी दिली.

गोव्यातील फुटबॉल खेळाच्या मोठ्या योगदानाची प्रशंसा करत पंतप्रधान मोदी यांनी या खेळातील अमूल्य योगदानाबद्दल ब्रह्मानंद शंखवलकर यांना पद्म पुरस्कार देऊन गौरवले.पंतप्रधान मोदी म्हणाले की राष्ट्रीय क्रीडास्पर्धांसाठी राज्यात विकसित करण्यात आलेल्या पायाभूत सुविधा खेळाडूंना त्यांची स्वप्ने प्रत्यक्षात साकार करण्यासाठी उपयुक्त ठरतील.

सरकारने शिक्षणावर एकाग्र केलेले लक्ष ठळकपणे विषद करून पंतप्रधानांनी गोव्याला एका प्रमुख शैक्षणिक केंद्रात रुपांतरित करणाऱ्या अनेक संस्थांच्या स्थापनेचा उल्लेख केला.तांत्रिक प्रगतीची जोपासना करण्याच्या तसेच देशातील युवक आणि उद्योगजगत यांना लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने संशोधन तसेच नवोन्मेष करण्यासाठी अर्थसंकल्पात 1 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे अशी माहिती त्यांनी दिली.

भाषणाच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याच्या वेगवान विकासासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत यावर अधिक भर दिला आणि राज्याच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

केंद्रीय पर्यटन तसेच बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद यशो नाईक यांच्यासह गोव्याचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि इतर अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

पंतप्रधानांच्या हस्ते गोवा येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था या संस्थेच्या स्थायी परिसराचे उद्घाटन झाले. नव्याने उभारण्यात आलेल्या या परिसरामध्ये संस्थेतील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शिकवणी संकुल, विभागीय संकुल, चर्चासत्रासाठीचे संकुल, प्रशासकीय संकुल, वसतिगृहे, आरोग्य केंद्र, कर्मचारी निवासस्थाने, सुविधा केंद्र, खेळाचे मैदान आणि इतर सुविधा निर्माण  केल्या आहेत.

पंतप्रधानांनी यावेळी राष्ट्रीय जलक्रीडा संस्थेच्या नवीन परिसराचे लोकार्पण देखील केले. जलक्रीडा आणि पाण्यातील बचावकार्य उपक्रमांच्या विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने या संस्थेमध्ये सामान्य जनता तसेच सशस्त्र दलांसाठी 28 विशेष अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहेत. दक्षिण गोव्यात उभारण्यात आलेल्या 100 टीपीडी एकात्मिक कचरा व्यवस्थापन सुविधेचे देखील उद्घाटन पंतप्रधानांनी केले. या सुविधेमध्ये 60 टीपीडी ओला कचरा आणि 40 टीपीडी सुक्या कचऱ्यावर शास्त्रीय प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने संरचना करण्यात आली असून येथे 500 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून अतिरिक्त वीज देखील निर्माण करण्याची सुविधा आहे.

पर्यटनाशी संबंधित इतर अनेक उपक्रमांसह पंतप्रधानांच्या हस्ते आज पणजी आणि रेईस मेगोस यांच्या दरम्यानच्या प्रवासी रोपवे सेवेचा कोनशिला समारंभ झाला. याशिवाय पंतप्रधानांनी दक्षिण गोव्यात उभारण्यात येत असलेल्या 100 एमएलडी जलशुद्धीकरण संयंत्राच्या बांधकामाची पायाभरणी केली.

याशिवाय, त्यांनी रोजगार मेळाव्याअंतर्गत विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त झालेल्या 1930 नवीन उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वितरण देखील केले तसेच  सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे देखील सुपूर्द केली.

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

S.Patil/Vinayak/Shraddha/Vasanti/Sanjana/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2003245) Visitor Counter : 71