पंतप्रधान कार्यालय
लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्नने गौरवले जाणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा
Posted On:
03 FEB 2024 2:28PM by PIB Mumbai
ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारत रत्न ने गौरवले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या X वरच्या पोस्टद्वारे ही घोषणा केली.
पंतप्रधान मोदी यांनी लाल कृष्ण आडवाणी यांच्याशी बोलून, भारतरत्न सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले.
पंतप्रधानांनी X वर लिहिले केले आहे:
“मला हे सांगतांना अतिशय आनंद होत आहे की श्री लाल कृष्ण आडवाणी यांना भारतरत्न सन्मान जाहीर झाला आहे. मी त्यांच्याशी बोललो आणि हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले. आपल्या काळातील एक अत्यंत आदरणीय असे मुत्सद्दी राजकारणीअसलेल्या आडवाणी यांचे भारताच्या विकासातील योगदान अत्यंत महत्वाचे आहे. अगदी तळागाळातील कार्यकर्ता म्हणून त्यांच्या सामाजिक जीवनाची सुरुवात झाली आणि तो आलेख, देशाचे उपपंतप्रधान होण्यापर्यंत उंचावत गेला. गृहमंत्री आणि माहिती-प्रसारण मंत्री म्हणूनही त्यांनी आपल्या कार्याची छाप सोडली होती. संसदेतील चर्चेदरम्यान, त्यांचे वर्तन आणि त्यांची भाषणे, अनुकरणीय तसेच अत्यंत समृद्ध अशी दृष्टी देणारी होती.
सार्वजनिक जीवनातील कित्येक दशकांची त्यांची दीर्घ सेवा, पारदर्शकता आणि अढळ निष्ठा या मूल्यांप्रति समर्पित होती, त्यांच्या या जीवनकार्यातून त्यांनी पुढच्या पिढ्यांसाठी राजकीय नीतीमत्तेचा नवा आदर्श ठेवला. राष्ट्रीय एकतेची भावना वृद्धिंगत करण्यात तसेच, देशाच्या सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी त्यांनी अतुलनीय प्रयत्न केले आहेत. त्यांना भारतरत्न प्रदान होणे, हा माझ्यासाठी अतिशय भावनिक क्षण आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याच्या आणि त्यांच्याकडून शिकण्याच्या अनंत संधी मला मिळाल्यात, हे मी नेहमीच माझे भाग्य समजतो ".
***
S.Patil/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2002232)
Visitor Counter : 176
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam