वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

कोची येथे आयोजित  मसाले आणि पाककृतीसंबंधी औषधी वनस्पतींवरील कोडेक्स समितीचे 7 वे सत्र संपन्न, 5 मसाल्यांची गुणवत्ता मानके निश्चित करण्यात 31 देशांनी घेतला सहभाग

Posted On: 03 FEB 2024 12:55PM by PIB Mumbai

 

मसाले आणि पाककृतीसंबंधी औषधी वनस्पती (CCSCH) वरील कोडेक्स समितीचे 7 वे सत्र कोची येथे 29 जानेवारी 2024 ते 2 फेब्रुवारी 2024 दरम्यान आयोजित करण्यात आले होते.  कोविड-19 साथीच्या आजारानंतर, मसाले आणि पाककृतीसंबंधी औषधी वनस्पतीचे  हे या समितीने प्रत्यक्ष सहभागाद्वारे आयोजित केलेले पहिले सत्र होते.  या अधिवेशनात 31 देशांतील 109 प्रतिनिधी सहभागी झाले होते.

सीसीएससीएच 7 ने उत्कृष्ट परिणाम प्राप्त केले असून या सत्रात, लहान वेलची, हळद, जुनिपर बेरी (काळीभोर फळे येणारे एक सदाहरित झुडूप) ऑलस्पाईस आणि चक्रफूल या 5 मसाल्यांसाठीची गुणवत्ता मानके निश्चित करण्यात आली.

सीसीएससीएच 7 ने ही पाच मानके कोडेक्स एलिमेंटेरियस कमिशन (CAC) कडे पाठवली आहेत. ज्यात अंतिम चरण 8 वर पूर्ण कोडेक्स मानक म्हणून स्वीकारण्याची शिफारस करण्यात आली आहे.

या समितीमध्ये प्रथमच मसाल्यांच्या गटाची मानके ठरवण्याची रणनीती यशस्वीपणे राबवण्यात आली.  अशा प्रकारे समितीने या सत्रात फळे आणि बेरीपासून मिळणाऱ्या मसाल्यांसाठी’ (3 मसाले - ज्युनिपर बेरी, ऑलस्पाईस आणि चक्रफूल)  प्रथम गट मानके निश्चित केली आहेत.

व्हॅनिलासाठीचा मानक मसुदा चरण 5 पर्यंत पोहोचला असून हा मसुदा समितीच्या पुढील सत्रात चर्चेसाठी घेतला जाण्यापूर्वी सदस्य देशांकडून छाननीच्या आणखी एका फेरीला सामोरा  जाईल.

वाळलेल्या धणे, मोठी वेलची, गोड मरवा आणि दालचिनीसाठी कोडेक्स मानके विकसित करण्याचे प्रस्ताव समितीसमोर ठेवण्यात आले आणि ते स्वीकारण्यातही आले.  ही समिती आपल्या आगामी आवृत्त्यांमध्ये या चार मसाल्यांसाठी मानकांच्या मसुद्यावर काम करेल.

सीसीएससीएच  च्या 7 व्या सत्रात प्रथमच मोठ्या संख्येने लॅटिन अमेरिकन देशांनी सहभाग घेतला होता.

समितीची पुढील बैठक 18 महिन्यांच्या कालावधीनंतर होणार आहे.

मध्यंतरीच्या काळात, विविध देशांच्या अध्यक्षतेखालील इलेक्ट्रॉनिक कार्य गट (EWGs) बहुराष्ट्रीय सल्लामसलतीची प्रक्रिया सुरू ठेवतील, ज्याचा उद्देश विज्ञान आधारित पुराव्यावर अवलंबून राहून मानके विकसित करणे हा आहे.

कोडेक्स एलिमेंटरीयस कमिशन (CAC) ही खाद्य आणि कृषी संस्था  तसेच जागतिक आरोग्य संघटनेद्वारे संयुक्तपणे स्थापित एक आंतरराष्ट्रीय, आंतरशासकीय संस्था असून 194 पेक्षा जास्त देश याचे सदस्य आहेत. या संस्थेचे मुख्यालय रोममध्ये असून  मानवी अन्नाशी संबंधित आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकृत मानके तयार करण्याचे काम ही संस्था करते.

2013 मध्ये कोडेक्स ॲलिमेंटेरियस कमिशन (CAC) अंतर्गत उपयुक्त वस्तू कमिटींपैकी एक म्हणून मसाले आणि पाककृतीसंबंधी औषधी वनस्पतींवरील कोडेक्स कमिटीची (CCSCH) स्थापना करण्यात आली. भारत सुरुवातीपासून या प्रतिष्ठित समिती सत्रांचेच आयोजन करतो.

***

N.Joshi/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2002226) Visitor Counter : 54