संरक्षण मंत्रालय
नौदलाच्या आय एन एस सुमित्रा या जहाजाने चाचेगिरी विरोधी दुसरी यशस्वी मोहिम सर केली – सोमाली चाच्यांनी ओलिस ठेवलेल्या जहाजावरील 19 क्रू सदस्य आणि जहाजाची केली सुटका.
Posted On:
30 JAN 2024 9:34AM by PIB Mumbai
भारतीय नौदलाच्या आय एन एस सुमित्रा या जहाजाने सोमालियाच्या पूर्व किनाऱ्यावर समुद्री चाच्यांचा डाव उधळून लावत एफ व्ही इमान या जहाजाची सुटका करून चाचेगिरी विरोधात आणखी एक यशस्वी मोहीम आपल्या नावे केली आहे. या मोहिमेत आय एन एस सुमित्राने मासेमारी जहाज अल नईमी आणि त्यातील कर्मचाऱ्यांची (19 पाकिस्तानी नागरिकांची) 11 सोमाली चाच्यांपासून सुटका केली.
आय एन एस सुमित्रा, हे भारतीय नौदलाचे स्वदेशी बनावटीचे किनारी गस्ती जहाज असून सोमालिया आणि एडनच्या आखाताच्या पूर्वेला चाचेगिरी आणि सागरी सुरक्षा कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी ते तैनात करण्यात आले आहे. समुद्री चाच्यांनी इराणचा ध्वज असलेले मासेमारी जहाज (एफ व्ही) इमानवर चढाई करून त्यातील कर्मचारी आणि सदस्यांना ओलिस ठेवले होते, यासंदर्भातील संदेश प्राप्त होताच आय एन एस सुमित्राने 28 जानेवारी 2024 रोजी त्याला तात्काळ प्रतिसाद दिला. आय एन एस सुमित्राने एफ व्ही इमानला रोखून मानक संचालन प्रणालीनुसार कारवाई करत हे जहाज आणि त्यावरील कर्मचाऱ्यांची (17 इराणी नागरिक) 29 जानेवारी 2024 च्या पहाटे सुरक्षितपणे सुटका करण्यात आली, एफ व्ही इमानचे निर्जंतुकीकरण केल्यावर त्याचा पुढील प्रवास सुरु झाला.
त्यानंतर, पुन्हा एकदा आय एन एस सुमित्राने आणखी एका जहाजाच्या मदतीसाठी धाव घेतली. इराणचा ध्वज असेलेले मासेमारी जहाज अल नईमी, ला शोधून त्या जहाजाची चाच्यांपासून सुटका करण्याच्या कामगिरीवर आय एन एस सुमित्रा लगेच तैनात झाले. अल नईमी ला देखील समुद्री चाच्यांनी वेढले होते आणि त्यातील (क्रू) कर्मचाऱ्यांना (19 पाकिस्तानी नागरिक) ओलीस ठेवले होते. या जहाजावर घडणाऱ्या घडामोडींचा अंदाज घेत आणि अतिशय शीघ्र कृती करत आय एन सुमित्राने 29 जानेवारी 2024 रोजी जहाजाला रोखून धरले आणि आणि आपल्या बळाचा वापर करत हेलिकॉप्टर आणि बोटींच्या साहाय्याने यशस्वी कारवाई करून 11 समुद्री चाच्यांना मासेमारी जहाज अल नईमी आणि त्यातील कर्मचाऱ्यांची सुरक्षित सुटका करायला भाग पाडले. याशिवाय जहाजाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी आणि सोमाली समुद्री चाच्यांनी बंदिवान केलेल्या क्रू सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी आय एन एस सुमित्राने थांबा घेतला होता.
आय एन एस सुमित्राने, कोचीच्या पश्चिमेला अंदाजे 850 नॉटिकल मैल दक्षिण अरबी समुद्रात, 36 तासांपेक्षाही कमी कालावधीत, शीघ्रता, चिकाटी आणि अथक प्रयत्नांद्वारे 36 क्रू (17 इराणी आणि 19 पाकिस्तानी) सदस्य आणि दोन अपहृत मासेमारी जहाजांची सुटका केली आणि भविष्यात व्यापारी जहाजांवरील चाचेगिरीसाठी होणाऱ्या या मासेमारी जहाजांच्या गैरवापराला देखील प्रतिबंध केला.
भारतीय नौदलाने या प्रदेशात सर्व संभाव्य सागरी धोक्यांचा सामना करण्यासाठीची आपली वचनबद्धता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे, ज्यामुळे समुद्रातील सर्व खलाशी आणि जहाजांची सुरक्षा सुनिश्चित होईल.
***
Jaydevi PS/Bhakti /CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2000535)
Visitor Counter : 211