पंतप्रधान कार्यालय
नवी दिल्लीतील करिअप्पा संचलन मैदान येथे एनसीसी छात्रसैनिकांच्या रॅलीला पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन
Posted On:
27 JAN 2024 7:01PM by PIB Mumbai
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राजनाथ सिंह जी, अजय भट्ट जी, तिन्ही दलांचे प्रमुख, सीडीएस जनरल अनिल चौहान जी, संरक्षण सचिव, एनसीसीचे महासंचालक , सर्व अतिथी आणि एनसीसीचे माझे तरुण मित्रांनो...
माजी एनसीसी छात्रसैनिक या नात्याने जेव्हाही मी तुमच्यामध्ये येतो तेव्हा अनेक जुन्या आठवणी ताज्या होणे खूप साहजिक आहे. एनसीसी छात्रसैनिकांमध्ये आल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम एक भारत - श्रेष्ठ भारताचे दर्शन घडते. देशाच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही लोक इथे आला आहात.आणि मला आनंद आहे की एनसीसी रॅलीची व्याप्ती देखील वर्षानुवर्षे सातत्याने वाढत आहे. आणि यावेळी येथे आणखी एक नवी सुरुवात झाली आहे. आज येथे, देशभरातील ज्या गावांना सरकार व्हायब्रन्ट गावे म्हणून विकसित करत आहे त्या सीमावर्ती गावांचे 400 हून अधिक सरपंच आपल्यामध्ये उपस्थित आहेत.याशिवाय बचत गटांच्या प्रतिनिधी म्हणून देशभरातून 100 हून अधिक भगिनी उपस्थित आहेत. मी तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करतो.
मित्रांनो,
एनसीसीची ही रॅली एक जग, एक कुटुंब, एक भविष्य या भावनेला सतत बळ देत आहे. 2014 मध्ये या रॅलीमध्ये 10 देशांतील छात्रसैनिक सहभागी झाले होते. आज 24 मित्र देशांचे छात्रसैनिक येथे उपस्थित आहेत. मी तुम्हा सर्वांचे आणि विशेषतः परदेशातील सर्व तरुण छात्रसैनिकांचे अभिनंदन करतो.
माझ्या युवा मित्रांनो,
यंदा देश 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. हा ऐतिहासिक टप्पा देशाच्या स्त्री शक्तीला समर्पित करण्यात आला आहे. आपण काल कर्तव्यपथावर देखील पाहिले की, यावेळी हा कार्यक्रम स्त्री शक्तीला समर्पित करण्यात आला.भारताच्या कन्या किती उत्तम कार्य करत आहेत हे आपण जगाला दाखवून दिले. भारताच्या कन्या प्रत्येक क्षेत्रात कशाप्रकारे नवे आयाम निर्माण करत आहेत हे आपण जगाला दाखवून दिले.प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने महिलांची तुकडी सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ होती. तुम्ही सर्वांनी दिमाखदार कामगिरी केली. आज अनेक छात्रसैनिकांना येथे पुरस्कारही मिळाले आहेत.कन्याकुमारी ते दिल्ली आणि गुवाहाटी ते दिल्ली असा सायकल प्रवास... झाशी ते दिल्ली पर्यंत , नारीशक्ती वंदन दौड .. 6 दिवस 470 किलोमीटर धावणे, म्हणजेच दररोज 80 किलोमीटर धावणे... हे सोपे नाही.या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या सर्व छात्रसैनिकांचे मी अभिनंदन करतो. सायकल्र स्वारांचे दोन गट आहेत, एक बडोदा आणि एक काशी. मी पहिल्यांदा बडोद्यातून खासदार झालो आणि आता काशीतूनही खासदार झालो.
माझ्या तरुण मित्रांनो,
कधीकाळी मुलींचा सहभाग केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांपुरता मर्यादित असायचा. आज भारताच्या मुली जल, जमीन, आकाश आणि अवकाशात आपले कर्तृत्व कशाप्रकारे गाजवत आहेत हे जग पाहत आहे.कर्तव्यपथावर काल त्याची झलक सगळ्यांनी पाहिली. जगाने काल जे काही पाहिले ते काही अचानक घडले नाही. गेल्या 10 वर्षांच्या निरंतर प्रयत्नांचे हे फलित आहे.
भारतीय परंपरेत स्त्रीकडे नेहमीच एक शक्ती म्हणून पाहिले जाते. भारतीय भूमीवर राणी लक्ष्मीबाई, राणी चेन्नम्मा, वेलू नचियार यांसारख्या वीरांगना होऊन गेल्या आहेत. स्वातंत्र्याच्या लढ्यात अनेक महिला क्रांतिकारकांनी इंग्रजांना सळो की पळो केले होते. . गेल्या 10 वर्षात आमच्या सरकारने स्त्री शक्तीच्या या उर्जेला सातत्याने बळ दिले आहे. ज्या क्षेत्रांमध्ये मुलींसाठी प्रवेश बंद किंवा मर्यादित होता, त्या सर्व क्षेत्रात आम्ही सर्व निर्बंध हटवले आहेत. सीमेवर लढण्यासाठी आम्ही तिन्ही सैन्याची दारे मुलींसाठी खुली केली आहेत . आज महिला अधिकाऱ्यांना लष्करात स्थायी कमिशन दिले जात आहे. मुलींना तिन्ही सैन्यात कमांड रोल्स आणि लढाऊ ठिकाणी ठेवून त्यांच्यासाठी मार्ग मोकळे करण्यात आले आहेत. आज अग्निवीरपासून लढाऊ वैमानिकांपर्यंत मुलींचा सहभाग खूप वाढताना दिसत आहे. यापूर्वी सैनिक शाळांमध्येही मुलींना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. आता मुली देशभरातील अनेक सैनिकी शाळांमध्ये शिकत आहेत. केंद्रीय सुरक्षा दलात महिला कर्मचाऱ्यांची संख्या 10 वर्षात दुपटीने वाढली आहे.राज्य पोलीस दलात अधिकाधिक महिलांचा समावेश करण्यासाठी राज्यांनाही प्रोत्साहन दिले जात आहे.
आणि मित्रांनो,
मुली अशा व्यवसायात गेल्यावर समाजाच्या मानसिकतेवरही परिणाम होतो. यामुळे महिलांविरोधातील गुन्हे कमी होण्यास मदत होते.
तरुण मित्रांनो,
समाजातील इतर क्षेत्रातही मुलींचा सहभाग सातत्याने वाढत आहे. बँकिंग असो, विमा असो किंवा प्रत्येक गावात सेवा वितरण असो, आपल्या मुली मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी आहेत. आज स्टार्टअप असो की बचतगट, प्रत्येक क्षेत्रात मुली आपला ठसा उमटवत आहेत.
तरुण मित्रांनो,
जेव्हा देश मुला-मुलींच्या प्रतिभेला समान संधी देतो तेव्हा त्याचा प्रतिभा पूल खूप मोठा होतो. विकसित भारत घडवण्यासाठी हीच सर्वात मोठी ताकद आहे.आज संपूर्ण जगाची ताकद भारताच्या या प्रतिभा पूलवर आहे. आज संपूर्ण जग भारताकडे विश्व मित्र म्हणून पाहत आहे. भारताच्या पारपत्राची ताकद झपाट्याने वाढत आहे.तुमच्यासारख्या तरुण मित्रांना याचा सर्वाधिक फायदा होत आहे आणि तुमच्या करिअरला फायदा होत आहे. जगातील अनेक देश आज भारतातील तरुणांच्या प्रतिभेकडे संधी म्हणून पाहत आहेत.
तरुण मित्रांनो,
मी अनेकदा एक गोष्ट सांगतो.हा जो अमृतकाळ म्हणजेच आगामी 25 वर्षे आहेत, यामध्ये आपण जो विकसित भारत घडवणार आहोत त्याचे लाभार्थी मोदी नाहीत.त्याचे सर्वात मोठे लाभार्थी माझ्या देशातील तुमच्यासारखे तरुण आहेत.त्याचे लाभार्थी हे विद्यार्थी आहेत जे सध्या शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठात शिकत आहेत. विकसित भारत आणि भारतातील तरुणांची करिअरची वाटचाल एकत्रितपणे वरच्या दिशेने जाईल.
म्हणूनच आपण सर्वानी मेहनत करताना एक क्षणही वाया घालवता कामा नये.गेल्या 10 वर्षात कौशल्य असो,रोजगार असो,स्वयंरोजगार असो यासाठी प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम केले आहे. युवकांची प्रतिभा आणि युवकांचे कौशल्य अधिकाधिक उपयोगात कसे आणता येईल यावर भर देण्यात येत आहे.नवा शतकाची नवी आव्हाने पेलण्यासाठी आपल्याला सज्ज करण्याकरिता नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले आहे. आज पीएम श्री स्कूल अभियाना अंतर्गत देशभरातल्या हजारो शाळा स्मार्ट करण्यात येत आहेत.गेल्या दशकात महाविद्यालये असोत,विद्यापीठ असोत,व्यावसायिक शिक्षणाशी संबंधित संस्था असोत यामध्ये अभूतपूर्व वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 वर्षात भारताच्या विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीत मोठी सुधारणा झाली आहे. भारतात वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे,वैद्यकीय जागांमध्येही मोठी वाढ झाली आहे. अनेक राज्यांमध्ये नव्या आयआयटी आणि नवी एम्स उभारण्यात आली आहेत. सरकारने संरक्षण,अंतराळ, मॅपिंग सारखी क्षेत्रे युवा प्रतिभेसाठी खुली केली आहेत.संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी नवा कायदाही तयार करण्यात आला आहे. हे सर्व, माझ्या युवा मित्रांनो, आपणासाठीच आहे, भारताच्या युवकांसाठीच होत आहे.
मित्रांनो,
आपण नेहमी पाहतच असाल की मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत याबाबत मी नेहमीच बोलत असतो.ही दोन्ही अभियाने आपणासारख्या युवकांसाठीच आहेत. ही दोन्ही अभियाने भारताच्या युवकांना रोजगाराच्या नव्या संधी देत आहे. सरकारच्या प्रयत्नातून गेल्या 10 वर्षात भारताची डिजिटल अर्थव्यवस्था,आपल्या युवा शक्तीचे नवे सामर्थ्य ठरेल,आपल्या युवा शक्तीची नवी ओळख ठरेल.भारतही डिजिटल अर्थव्यवस्थेत अग्रगण्य ठरू शकतो याचा विचारही गेल्या दशकभरापुर्वी अशक्य होता. दैनंदिन संवादामध्ये स्टार्ट अप्सचे नावही नव्हते.आज भारत जगातली तिसरी मोठी स्टार्ट अप परिसंस्था आहे. आज लहान-लहान मुलेही स्टार्ट अपबाबत बोलतात, युनिकॉर्नबाबत बोलतात.आज भारतात सव्वा लाखाहून जास्त नोंदणीकृत स्टार्ट अप्स आहेत आणि 100 हून अधिक युनिकॉर्न आहेत.यामध्ये लाखो युवक ‘क्वालिटी जॉब्स’ करत आहेत. या स्टार्ट अप्स मधेही बहुतांश जणांना डिजिटल इंडियाचा थेट लाभ मिळत आहे. दशकभरापूर्वी आपण 2 जी -3 जी साठी संघर्ष करत होतो आज गावागावात 5 जी पोहोचत आहे. गावोगावी ऑप्टीकल फायबर पोहोचू लागले आहे.
मित्रांनो,
आपण जेव्हा बहुतांश मोबाईल फोन परदेशातून आयात करत होतो तेव्हा ते इतके महाग असत की अनेक युवांना ते परवडत नसत.आज भारत जगातला दुसरा सर्वात मोठा मोबाईल फोन निर्माता आणि दुसरा मोठा निर्यातदारही आहे. यामुळे मोबाईल फोन स्वस्त झाले आहेत.मात्र डेटा शिवाय फोनला काही महत्व नाही हे आपण जाणताच.आम्ही अशी धोरणे आखली की आज भारत जगातला सर्वात स्वस्त डेटा उपलब्ध करून देणाऱ्या देशांपैकी एक आहे.
मित्रांनो,
आज देशात ई - वाणिज्य, ई –शॉपिंग,घरपोच सामान,ऑनलाईन शिक्षण,रिमोट हेल्थकेअर यांची वाढणारी व्याप्ती याचाच परिपाक आहे. भारतात गेल्या दहा वर्षात झालेल्या या डिजिटल क्रांतीचा सर्वात जास्त लाभ युवा सृजनशीलतेला झाला आहे. आज भारतात डिजिटल आशय निर्मितीचा केव्हढा विस्तार झाला आहे हे आपण पहातच आहात.ही एक मोठी अर्थव्यवस्थाच झाली आहे. गेल्या 10 वर्षात गावोगावी 5 लाखाहून जास्त सामायिक सेवा केंद्र उभारण्यात आली आहेत.यामध्ये लाखो युवक काम करत आहेत. डिजिटल इंडिया सुविधा आणि रोजगार या दोन्हींना कसे बळ देत आहे हे दर्शवणारी अशी कितीतरी उदाहरणे आहेत.
माझ्या युवा मित्रांनो,
भविष्यातल्या शक्यता लक्षात घेऊन सद्य काळात धोरणे आखून निर्णय घेते ते सरकार असते. आपले प्राधान्यक्रम स्पष्ट ठेवते ते सरकार असते.एक काळ होता जेव्हा आपल्या देशात सीमावर्ती भागातल्या सुधारणांकडे सर्वाधिक दुर्लक्ष केले जात असे. सीमेजवळच्या भागात रस्ते तयार केले की शत्रूला त्याचा फायदा मिळेल असे पूर्वीचे सरकार म्हणत असे. सीमेवरच्या गावांना तेव्हा अखेरचे गाव म्हटले जात असे. आमच्या सरकारने या मानसिकतेत बदल केला.पूर्वीच्या सरकारनुसार जे शेवटचे गाव म्हणून गणले जात असे त्याला आमच्या सरकारने पहिले गाव मानले. आज या गावांच्या विकासासाठी व्हायब्रंट व्हिलेज योजना अमलात आणली जात आहे. या गावांमधले अनेक सरपंच आज या कार्यक्रमात उपस्थित आहेत. आज ते आपणा सर्वाना पहात आहेत, आपली उर्जा पाहून खुश होत आहेत.सीमेलगतची ही गावे पर्यटनाची मोठी केंद्रे बनू लागली आहेत. व्हायब्रंट व्हिलेज विषयी आपणही जास्तीत जास्त जाणून घ्यावे अशी माझी इच्छा आहे.
माझ्या युवा मित्रांनो,
विकसित भारत आपल्या स्वप्नांची पूर्तता करणारा असेल. म्हणूच आज विकसित भारत उभारणीसाठी पथदर्शी आराखडा आखण्यात येत आहे, त्यामध्ये आपली मोठी भागीदारी आहे. आपणासारख्या युवकांसाठीच तर सरकारने मेरा युवा भारत मंच म्हणजेच MYBAHARAT मंच निर्माण केला आहे.21 व्या शतकातल्या भारताच्या युवकांसाठीचा हा सर्वात विशाल मंच ठरला आहे.केवळ तीन महिन्यातच एक कोटीहून अधिक युवकांनी इथे नोंदणी केली आहे. मेरा युवा भारत मंचावर जरूर नोंदणी करण्याचे आवाहन मी आपणासारख्या सर्व युवकांना करत आहे. MY GOV इथे जाऊन विकसित भारत साठी आपण आपल्या सूचना देऊ शकतो.आपणा सर्वांच्या भागीदारीनेच आपल्या स्वप्नांची पूर्तता होईल.आपणच विकसित भारताचे शिल्पकार आहात.आपणा सर्वावर माझा पूर्ण भरवसा आहे, देशाच्या युवा पिढीवर पूर्ण विश्वास आहे.या शानदार आयोजनाबद्दल आपणा सर्वांचे पुन्हा एकदा खूप-खूप अभिनंदन.भविष्यासाठी आपणा सर्वाना माझ्या खूप-खूप शुभेच्छा ! माझ्या समवेत म्हणा-
भारत माता की जय
भारत माता की जय
भारत माता की जय
खूप-खूप धन्यवाद.
*********
NM/Sonal C/ Nilima C/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2000170)
Visitor Counter : 122
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam