अंतराळ विभाग
प्रजासत्ताक दिनानिमित्त इस्रोच्या महिला शास्त्रज्ञांच्या सन्मानार्थ आयोजित स्वागत समारंभाचे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी त्यांच्या निवासस्थानी भुषवले यजमानपद
महिलांनी वैज्ञानिक जगात आणि विशेषतः अंतराळ विभागात (DoS)नेतृत्वाची भूमिका स्वीकारली आहे, डॉ जितेंद्र सिंह यांचे गौरवोद्गार
अंतराळ विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO)भारतीय महिलांसाठी इतर क्षेत्रातही उत्कृष्ट आणि प्रमुख भूमिका स्वीकारण्याचे द्वार उघडले आहे - डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
27 JAN 2024 1:15PM by PIB Mumbai
विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार); पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अवकाश विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील (ISRO) महिला वैज्ञानिकांसाठी स्वागत समारंभ आयोजित केला होता.
यावेळी प्रख्यात महिला वैज्ञानिकांचा चमू उपस्थित होता. या महिला वैज्ञानिकांचा चमूने प्रजासत्ताक दिन संचलनात, इस्रोच्या चांद्रयान, आदित्य L1 यांच्यासह संस्थेच्या इतर अलीकडील उपलब्धी, ज्या जागतिक स्तरावर प्रशंसेस पात्र ठरल्या आणि ज्यामुळे 140 कोटी भारतीयांपैकी प्रत्येकजण इस्रोबरोबर जोडला गेला, त्यांचे दर्शन घडवणाऱ्या चित्ररथाचे नेतृत्व केले होते.
इस्रोच्या चिक्त्ररथाचे नेतृत्व संपूर्णपणे आठ महिला शास्त्रज्ञांनी केले, तर 220 निमंत्रित महिला शास्त्रज्ञांनी आपल्या पतीसह उपस्थिती नोंदवून या चमूचा उत्साह वाढवला. या चमूत सहभागी महिला शास्त्रज्ञांची निवड बेंगळुरू, अहमदाबाद, तिरुअनंतपुरम आणि श्रीहरिकोटा येथील विविध इस्रो केंद्रांमधून करण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन अंतराळ सुधारणा लागू केल्या तसेच अवकाश क्षेत्राला भूतकाळातील बंधनातून मुक्त केल्यामुळे हा गौरवाचा दिवस उजाडणे शक्य झाले, असे उद्गार डॉ. जितेंद्र सिंह यांनी काढले.
इस्रोचा चित्ररथ कर्तव्यपथावरुन संचलन करत असताना प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून जो प्रतिसाद दिला तो क्षण गौरवान्वीत आणि सन्मान करणारा होता, अशी प्रतिक्रिया महिला शास्त्रज्ञांनी नोंदवली.
देशासमोर आपले कर्तृत्व दाखविण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रति या महिला शास्त्रज्ञांनी कृतज्ञता व्यक्त केली. राष्ट्रीय राजधानीत मिळालेल्या उबदार आदरातिथ्याने आपण भारावून गेलो असून या प्रेमळ उबेमुळे आपल्याला दिल्लीतील थंडीचा विसर पडला, असे त्या म्हणाल्या.
जसजसे इस्रोचा चित्ररथ राष्ट्रपतींच्या आसनाजवळ येऊ लागला तसतसे सर्वजण इस्रोचा चित्ररथ म्हणजे "विकसित भारताची खरी ओळख" असे म्हणत असल्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
गेल्या वर्षी 23 ऑगस्ट रोजी चंद्रयान -3 घेऊन जाणारे अंतराळयान यशस्वीरित्या चंद्रावर उतरले त्या ऐतिहासिक क्षणाचे चित्रण अंतराळ संस्थेने चित्ररथावर केले होते. या अभूतपूर्व यशामुळे भारत हा जगातील असा पहिला आणि एकमेव देश बनला आहे ज्याने आजवर कोणीही पोहोचले नाही अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ आपले यान पोहचवले आहे, असेही डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.
इस्रो हे भारताच्या नारीशक्तीचे प्रतीक आहे - ज्यामध्ये महिला वैज्ञानिक केवळ सहभागी होत नाहीत तर अंतराळ संशोधन कार्यक्रमातील विविध उपक्रमांचे नेतृत्व देखील करतात, असेही डॉ जितेंद्र सिंग म्हणाले. निगार शाजी या आदित्य एल1 मिशनच्या प्रकल्प संचालक आहेत तर कल्पना कलहस्ती या चांद्रयान-3 च्या सहयोगी प्रकल्प संचालक आहेत, यांचा उल्लेख डॉ. सिंह यांनी केला.
इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी या स्वागत समारंभात इस्रोच्या 'सनी लेडी’ निगार शाजी, एडीआरआयएलच्या डॉ. राधा देवी यांच्यासह कल्पना कलहस्ती, रीमा घोष, रितू करिधल आणि निधी पोरवाल यांसारख्या इतिहास घडवणाऱ्या आघाडीच्या शास्त्रज्ञांचा मंत्र्यांशी परिचय करून दिला.
स्वातंत्र्याच्या अमृत काळात, विकसित भारत @2047 च्या दिशेने कूच करत असताना, आपल्या देशाच्या प्रवासात महिला समान भागीदार असतील आणि इस्रोतील महिला शास्त्रज्ञ बिनीच्या शिलेदार असतील, असेही डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.
***
M.Iyengar/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2000018)
Visitor Counter : 107