राष्ट्रपती कार्यालय

14व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित समारंभाला राष्ट्रपतींची उपस्थिती

Posted On: 25 JAN 2024 3:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 जानेवारी 2024

 

नवी दिल्लीत 14 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित समारंभाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  आज (25 जानेवारी, 2024) उपस्थित राहिल्या आणि त्यांनी संबोधित देखील केले. याप्रसंगी, राष्ट्रपतींनी वर्ष 2023 मधील निवडणुकांच्या आयोजनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्य आणि जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना वर्ष 2023 साठीचे सर्वोत्कृष्ट निवडणूक पद्धती पुरस्कार प्रदान केले. मतदारांमध्ये जागृतीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या सरकारी विभाग आणि माध्यम संस्थांसह महत्वपूर्ण हितधारकांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले.

उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या  की, आपल्या लोकशाहीची विशालता आणि विविधता ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या लोकशाहीच्या गौरवशाली प्रवासात निवडणूक आयोगाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे असे त्यांनी नमूद केले . निवडणूक आयोगाने आतापर्यंत 17 सार्वत्रिक निवडणुका आणि 400 हून अधिक विधानसभा निवडणुका पार पाडल्या आहेत. निष्पक्ष आणि सर्वसमावेशक निवडणूक प्रक्रिया पार पाडल्याबद्दल त्यांनी निवडणूक आयोगाच्या विद्यमान तसेच यापूर्वीच्या  चमूची प्रशंसा केली.

राष्ट्रपती म्हणाल्या की, आपल्या देशाच्या निवडणूक प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर यशस्वी वापर हे जगातील सर्व लोकशाही देशांसाठी एक उदाहरण आहे. निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व कामांमध्ये शक्य तितक्या प्रमाणात वाढवला  जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशाच्या सर्व भागात राहणाऱ्या मतदारांसाठी व्यवस्था करणे सोपे नाही. सर्व प्रकारची आव्हाने असतानाही निवडणूक आयोगाची टीम हे कठीण  काम पार पाडते असे राष्ट्रपती म्हणाल्या. हे आपल्या लोकशाहीचे मोठे यश आहे. जे मतदान केंद्रावर जाऊ शकत नाहीत त्यांना घरीच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी निवडणूक आयोगाचे कौतुक केले. या प्रयत्नांमुळे आपल्या देशाची निवडणूक प्रक्रिया अधिक समावेशक बनली आहे असे त्या म्हणाल्या.

आपले युवक हे आपल्या लोकशाहीचे भावी नेते आहेत. मतदार छायाचित्र ओळखपत्र मिळालेल्या युवा मतदारांचे त्यांनी  अभिनंदन केले. हा अधिकार मिळाल्यानंतर त्यांची जबाबदारी देखील  वाढली आहे असे त्या म्हणाल्या. उपस्थित युवा मतदार हे देशातील कोट्यवधी युवकांचे प्रतिनिधी आहेत जे 2047 च्या स्वर्णिम भारताच्या निर्मितीमध्ये निर्णायक भूमिका बजावतील.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी राष्ट्रपतींना ‘सार्वत्रिक निवडणुका 2024 साठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे उपक्रम ’ याची  पहिली प्रत सुपूर्द केली.

2011 पासून, भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करणे आणि त्यांना मतदान  प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. ‘मतदानासारखे काही नाही, मी नक्कीच मतदान करणार ’ ही राष्ट्रीय मतदार दिन 2024 ची संकल्पना  आहे.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया इथे क्लिक करा

 

* * *

R.Aghor/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1999567) Visitor Counter : 95