माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याशी संबंधित पडताळणी न केलेले, प्रक्षोभक आणि खोटे संदेश पाठवण्यावर आळा घालण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केली मार्गदर्शक तत्वे

Posted On: 20 JAN 2024 3:26PM by PIB Mumbai

 

येत्या 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी देशभरात सुरू असतानाच, समाज माध्यमांमध्ये काही पडताळणी न केलेले, प्रक्षोभक आणि असत्य संदेशही पसरवले जात आहेत, ज्यामुळे देशातील धार्मिक सौहार्द आणि सुव्यवस्था बिघडू शकते, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या लक्षात आले आहे.

हे लक्षात घेऊन मंत्रालयाने, आज म्हणजेच 20 जानेवारी 2024 रोजी वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या, डिजिटल वृत्तपत्रे आणि समाज माध्यमे यांच्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी केली असून, त्यांना, अशा प्रकाराचा कुठलाही असत्य किंवा बनावट, तसेच ज्यामुळे सामाजिक, धार्मिक सलोखा बिघडू शकेल, असा कुठलाही मजकूर प्रकाशित करणे टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याशिवाय, समाज माध्यमांवर असलेली जबाबदारी लक्षात घेऊन, त्यांनाही, अशा प्रकारचा कुठलाही मजकूर तयार करणे, प्रकाशित किंवा सामायिक करणे टाळण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियमन कायदा, 1995 अंतर्गत कार्यक्रम संहितेच्या खालील तरतुदींकडे आणि प्रेस कौन्सिल कायदा, 1978 अंतर्गत भारतीय प्रेस कौन्सिलने निर्धारित केलेल्या पत्रकारितेच्या आचारसंहितेविषयक तरतुदींकडे, या मार्गदर्शक तत्त्वामधून लक्ष वेधण्यात आले आहे. तसेच, माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचार संहिता) नियम, 2021, याचा संदर्भ देखील देण्यात आला आहे.

पत्रकारीतेतील आचारसंहिता:

अचूकता आणि निष्पक्षताः 1) प्रसारमाध्यमांनी चुकीचा, निराधार, अशोभनीय, दिशाभूल करणारा किंवा विकृत विचारांचा मजकूर प्रकाशित करणे टाळावे.

जाती, धर्म किंवा समुदायाचे संदर्भ : वृत्तपत्रात प्रकाशित होत असलेल्या लेखाची भाषा, सूर किंवा भावना आक्षेपार्ह, चिथावणी देणारी, देशाची एकता आणि अखंडतेविरुद्ध, राज्यघटनेच्या भावनेविरुद्ध, देशद्रोही आणि प्रक्षोभक स्वरूपाची किंवा जातीय वैमनस्य वाढविण्यासाठी तयार केलेली नसेल, याची खातरजमा संबंधित वृत्तपत्राने करावी.

राष्ट्रहित सर्वोपरी : i) वृत्तपत्रांनी, स्वयंनियमनाचा भाग म्हणून, भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 च्या कलम (2) अंतर्गत भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर कायद्याद्वारे वाजवी निर्बंध लादले जाऊ शकतील अशी, राज्य आणि समाजाचे सर्वोच्च हितसंबंध किंवा व्यक्तींच्या अधिकारांवर गदा आणणारी किंवा हानी पोहोचवणारी कोणतीही बातमी, टिप्पणी किंवा माहिती प्रसिद्ध करताना, योग्य संयम आणि बाळगणे आवश्यक आहे.

कार्यक्रम संहिता

नियम 6 (1) नुसार, केबल सेवेद्वारे असा कोणताही कार्यक्रम प्रसारित केला जाऊ नये, ज्यात :-

(c) ज्यात, धर्म किंवा समुदायांवर हल्ले किंवा धार्मिक गटांचा अवमान करणारी दृश्ये किंवा शब्द आहेत, अथवा, असे कार्यक्रम जे सांप्रदायिक वृत्तीला प्रोत्साहन देतात;

(d) ज्यात काहीही अश्लील, बदनामीकारक, खोडसाळ, असत्य अथवा सूचक आरोप आणि अर्धसत्य असे काहीही असेल;

(e) असे कार्यक्रम, जे हिंसेला प्रोत्साहन देणारे, प्रक्षोभक आणि कायदा सुव्यवस्था भडकवणारे किंवा देशविरोधी भावना भडकवणारे असतील;”

प्रसारमाध्यमांना लागू असलेले नियम आणि नियमनांचे पालन करण्यासाठी, विशेषतः सामाजिक सुव्यवस्था, प्रकाशित/प्रसारित होत असलेल्या माहितीची तथ्यात्मक अचूकता राखण्यासाठी आणि भारतातील विविध धार्मिक समुदायांमध्ये जातीय सलोखा राखण्यासाठी मंत्रालयाने, वेळोवेळी दूरचित्रवाणी, मुद्रित आणि समाज माध्यम मंचासह डिजिटल माध्यमांसाठी सूचना जारी केल्या आहेत.

ह्या मार्गदर्शक सूचना इथे बघता येतील.

***

M.Pange/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1998138) Visitor Counter : 214