माहिती आणि प्रसारण मंत्रालय
अयोध्येचा कायापालट : शहराचा अध्यात्मिक प्रवास आधुनिक संपर्क सुविधेसह झेप घेत आहे
Posted On:
19 JAN 2024 4:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 19 जानेवारी 2024
अयोध्येच्या हृदयस्थानी, जिथे इतिहास अखंडपणे अध्यात्मात गुंफला जात आहे तिथे एक चिरस्मरणीय परिवर्तन घडत आहे. हे परिवर्तन राम मंदिराच्या पवित्र भूमीच्या परिसराबाहेरील क्षेत्राला देखील व्यापणारे आहे. प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर आकार घेत असताना, भारत सरकारने आपल्या दूरदर्शी वाटचालीत अयोध्येच्या संपर्क सुविधेत व्यापक फेरबदल करून या प्राचीन शहराला सुलभतेच्या नवीन युगामध्ये पोहचवले आहे.
पंतप्रधानांनी अयोध्येत नवीन अमृत भारत आणि वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले
या उत्क्रांतीच्या अग्रभागी उभे आहे, अयोध्येचे पुनर्विकसित आणि नुकतेच उद्घाटन झालेले रेल्वे स्थानक, ज्याचे आता अयोध्या धाम रेल्वे स्थानक असे नामकरण करण्यात आले आहे. 240 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित केलेले हे रेल्वे स्थानक सरकारच्या संपर्क सुविधा आधुनिक करण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. या तीन मजली स्थानकामध्ये उद्वाहक, सरकते जिने, फूड प्लाझा आणि पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने असून हे स्थानक आधुनिक सोयी आणि अध्यात्माचे सुयोग्य मिश्रण आहे. उत्कृष्ट कार्यक्षमतेच्या पलीकडे जाऊन या स्थानकात सामान कक्ष, माता बालक कक्ष आणि प्रतिक्षालय यांसारख्या सुविधांच्या सर्वसमावेशकतेला प्राधान्य दिले आहे. स्थानकावरील या सुविधा सर्वांसाठी खुल्या असून ही इमारत 'आय जी बी सी द्वारे प्रमाणित हरित स्थानक इमारत’ असल्याचे अभिमानाने सांगण्यात येत आहे. पंतप्रधानांनी आयोध्येत जेव्हा स्वतः उपस्थित राहून देशातील सुपरफास्ट पॅसेंजर ट्रेन्सची एक नवीन श्रेणी असलेल्या अमृत भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ केला आणि तिला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले तेव्हा या परिवर्तनाचे महत्त्व अधोरेखित झाले होते. याशिवाय, कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी अयोध्या-आनंद विहार टर्मिनल वंदे भारत एक्सप्रेसचेही उद्घाटन केले.
डिसेंबर 2023 मध्ये महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानंतर अयोध्येचा कायापालट रेल्वे सेवेच्या पलीकडे विस्तारला गेला. 1450 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित केलेला विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात 6500 चौ.मी.चे अत्याधुनिक टर्मिनल तयार झाले असून दरवर्षी 10 लाख प्रवाशांना सेवा पुरवण्याची या टर्मिनलची क्षमता आहे. हे टर्मिनल, अयोध्येत साकार होत असलेल्या श्री राम मंदिराला प्रतिबिंबित करते. टर्मिनलचा दर्शनी भाग मंदिरापासून -प्रेरित वास्तुकला दर्शवतो, तर त्याच्या आतील भागात शहराचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित करणारी स्थानिक कला आणि भित्तीचित्रे दिसतात. विमानतळाच्या दुस-या टप्प्यात, दरवर्षी 60 लाख प्रवाशांना सेवा पुरवण्याचे, पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल अशा सुधारित संपर्क सुविधा आणि व्यावसायिक क्रियांना चालना देण्याचे तसेच प्रदेशात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.
पंतप्रधानांनी अयोध्येतील महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले
अयोध्येचा कायापालट केवळ वाहतुकीच्या पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून अयोध्येच्या सर्वांगीण विकासापर्यंत विस्तारलेला आहे. पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या अयोध्या भेटीमध्ये चार नव्याने पुनर्विकसित, रुंदीकरण आणि सुशोभित केलेल्या रस्त्यांचे उद्घाटन करण्यात आले - रामपथ, भक्तिपथ, धरमपथ आणि श्री रामजन्मभूमी पथ. या रस्त्यांमुळे यात्रेकरू तसेच पर्यटकांची प्रवास सुलभता वाढणार आहे.
अयोध्येतील पायाभूत सुविधांचा पुनर्विकास आणि पर्यटन क्षेत्रातील गुंतवणूक शहराच्या परिवर्तनासाठीचा सर्वांगीण दृष्टीकोन दर्शवते. संपर्क सुविधा सुधारून, अभ्यागतांच्या सोयी वाढवून आणि सांस्कृतिक वारसा जतन करून, अयोध्या तीर्थक्षेत्र, पर्यटन आणि आर्थिक समृद्धीचे एक भरभराटीला येणारे केंद्र बनण्यास सज्ज आहे.
संदर्भ:
S.Kakade/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1997783)
Visitor Counter : 119