पंतप्रधान कार्यालय
नवी मुंबईत विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
12 JAN 2024 8:27PM by PIB Mumbai
मुंबई आणि मुंबई उपनगरातून मोठ्या संख्येने उपस्थित सर्वांना माझा नमस्कार!
आजचा दिवस, मुंबई आणि महाराष्ट्रासोबतच विकसित भारताच्या संकल्पासाठी अतिशय मोठा, अतिशय ऐतिहासिक आहे. आज विकासाचा हा उत्सव भले ही मुंबईत होत असेल, पण त्यावर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. आज जगातील सर्वात मोठ्या सागरी सेतूंपैकी एक, हा विशाल अटल सेतू देशाला मिळाला आहे. हा आपल्या त्या संकल्पाचा दाखला आहे की भारताच्या विकासाकरिता आपण सागराला देखील धडक मारू शकतो, लाटांना कापू शकतो. आजचा हा कार्यक्रम संकल्पाने सिद्धीचा देखील दाखला आहे.
24 डिसेंबर, 2016 चा दिवस मी विसरू शकत नाही ज्यावेळी मी मुंबई ट्रांस हार्बर लिंक-अटल सेतूच्या पायाभरणीसाठी येथे आलो होतो. त्यावेळी मी छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करत सांगितले होते की ‘लिहून ठेवा, देश बदलेल देखील आणि देशाची प्रगती देखील होईल’. ज्या व्यवस्थेत वर्षानुवर्षे कामे लटकवून ठेवण्याची सवय जडली होती, त्यामुळे देशवासियांना कोणत्याही अपेक्षा उरल्या नव्हत्या. लोकांना वाटू लागले होते की त्यांच्या हयातीत मोठे प्रकल्प पूर्ण होणे हे अवघडच आहे आणि म्हणूनच मी सांगितले होते, लिहून ठेवा, देश बदलेल आणि नक्कीच बदलेल. ही तेव्हा मोदींची गॅरंटी होती आणि आज मी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुन्हा नमन करत, मुंब्रा देवीला नमन करत, सिद्विविनायकजींना प्रणाम करत हा अटल सेतू मुंबईकरांना, देशाच्या लोकांना समर्पित करत आहे.
कोरोनाच्या महासंकटानंतरही मुंबई ट्रांस हार्बर लिंकचे काम पूर्ण होणे एक मोठी कामगिरी आहे. आमच्यासाठी शिलान्यास, भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण केवळ एका दिवसाचा फक्त कार्यक्रम नसतो. ना तो मीडियामध्ये येण्यासाठी लोकांना आकर्षित करण्यासाठी असतो. आमच्यासाठी प्रत्येक प्रकल्प, भारताच्या नवनिर्मितीचे माध्यम आहे. ज्या प्रकारे एकेका वीटेने मजबूत इमारत बनते तशाच प्रकारे प्रत्येक प्रकल्पाद्वारे भव्य भारताच्या इमारतीची उभारणी होत आहे.
मित्रहो,
आज या ठिकाणी देशाच्या , मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित 33 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झाले आहे. हे प्रकल्प रस्ते , रेल्वे , मेट्रो , पाणी यासारख्या सुविधांशी संबंधित आहेत. आज मुंबईला व्यापारी विश्वाला बळकट करणाऱ्या आधुनिक 'भारत रत्नम' आणि 'नेस्ट - वन' इमारतीही मिळाल्या आहेत. यापैकी बहुतेक प्रकल्प महाराष्ट्रात पहिल्यांदा डबल इंजिन सरकार स्थापन झाले तेव्हा सुरू करण्यात आले होते . म्हणूनच , महाराष्ट्रातील देवेंद्रजींपासून ते आताच्या एकनाथ शिंदेजींपर्यंत , अजित पवारजींच्या संपूर्ण टीमच्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे .
मी आज महाराष्ट्रातील भगिनींचेही अभिनंदन करत आहे.. इतक्या मोठ्या संख्येने महिलांचे येणे आणि या माता-भगिनींचे आपल्याला आशीर्वाद देणे, यापेक्षा मोठे भाग्य दुसरे कोणते असू शकते. देशातील माता-भगिनी आणि कन्यांच्या सक्षमीकरणासाठी जी गॅरंटी आणि गॅरंटी मोदींनी दिली आहे तिला महाराष्ट्र सरकार देखील पुढे नेत आहे. मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान , नारी शक्तीदूत ऍप्लिकेशन आणि लेक लाडकी योजना हे असेच उत्तम प्रयत्न आहेत . आज या कार्यक्रमात आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आमच्या माता-भगिनी आणि कन्या इतक्या मोठ्या संख्येने येथे आल्या आहेत. विकसित भारताच्या निर्मितीसाठी भारताची नारी शक्ती पुढे येण्याची, नेतृत्व करण्याची तितकीच गरज आहे.
माता-भगिनी आणि कन्यांच्या मार्गात येणाऱा प्रत्येक अडथळा दूर करण्याचा, त्यांचे जीवन सुकर करण्याचा आमच्या सरकारचा सातत्याने प्रयत्न आहे. उज्ज्वला गॅस सिलिंडर असो , आयुष्मान योजनेंतर्गत 5 लाख रुपयांची मोफत उपचारांची सुविधा असो, जनधन बँक खाती, पंतप्रधान आवासची पक्की घरे , महिलांच्या नावे घरांची नोंदणी , गर्भवती महिलांच्या बँक खात्यात 6 हजार रुपये हस्तांतरित करणे , काम करणाऱ्या महिलांना 26 आठवड्यांची भरपगारी रजा , सुकन्या समृद्धी खात्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त व्याज देणे असो, आमच्या सरकारने महिलांच्या प्रत्येक समस्येची काळजी घेतली आहे. डबल इंजिन सरकार, कोणत्याही राज्यात असो, महिला कल्याण, त्याची सर्वात प्रमुख आमची गॅरंटी आहे. आज ज्या योजना सुरू होत आहेत, त्या देखील याच दिशेने एक मोठे पाऊल आहे.
माझ्या कुटुंबातील सदस्यांनो,
गेले काही दिवस देशात मुंबई ट्रांस हार्बर लिंक-अटल सेतूची चर्चा होत आहे. आज जो कोणी अटल सेतू पाहात आहे, जो त्याची छायाचित्रे पाहात आहे, तो अभिमानाने भरून जात आहे. कोणी त्याच्या विशालतेने, समुद्रामधील त्याच्या अढळ छबीमुळे मंत्रमुग्ध आहे, कोणी त्याच्या अभियांत्रिकीमुळे प्रभावित आहे. जसे यामध्ये जितक्या तारांचा वापर झाला आहे त्यांची लांबी पृथ्वीला दोनदा प्रशिक्षणा घातल्याइतकी आहे. या प्रकल्पात जितक्या लोखंडाचा-पोलादाचा वापर झाला आहे, त्याद्वारे 4 हावडा ब्रिज आणि 6 स्टॅच्यू ऑफ लिबर्टींची निर्मिती होऊ शकते. कोणाला या गोष्टीचा आनंद आहे की आता मुंबई आणि रायगडमधील अंतर आता आणखी कमी झाले आहे. ज्या प्रवासाला पूर्वी अनेक तास लागत होते आता तोच प्रवास केवळ काही मिनिटात पूर्ण होईल. यामुळे नवी मुंबईबरोबरच पुणे आणि गोवा देखील मुंबईच्या जवळ येतील. हा पूल बनवण्यासाठी जपान ने जे सहकार्य केले आहे, त्यासाठी मी जपान सरकारचे देखील विशेष आभार मानतो. मी आज माझे प्रिय मित्र स्वर्गवासी शिंजो आबे यांची नक्कीच आठवण करेन. या पुलाची उभारणी लवकरात लवकर करण्याचा संकल्प आम्ही दोघांनी मिळून केला होता.
पण मित्रांनो, अटल सेतूला आपण इतक्या मर्यादित कक्षेत पाहू शकत नाही. अटल सेतू भारताच्या त्या आकांक्षांचा जयघोष आहे, ज्याचे आवाहन 2014 मध्ये संपूर्ण देशाने केले होते. ज्यावेळी माझ्यावर निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली त्यावेळी 2014 च्या निवडणुकीच्या काही दिवस आधी मी रायगड किल्ल्यावर गेलो होतो.छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर बसून मी काही क्षण व्यतित केले होते. त्या संकल्पांना सिद्धीमध्ये बदलण्याची त्यांची इच्छाशक्ती, जनशक्ति ला राष्ट्रशक्ती बनवण्याची त्यांची दूरदृष्टी, हे सर्व काही माझ्या डोळ्यासमोर आणि आशीर्वाद बनून आले होते. या गोष्टीला 10 वर्षे होत आहेत. या 10 वर्षात देशाने आपली स्वप्ने खरी होताना पाहिली आहेत, आपल्या संकल्पांचे सिद्धीमध्ये रुपांतर होताना पाहिले आहे. अटल सेतू याच भावनेचे प्रतिबिंब आहे.
युवा सहकाऱ्यांसाठी, हा नवा विश्वास घेऊन येत आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग अटल सेतूसारख्या आधुनिक पायाभूत सुविधांमधून जातो . अटल सेतू हे विकसित भारताचे चित्र आहे . विकसित भारत कसा होणार आहे याची ही झलक आहे . विकसित भारतात सर्वांसाठी सुविधा असतील , सर्वांची समृद्धी होईल, गती आणि प्रगती असेल. विकसित भारतात अंतर कमी होईल. देशाचा कानाकोपरा जोडला जाईल. जीवन असो किंवा उपजीविका , सर्व काही अखंडपणे , कोणत्याही अडथळ्याशिवाय चालू राहील . हा अटल सेतूचा संदेश आहे .
माझ्या कुटुंबातील सदस्यांनो,
गेल्या 10 वर्षांत भारत खूप बदलला आहे , त्याची बरीच चर्चा होते. ज्यावेळी आपण 10 वर्षांपूर्वीच्या भारताची आठवण काढतो, तेव्हा बदललेल्या भारताचे चित्र अधिक स्पष्ट होते. दहा वर्षांपूर्वी हजारो, लाखो कोटी रुपयांच्या मोठ्या घोटाळ्यांची चर्चा होती. आज हजारो कोटी रुपयांचे महाकाय प्रकल्प पूर्ण होण्याची चर्चा होत आहे. सुशासनाचा हा संकल्प देशभरात दिसून येत आहे.
ईशान्येकडील भूपेन हजारिका सेतू आणि बोगीबील पूल यासारखे मोठे प्रकल्प पूर्ण झाल्याचे देशाने पाहिले आहे . आज अटल बोगदा आणि चिनाब पूल यासारख्या प्रकल्पांची चर्चा होत आहे . आज एकापाठोपाठ एक द्रुतगती मार्ग तयार होत असल्याची चर्चा होत आहे . आज भारतात आधुनिक आणि भव्य रेल्वे स्थानके उभारली जात असल्याचे आपण पाहत आहोत . पूर्व आणि पश्चिम मालवाहतूक मार्गिका रेल्वेचा चेहरामोहरा बदलणार आहेत. वंदे भारत , नमो भारत, अमृत भारत रेल्वेगाड्या सामान्य माणसाचा प्रवास सोपा आणि आधुनिक बनवत आहेत . आज दर काही आठवड्यांनी देशाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात एक नव्या विमानतळाचे लोकार्पण होत आहे.
मित्रांनो,
इथे मुंबईत, महाराष्ट्रातच या काही वर्षात अनेक भव्य प्रकल्प एकत्र पूर्ण झाले आहेत किंवा लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. मागच्या वर्षीच बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले आहे. नवी मुंबई विमानतळ आणि समुद्रकिनारी मार्ग प्रकल्पाचे काम देखील जलदगतीने सुरू आहे. समुद्रकिनारी मार्ग प्रकल्पामुळे मुंबई महानगराच्या संपर्क सुविधेचा कायापालट होणार आहे. ऑरेंज गेट, पूर्व मुक्त मार्ग आणि मरीन ड्राईव्हची भूमीगत बोगद्याद्वारे संपर्क सुविधा यामुळे मुंबई शहराची प्रवास सुलभता वृद्धिंगत होईल.
येत्या काही वर्षात मुंबईला पहिली बुलेट ट्रेन देखील मिळणार आहे. दिल्ली - मुंबई आर्थिक कॉरिडॉर, महाराष्ट्राला मध्य भारत आणि उत्तर भारताबरोबर जोडणार आहे. महाराष्ट्राला तेलंगणा, छत्तीसगड आणि अन्य शेजारी राज्यांशी जोडण्यासाठी ट्रान्समिशन लाईनचे जाळे पसरवले जात आहे. याशिवाय, ऑईल किंवा गॅस पाइपलाइन असो, औरंगाबाद औद्योगिक नगरी असो, नवी मुंबई विमानतळ असो, शेंद्री - बिडकिन इंडस्ट्रीयल पार्क असो, हे मोठे प्रकल्प महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणारे आहेत.
माझ्या कुटुंबीयांनो,
कर दात्यांचा पैसा देश विकासाच्या कामात कशाप्रकारे वापरला जात आहे हे आज संपूर्ण देश प्रत्यक्ष स्वरूपात पाहत आहे. मात्र देशावर अनेक दशके शासन करणाऱ्यांनी देशाचा वेळ आणि करदात्यांचा पैसा या दोन्हीची परवा केली नाही. म्हणूनच पूर्वीच्या काळात एखादा प्रकल्प एकतर प्रत्यक्ष साकार होत नव्हता किंवा तो अनेक दशके लटकून राहत होता. महाराष्ट्र अशा अनेक प्रकल्पांचा साक्षीदार आहे. निळवंडे धरणाचे काम 5 दशकांपूर्वी सुरू झाले होते. मात्र, ते काम आमच्या सरकारने पूर्ण केले. उरण - खारकोपर रेल्वे मार्गाचे काम देखील सुमारे 3 दशकांपूर्वी सुरू झाले होते. हे काम देखील दुहेरी इंजिनच्या सरकारच्या काळात पूर्ण झाले. नवी मुंबई मेट्रो प्रकल्प देखील बऱ्याच काळापासून अडकून पडला होता. इथे दुहेरी इंजिनचे सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही त्या कामाला गती दिली आणि आता या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.
आज हा अटल सेतू जो आपल्याला भेट स्वरूपात मिळाला आहे, त्याची योजना कित्येक वर्षांपासून आखली जात होती. म्हणजेच मुंबईसाठी हा प्रकल्प गरजेचा आहे हे तेव्हा पासून लक्षात आले होते, मात्र हा प्रकल्प पूर्ण करण्याचे सौभाग्य आम्हाला लाभले आहे. आणि तुम्ही हे लक्षात घ्या, बांद्रा - वरळी सी लिंक प्रकल्प अटल सेतूपेक्षा सुमारे 5 पट छोटा आहे. पूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळात हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 10 वर्षांहूनही अधिक काळ लागला होता आणि यासाठीचा खर्च 4 ते 5 पटीने वाढला होता. तेव्हा सत्तेत असलेल्या सरकारची कार्यपद्धती अशी होती.
मित्रांनो,
अटल सेतू सारख्या पायाभूत सुविधांचे प्रकल्प केवळ सुविधा प्रदान करत नाहीत तर रोजगाराचे देखील खूप मोठे साधन असतात. या प्रकल्पाच्या निर्मिती दरम्यान माझ्या सूमारे 17 हजार मजूर बंधू - भगिनींना आणि 1500 अभियंत्यांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला. याशिवाय, वाहतूकीशी संबंधित व्यवसाय, निर्मितीशी संबंधित इतर व्यवसायांमध्ये जी रोजगार निर्मिती झाली ती वेगळीच आहे . आता हा प्रकल्प या संपूर्ण क्षेत्रातील प्रत्येक प्रकारच्या व्यवसायाला चालना देईल, आणि सोबतच व्यवसाय सुलभीकरण घडवून लोकांचे जीवन जगणे सुलभ बनवेल.
माझ्या कुटुंबीयांनो,
आज भारताचा विकास दोन्ही रुळावरून एकदाच होत आहे. आज एकीकडे गरीबाचे जीवन सुखकर करण्यासाठी महाभियान चालवले जात आहे तर दुसरीकडे देशाच्या कानाकोपऱ्यात महा योजना राबविल्या जात आहेत. आम्ही अटल निवृत्ती वेतन योजना देखील चालवत आहोत आणि अटल सेतू सुद्धा तयार करत आहोत. आम्ही आयुष्मान भारत योजना राबवत आहोत आणि वंदे भारत - अमृत भारत रेल्वे गाड्या देखील तयार करत आहोत. आम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे वाटप करत आहोत आणि प्रधानमंत्री गतिशक्ती देखील तयार करत आहोत. आजचा भारत हे सर्व एकदाच कसे काय करु शकत आहे? वृत्ती आणि निष्ठा हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आमच्या सरकारची नियत स्वच्छ आहे. आज सरकारची निष्ठा केवळ आणि केवळ देशाप्रती आणि देशवासीयांप्रती आहे. आणि जशी निष्ठा असेल, जशी नियत असेल तशीच निती देखील असते, आणि जशी निती असेल तशाच रीतीने काम केले जाते.
ज्यांनी बऱ्याच काळापर्यंत देशावर शासन केले, त्यांची नियत आणि निष्ठा दोन्ही बाबींवर सवाल उपस्थित केले जातात. त्यांची वृत्ती केवळ सत्ता काबीज करण्याची होती, वोट बँक तयार करण्याची होती, आपल्या तिजोऱ्या भरण्याची होती. त्यांची निष्ठा देशवासीयांप्रती नसून केवळ आणि केवळ आपल्या घराण्यांच्या विकासापुरती सिमित होती. म्हणूनच ते विकसित भारताविषयी विचार करु शकले नाहीत किंवा आधुनिक पायाभूत सुविधांचे उद्दिष्ट निर्धारित करु शकले नाहीत. यामुळे देशाचे किती नुकसान झाले हे जाणून घेणे देखील गरजेचे आहे. मी तुम्हाला एक आकडा सांगतो. 2014 पूर्वीच्या 10 वर्षात पायाभूत सुविधांसाठी केवळ 12 लाख कोटी रुपये रुपयांचा अर्थसंकल्प दिला जात होता. मात्र आमच्या सरकारने 10 वर्षात 44 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प पायाभूत सुविधांसाठी दिला आहे. तेव्हाच तर आज देशात इतके मोठे मोठे प्रकल्प सुरू आहेत. महाराष्ट्रातच केंद्र सरकारने सुमारे 8 लाख कोटी रुपये मुल्याच्या पायाभूत सुविधांचे प्रकल्प पूर्ण केले आहेत किंवा त्यांचे काम प्रगतीपथावर आहे. हा पैसा प्रत्येक क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करत आहे.
मित्रांनो,
आम्ही आज देशात प्रत्येक कुटुंबासाठी पायाभूत सुविधांची संपृक्तता म्हणजेच शंभर टक्के सेवा उपलब्धतेची मोहीम चालवत आहोत. विकसित भारत संकल्प यात्रे अंतर्गत आज मोदींची हमी देणारे वाहन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचत आहे. जिथे दुसऱ्यांच्या आशा संपतात तेथून मोदींची हमी सुरू होते. आमच्या माता भगिनींनी तर हे सर्वात जास्त अनुभवले आहे. गाव असो किंवा शहर, स्वच्छतेपासून शिक्षण, औषधे आणि उत्पन्न, प्रत्येक योजनेचा सर्वात जास्त लाभ आमच्या माता भगिनींना झाला आहे. प्रधानमंत्री जन औषधी केंद्रांवर 80 टक्के सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत.
मोदींची हमी गरीब कुटुंबातील भगिनींना पक्के घर देण्याची आहे. ज्यांची पूर्वी कोणीही विचारपूस केली नव्हती त्यांची पहिल्यांदाच मोदी विचारपूस करत आहे, त्यांना बॅंकांकडून मदत मिळवून दिली जात आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे मुंबई येथील हजारो फेरीवाले बंधू भगिनींना लाभ मिळाला आहे. आमचे सरकार महिला बचत गटांना देखील मदत करत आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही अनेक भगिनींना लखपती दिदी बनवले आहे. आणि आता माझा संकल्प आहे की, येत्या काही वर्षात 2 कोटी, हा आकडा ऐकून काही लोक आश्चर्यचकित होऊन जातात, 2 कोटी महिलांना मी लखपती दिदी बनवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून चालत आहे.
महाराष्ट्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने देखील जे नवीन अभियान सुरू केले आहे ते महिलांच्या सशक्तिकरणात मोठी भूमिका निभावेल. मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान आणि नारी शक्तीदूत अभियानामुळे महिलांच्या विकासाला नवी गती प्राप्त होईल. दुहेरी इंजिनचे सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी अशाच समर्पित भावनेने काम करत राहील याची मी तुम्हाला खात्री देतो. महाराष्ट्र विकसित भारताचा एक मजबूत स्तंभ बनावा यासाठी कसल्याही प्रकारची उणीव न ठेवता आम्ही काम करत राहू.
पुन्हा एकदा, तुम्हा सर्वांना या नवीन प्रकल्पासाठी मी खूप खूप शुभेच्छा देत आहे. माता भगिनींना विशेष रूपाने प्रणाम करतो. तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने येऊन आम्हाला आशीर्वाद दिले.
खूप खूप आभार!
***
S.Tupe/S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1995836)
Visitor Counter : 146
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam