युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी महाराष्ट्रात नाशिक येथे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार
राष्ट्रीय युवा दिना निमित्त पंतप्रधान एक लाख युवा सहभागींना संबोधित करणार: केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर
Posted On:
11 JAN 2024 10:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 11 जानेवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी महाराष्ट्रात नाशिक येथे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करतील आणि देशातील तरुणांना संबोधित करतील.
केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितले की, स्वामी विवेकानंद यांच्या 161 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात नाशिक येथे 27 वा राष्ट्रीय युवा महोत्सव साजरा होणार आहे. 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. ते पुढे म्हणाले की, देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील हजारो तरुण नाशिक, या कुंभ नगरीत एकत्र आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की यावेळी महोत्सवात सहभागी होत असलेल्या अंदाजे एक लाख युवकांना पंतप्रधान संबोधित करतील. ते म्हणाले की हा कार्यक्रम देशाची युवा शक्ती प्रदर्शित करतील आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवी वर्षापर्यंत म्हणजेच 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्यासाठी प्रतिज्ञा घेतील.
यंदाचा राष्ट्रीय युवा दिन विविध सरकारी विभागांच्या सहकार्याने, भारतातील सर्व जिल्ह्यांमध्ये युवा व्यवहार विभागाच्या सर्व क्षेत्रीय संघटनांद्वारे साजरा केला जाईल. एनएसएस च्या तुकड्या, एनवायकेएस आणि विविध शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने देशभरातील ‘माय भारत’ स्वयंसेवक भारतासाठी सेवा करण्याचा उपक्रम राबविण्यासाठी त्यांची ऊर्जा एकवटतील. युथ क्लब देखील महोत्सवात चेतना आणून तो खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक बनवतील. या मोहिमेत 88,000 हून अधिक स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमासाठी माय भारत डिजिटल व्यासपीठाच्या (https://mybharat.gov.in) माध्यमातून स्वयंसेवकांनी आपली नोंदणी केली आहे. 12 जानेवारी रोजी देशातील प्रमुख शहरे आणि 750 जिल्हा मुख्यालयांमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातील. प्रशिक्षित रस्ते सुरक्षा स्वयंसेवकांना केंद्रीय/राज्य मंत्री, स्थानिक खासदार किंवा आमदार यांच्याकडून हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. या अभियानामधून सुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्याची वचनबद्धता प्रदर्शित होईल. या स्वयंसेवकांना वाहतूक कोंडीच्या ठिकाणी रहदारी सुरळीत करण्यासाठी आणि रस्ते सुरक्षा जनजागृती उपक्रम राबवण्यासाठी नियुक्त केले जाईल.
हे स्वयंसेवक अंगणवाडी केंद्रांना भेट देऊन मुलांना गोष्टी सांगतील आणि सरकारी योजनांची माहितीही प्रसारित करतील.
12 जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जयंतीदिन असून तो राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. देशाच्या प्रत्येक भागातल्या युवा लोकसंख्येच्या प्रत्येक घटकाला समाविष्ट करून सक्षम करण्यासाठी अनोख्या आणि विस्तृत दृष्टिकोनासह युवा व्यवहार विभाग राष्ट्रीय युवा दिनाची तयारी करत आहे.
स्वामी विवेकानंदांना पुष्पांजली अर्पण करून देशभरातील 763 जिल्ह्यांमध्ये, राष्ट्रीय युवा दिन 2024 च्या जिल्हास्तरीय महामहोत्सवाचा प्रारंभ होईल.
जिल्ह्यातील विविध सांस्कृतिक वारसा आणि युवा उत्सवाचे विजेते तसेच यजमान संस्थांमधील संघ/व्यक्ती यांच्या सहभागासह तरुणांच्या कलागुणांचे प्रदर्शन करणारा सांस्कृतिक कार्यक्रमही कार्यक्रमाच्या शेवटी सादर केला जाईल.
महामहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भागीदार मंत्रालये आणि त्यांची जिल्हास्तरीय कार्यालये 12 जानेवारी 2024 रोजी वाहतूक जागृती, पोषण आणि आहार, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या स्टार्टअप्सची उत्पादने, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे लाभार्थी यावर लक्ष केंद्रित करणारी विविध प्रदर्शने/उपक्रम/नोंदणी/जागरूकता मोहिमेसह स्टॉल्स उभारतील. वरील सर्व कार्यक्रम जिल्हा स्तरावर डिजिटल माय भारत प्लॅटफॉर्मवर तयार केले जात आहेत जेणेकरुन अधिकाधिक युवकांपर्यंत पोहोचता येईल. अशा कार्यक्रमांची निर्मिती ही प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य आणि युवा आकांक्षा बाह्य उपक्रमांमध्ये प्रतिबिंबित होणे सुनिश्चित करते.
भारतभरातील तरुण त्यांच्या जवळच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यात स्वारस्य दर्शवू शकतात. ते माय भारत प्लॅटफॉर्मवर त्यांच्या सहभागाची छायाचित्रे आणि माध्यम देखील अपलोड करू शकतात.
N.Chitale/R.Agashe/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1995376)