संरक्षण मंत्रालय
एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन पथसंचलन 2024 मध्ये ईशान्येकडील मुलींचा बँड प्रथमच सहभागी होणार
Posted On:
03 JAN 2024 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 3 जानेवारी 2024
राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) प्रजासत्ताक दिन पथसंचलन 2024 मध्ये ईशान्येकडील 45 मुलींचा समावेश असलेला बँड प्रथमच सहभागी होणार आहे. या मुली 13-15 वयोगटातील असून, ईशान्येकडील राज्यांच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिनिधित्व करतील आणि देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत असलेली एनसीसीची व्याप्ती यातून अधोरेखित करतील.
दिल्ली कॅनटोनमेंट येथे 03 जानेवारी 2024 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत एनसीसीचे डीजी लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी सांगितले की, महिनाभर चालणाऱ्या या पथसंचलनात देशभरातून एकूण 2,274 कॅडेट्स सहभागी होत असून, यामध्ये सर्वाधिक, म्हणजे 907 मुलींचा समावेश आहे. कॅडेट्समध्ये जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमधील 122 तसेच ईशान्येकडील 177 जणांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, युवा परस्पर भेट कार्यक्रमा (YEP) अंतर्गत 25 मित्र देशांमधील कॅडेट्स आणि अधिकारी पथसंचलनात सहभागी होतील.
देशाच्या समृद्ध परंपरांचे प्रदर्शन करणे आणि कॅडेट्सची मूल्य प्रणाली मजबूत करणे, हे प्रजासत्ताक दिन पथसंचलनाचे उद्दिष्ट असल्याचे एनसीसी चे डीजी लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी अधोरेखित केले. हे पथसंचलन सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेला चालना देईल आणि विविधतेमधील एकतेला बळ देईल. या पथसंचलनाला उपराष्ट्रपती, संरक्षण मंत्री, संरक्षण राज्य मंत्री, संरक्षण दलाचे कर्मचारी आणि तिन्ही सेना प्रमुखांसह अनेक मान्यवर भेट देतील.
लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी 2023 मध्ये एनसीसीने अमलात आणलेल्या प्रमुख उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले की, 39 एक भारत श्रेष्ठ भारत शिबिरे आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये दोन व्हायब्रंट व्हिलेज एरिया कॅम्प, तीन डीआरडीओ कॅम्प आणि एक एरोस्पेस कॅम्प यांचा समावेश होता. मेगासायक्लोथॉन, नारी वंदन रन, क्रीडा स्पर्धांमधील उल्लेखनीय कामगिरी, पर्वतारोहण मोहिमा आणि G20 कार्यक्रमांमधील उपस्थिती ही यासारखी इतर कामगिरी होती.
लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी विशेष नमूद केले की, तरुणांच्या बदलत्या आकांक्षांना सामावून घेण्यासाठी, कॅडेट्सच्या प्रशिक्षणामागच्या तत्त्वांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. “कॅडेट्सच्या भविष्यातील गरजांसाठी त्यांना सुसज्ज करण्यासाठी व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व गुण आणि सॉफ्ट स्किल्स विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यांच्यामधून उत्तम नागरिक घडवणे, आणि ‘देश सर्वप्रथम’, ही भावना जागवणे, ही यामागची संकल्पना आहे,” ते म्हणाले.
R.Aghor/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1992871)
Visitor Counter : 173