पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधान 2 आणि 3 जानेवारी 2024 रोजी तामिळनाडू, लक्षद्वीप आणि केरळला भेट देणार


पंतप्रधान तामिळनाडूमध्ये 19,850 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध  विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी

तामिळनाडूमधील रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू आणि नौवहन क्षेत्राशी संबंधित अनेक प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार

पंतप्रधानांच्या हस्ते तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे होणार उद्घाटन 

पंतप्रधान आयजीसीएआर, कल्पक्कम येथे देशी बनावटीचे डेमॉन्स्ट्रेशन फास्ट रिऍक्टर इंधन पुनर्प्रक्रिया संयंत्र (DFRP) राष्ट्राला समर्पित करणार.

भारतीदासन विद्यापीठाच्या 38 व्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधान संबोधित करणार.

पंतप्रधान लक्षद्वीपमध्ये 1150 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार.

लक्षद्वीप बेटांना दूरसंचार, पिण्याचे पाणी, सौरऊर्जा आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित विकास प्रकल्पांचा  होणार फायदा

स्वातंत्र्यानंतर प्रथमच लक्षद्वीप समुद्राखालून जाणाऱ्या ऑप्टिक फायबर केबलद्वारे जोडले जाणार

Posted On: 31 DEC 2023 12:56PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 आणि 3 जानेवारी 2024 रोजी तामिळनाडू आणि लक्षद्वीपला भेट देणार आहेत.

2 जानेवारी 2024 रोजी, सकाळी 10:30 वाजता, पंतप्रधान तिरुचिरापल्ली, तामिळनाडू येथे पोहोचतील.  तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विद्यापीठाच्या 38 व्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. पंतप्रधान दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तिरुचिरापल्ली येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात विमान वाहतूक, रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू, नौवहन तसेच उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित 19,850 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन तसेच  लोकार्पण करतील.  दुपारी 3.15 च्या सुमारास पंतप्रधान लक्षद्वीप मधील अगत्ती येथे पोहोचतील. तिथे ते एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करतील.  3 जानेवारी, 2024 रोजी, दुपारी 12 वाजता, पंतप्रधान लक्षद्वीपमधील कवरत्ती येथे पोहोचतील. लक्षद्वीपशी येथील कार्यक्रमात ते दूरसंचार, पेयजल, सौर ऊर्जा आणि आरोग्य यासारख्या इतर क्षेत्रांशी संबंधित अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील.

तामिळनाडूमध्ये पंतप्रधान:

तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विद्यापीठाच्या 38 व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधानांच्या हस्ते विद्यापीठातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करुन त्यांना पुरस्कार देण्यात येतील.  यावेळी ते उपस्थितांना संबोधित देखील करणार आहेत.

तिरुचिरापल्ली येथील सार्वजनिक कार्यक्रमात, पंतप्रधान तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करतील.  1100 कोटींहून अधिक खर्च करून विकसित केलेल्या, दोन-स्तरीय नवीन आंतरराष्ट्रीय टर्मिनल इमारतीची वार्षिक 44 लाखाहून अधिक प्रवाशांना सेवा देण्याची तर गर्दीच्या वेळेत सुमारे 3500 प्रवाशांना सेवा देण्याची क्षमता आहे.  नवीन टर्मिनलमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठीच्या अत्याधुनिक सुविधा आणि वैशिष्ट्ये निर्माण केली आहेत.

पंतप्रधानांच्या हस्ते देशाला अनेक रेल्वे प्रकल्प समर्पित केले जाणार आहेत.  यामध्ये 41.4 किमी लांबीच्या सेलम - मॅग्नेसाइट जंक्शन - ओमालूर- मेत्तूर धरण विभाग या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रकल्प समाविष्ट आहेमदुराई - तुतीकोरीन या विभागाच्या 160 किमी लांबीच्या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण  आणि तिरुच्छिरापल्ली - मनमदुराई - विरुधुनगरविरुधुनगर तेनकासी जंक्शनसेनगोट्टाई - तेनकासी जंक्शन - तिरुनेलवेली - तिरुचेंदूर या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे तीन प्रकल्प यांचाही समावेश आहे. हे रेल्वे प्रकल्प मालवाहतूक आणि प्रवासी वाहून नेण्यासाठी रेल्वेची क्षमता सुधारण्यास मदत करतील आणि तामिळनाडूमध्ये आर्थिक विकास तसेच रोजगार निर्मितीला हातभार लावतील.

रस्ते क्षेत्रातील पाच प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण होणार आहे. या प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 81 च्या त्रिची-कल्लागम विभागासाठी 39 किमी लांबीच्या चार मार्गिका असलेला रस्ता; राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 81 च्या कल्लागम - मीनसुरत्ती विभागाचे 60 किमी लांबीच्या 4/2-मार्गिका; राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 785 चा चेट्टीकुलम - नाथम विभागाचा 29 किमी चार-मार्गिका असलेला  रस्ता; राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 536 च्या कराईकुडी रामनाथपुरम विभागाच्या पदपथ जोडणी रस्त्यासह 80 किमी लांब दोन मार्गिका; आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 179A सालेम - तिरुपथूर - वानियांबडी रस्त्याच्या विभागाचे 44 किमी लांबीचे चौपदरीकरण याचा समावेश आहे. रस्ते प्रकल्पांमुळे या प्रदेशातील लोकांचा सुरक्षित आणि जलद प्रवास सुकर होईल तसेच इतर भागांसह त्रिची, श्रीरंगम, चिदंबरम, रामेश्वरम, धनुष्कोडी, उथिराकोसमंगाई, देवीपट्टीनम, एरवाडी, मदुराई यासारख्या औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्रांदरम्यान  दळणवळणात सुधारणा होईल.

या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान महत्त्वाच्या रस्ते विकास प्रकल्पांचीही पायाभरणी करतील. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 332A च्या मुगैयुर ते मरक्कनम पर्यंत 31 किमी लांबीच्या चार मार्गिका असलेल्या रस्त्याच्या बांधकामाचा समावेश आहे. हा रस्ता तामिळनाडूच्या पूर्व किनार्‍यावरील बंदरांशी जोडला जाईल, जागतिक वारसा स्थळ असलेल्या ममल्लापुरमकडील कनेक्टिव्हिटीत वाढ होईल आणि कल्पक्कम अणुऊर्जा प्रकल्पाला चांगली संपर्क सुविधा  प्रदान करेल.

कामराजर बंदराचा जहाज उभे करण्याचा तळ क्रमांक -II (वाहन निर्यात/आयात तळ क्रमांक -II आणि जहाज बांधणी टप्पा -V) याचं पंतप्रधान राष्ट्रार्पण करतील. जहाज उभे करण्याचा तळ क्रमांक -II चं उद्घाटन हे देशाच्या व्यापाराला बळकटी देण्याच्या दिशेने एक पाऊल असेल ज्यामुळे आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल.

कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान 9000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या महत्त्वाच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू प्रकल्पांचं राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. राष्ट्राला समर्पित होणाऱ्या दोन प्रकल्पांमध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) च्या IP101 (चेंगलपेट) ते IP 105 (सायलकुडी) विभागातील एन्नोर - थिरूवल्लूर - बंगळुरू - पुदुचेरी - नागपट्टीनम - मदुराई - तुतीकोरिन या 488 किमी लांबीच्या  नैसर्गिक वायू पाइपलाइनचा तसेच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) च्या 697 किमी लांबीच्या  विजयवाडा-धर्मपुरी बहुउत्पादन (POL) पेट्रोलियम पाइपलाइनचा  (VDPL) समावेश आहे.

तसेच, ज्या प्रकल्पांची पायाभरणी केली जाईल त्यामध्ये भारतीय वायू प्राधिकरण मर्यादित (GAIL) द्वारे कोची-कूट्टानाड-बंगळुरू-मंगळुरू गॅस पाइपलाइन II (KKBMPL II) च्या कृष्णगिरी ते कोईम्बतूर विभागापर्यंत 323 किमी नैसर्गिक वायू पाइपलाइनचा विकास आणि चेन्नईत वल्लूर इथे मुळापर्यंत जाणाऱ्या POL पाइपलाइनच्या प्रस्तावित तळासाठी सामायिक मार्गिकेची निर्मिती करणे याचाही समावेश आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचे हे प्रकल्प या क्षेत्रातील ऊर्जेच्या औद्योगिक, घरगुती आणि व्यावसायिक गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल ठरतील. यामुळे या प्रदेशात बऱ्याच प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल आणि रोजगार निर्मितीला हातभार लागेल.

पंतप्रधान, कल्पक्कम येथील इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक  रिसर्च (IGCAR) येथे डेमॉन्स्ट्रेशन फास्ट रिऍक्टर  इंधन पुनर्प्रक्रिया संयंत्र (DFRP) राष्ट्राला समर्पित करतील. डीएफआरपी हे संयंत्र 400 कोटी खर्च करून निर्माण करण्यात आले असून हे संयंत्र एका विशिष्ट अशा संरचनेसह सुसज्ज असून ते जगातील अशा प्रकारचे एकमेव संयंत्र आहे. फास्ट रिऍक्टरमधून सोडल्या जाणार्‍या कार्बाइड आणि ऑक्साईड या दोन्ही इंधनांवर हे संयंत्र पुनर्प्रक्रिया करण्यास सक्षम आहे. हे संयंत्र संपूर्णपणे भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेले असून मोठ्या व्यावसायिक स्तरावरील फास्ट रिऍक्टर  इंधन पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. इतर प्रकल्पांबरोबरच, पंतप्रधान तिरुचिरापल्ली येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) - मधील मुलांच्या 500 खाटांच्या हॉस्टेल अमेथीस्ट ('AMETHYST)' चे देखील उद्घाटन करतील.

लक्षद्वीप मध्ये पंतप्रधान 

लक्षद्वीप बेटांच्या दौऱ्यात, पंतप्रधान 1150 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या काही विकास प्रकल्पांचे उद्घाटन  करतीलकाही प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील तर काही प्रकल्पांची पायाभरणी देखील करतील.

एका परिवर्तनात्मक वाटचालीत, पंतप्रधानांनी लक्षद्वीप बेटावरील संथ गतीच्या  इंटरनेट संबंधीच्या आव्हानावर मात करण्यासाठी कोची-लक्षद्वीप द्वीपसमूह सबमरीन ऑप्टिकल फायबर कनेक्शन (KLI - SOFC) प्रकल्प सुरू करण्याचा संकल्प ऑगस्ट 2020 मध्ये लाल किल्ल्यावरून केलेल्या आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केला होता. हा प्रकल्प आता पूर्ण झाला असून त्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पामुळे इंटरनेटचा वेग 100 पटीने वाढेल (1.7जीबीपीएस ते 200 जीबीपीएस). स्वातंत्र्यानंतर, प्रथमच लक्षद्वीप बेटे सबमरीन ऑप्टिक फायबर केबलच्या माध्यमातून जोडले जाणार आहे.  पाण्याखाली असलेल्या या ऑप्टिकल फायबर केबल OFC सुविधा, लक्षद्वीप बेटांवरील दळणवळण विषयक पायाभूत सुविधांमध्ये मोठे परिवर्तन घडवून आणेल, यामुळे जलद आणि अधिक विश्वासार्ह इंटरनेट सेवा, टेलिमेडिसिन, ई-गव्हर्नन्स, शैक्षणिक उपक्रम, डिजिटल बँकिंग, डिजिटल चलन वापर, डिजिटल साक्षरता इत्यादी सुविधा अधिक सक्षम होतील.

पंतप्रधान, कदमत येथील लो टेम्परेचर थर्मल डिसेलिनेशन (LTTD) प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. या प्रकल्पातून दररोज 1.5 लाख लिटर शुद्ध पिण्याच्या पाण्याची निर्मिती होईल. अगट्टी आणि मिनिकॉय बेटांवरील सर्व घरांना फंक्शनल हाउसहोल्ड टॅप कनेक्शन (FHTC) सुविधा देखील पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील. लक्षद्वीप बेटांवर पिण्यायोग्य पाण्याची उपलब्धता हे नेहमीच आव्हान राहिले आहे कारण लक्षदीप हे प्रवाळ बेट असल्याने येथे भूजलाची उपलब्धता अत्यंत मर्यादित आहे. या पिण्याच्या पाण्यासंबंधित प्रकल्पांमुळे या बेटांची पर्यटन क्षमता बळकट होण्यास मदत होईल, ज्यामुळे स्थानिक रोजगाराच्या संधी देखील वाढतील.

पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित करण्यात येणाऱ्या इतर प्रकल्पांमध्ये, कावरत्ती येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचा समावेश आहे, जो लक्षद्वीप बेटांवरचा पहिला बॅटरी सुविधेवर चालणारा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे डिझेल इंधनावर आधारित वीज निर्मिती प्रकल्पावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल; कावरत्ती येथील इंडिया रिझर्व्ह बटालियन  कॉम्प्लेक्समध्ये नवीन प्रशासकीय इमारत आणि 80 पुरुषांसाठी राहण्याची व्यवस्था असलेल्या सुविधा प्रकल्प ही पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील.

या प्रकल्पांखेरीज पंतप्रधान कालपेनी येथील प्राथमिक आरोग्य सेवा सुविधेचे नूतनीकरण आणि आंद्रोथ, चेतलाट, कडमत, अगट्टी आणि मिनिकॉय या पाच बेटांवर पाच आदर्श अंगणवाडी केंद्र (नंद घर) बांधण्याच्या कामाची पायाभरणी करतील.

***

S.Kane/S.Mukhedkar/S.Naik/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1991956) Visitor Counter : 133