पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी अयोध्या धाम येथे 15,700 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी


11,100 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचा अयोध्या आणि सभोवतालच्या भागांना मिळणार लाभ

“जग 22 जानेवारीची अधीरतेने प्रतीक्षा करत आहे, मी सुद्धा त्याच प्रतीक्षेत आहे”

“विकसित भारत मोहिमेला अयोध्येमधून नवी ऊर्जा प्राप्त होत आहे”

“आजचा भारत प्राचीन आणि आधुनिक या दोहोंना सामावून पुढे जात आहे”

“केवळ अवध प्रदेशच नव्हे तर अयोध्या संपूर्ण उत्तर प्रदेशच्या विकासाला एक नवी दिशा देईल”

“महर्षी वाल्मिकी रामायण हा आपल्याला श्री रामासोबत जोडणारा मार्ग आहे”

“गरिबांच्या सेवेची भावना आधुनिक अमृत भारत ट्रेनमधून दर्शवला जात आहे”

“22 जानेवारीला प्रत्येक घरात श्री राम ज्योती प्रज्वलित करा”

“सुरक्षा आणि लॉजिस्टिक्सच्यादृष्टीकोनातून  तुम्ही हा सोहळा संपल्यानंतर २२ जानेवारीनंतर अयोध्येला भेट देण्याचे नियोजन करा”

“14 जानेवारी या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सर्व तीर्थस्थानांवर अतिशय मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहिमांचे आयोजन करून भव्य राम मंदिराचा आनंद साजरा करा”

“आज देशाचा मोदींच्या हमीवर विश्वास आहे कारण मोदी जी हमी देतात ती पूर्ण करण्यासाठी त्यांचे संपूर्ण प्रयत्न पणाला

Posted On: 30 DEC 2023 4:39PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्या धाम येथे 15,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमीपूजन केले. यामध्ये अयोध्या आणि सभोवतालच्या भागांच्या विकासाच्या 11,100 कोटी रुपये खर्चाच्या आणि उत्तर प्रदेशातील 4,600 कोटी रुपये खर्चाच्या इतर प्रकल्पांचा समावेश आहे.

त्यापूर्वी पंतप्रधानांनी पुनर्विकास केलेल्या अयोध्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले आणि नव्या अमृत भारत रेल्वेगाड्या आणि वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. त्यानंतर त्यांनी नव्याने बांधण्यात आलेल्या अयोध्या विमानतळाचे देखील उद्घाटन केले. या विमानतळाला महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात आले आहे.

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी अयोध्या धाममध्ये उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि या पवित्र शहरात त्यांच्या रोड शोच्या वेळी पाहायला मिळालेला जनतेचा हर्षोल्हास आणि उत्साह याकडे लक्ष वेधले. पंतप्रधान म्हणाले की संपूर्ण जग 22 जानेवारीची अधीरतेने प्रतीक्षा करत आहे. मी भारताच्या प्रत्येक कणाचा आणि व्यक्तीचा भाविक आहे. सज्ज होत असलेल्या राम मंदिरात प्राण प्रतिष्ठेच्या दिवसाची मला सुद्धा  प्रतीक्षा आहे.

यावेळी पंतप्रधानांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 1943 मध्ये आजच्याच दिवशी अंदमानमध्ये तिरंगा ध्वज फडकवला होता असे सांगत 30 नोव्हेंबरचे महत्त्व अधोरेखित केले. स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित असलेल्या अशा शुभ दिनी आज आपण अमृत काळाचा संकल्प पुढे नेत आहोत,” ते म्हणाले. विकसित भारताच्या मोहिमेला अयोध्येमधून नवी ऊर्जा मिळत आहे असे त्यांनी सांगितले आणि या विकास प्रकल्पांबद्दल अयोध्येच्या जनतेचे अभिनंदन केले. या प्रकल्पांमुळे अयोध्येची राष्ट्रीय नकाशावर पुनर्स्थापना होईल यावर त्यांनी भर दिला. विकासाची नवी उंची गाठण्यामध्ये वारशाची काळजी घेणे हा अविभाज्य भाग असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आजचा भारत प्राचीन आणि आधुनिक या दोहोंचा समावेश करून पुढे जात आहे”, असे ते म्हणाले आणि त्यांचा मुद्दा सविस्तर पद्धतीने मांडताना त्यांनी राम लल्लाचे भव्य मंदिर आणि गरिबांसाठी 4 कोटी पक्की घरे, डिजिटल इंडियामध्ये मोठी मजल मारत तीर्थस्थानांचा जीर्णोद्धार, काशी विश्वनाथ धामचा 30,000 पेक्षा जास्त पंचायत भवनांसह विकास, 315 पेक्षा जास्त वैद्यकीय महाविद्यालयांसोबत केदार धामचा पुनर्विकास, महाकाल महालोकची हर घर जल यासोबत, अंतराळ आणि महासागर क्षेत्रातील कामगिरीची परदेशातून प्राचीन मूर्ती आणि वस्तू परत आणणे यांची त्यांनी सांगड घातली. काही दिवसांनी आयोजन होणार असलेल्या प्राण प्रतिष्ठा सोहळयाचा संदर्भ देत त्यांनी पुढे सांगितले की आज प्रगतीचा आनंद साजरा केला जात आहे आणि येत्या काही दिवसांनी परंपरेचा उत्सव साजरा होणार आहे, आज आपण विकासाचा महोत्सव पाहात आहोत काही दिवसांनी आपल्याला वारशाच्या दिव्यत्वाची अनुभूती मिळणार आहे, असे ते म्हणाले. विकास आणि वारसा यांचे एकत्रित सामर्थ्य भारताला 21 व्या शतकात पुढे नेणार आहे, असे त्यांनी सांगितले. महर्षी वाल्मिकींनी स्वतः वर्णन केलेल्या अयोध्येच्या प्राचीन वैभवाचा संदर्भ देत हे वैभव आधुनिकतेची जोड देत पुन्हा परत आणण्याचा निर्धार पंतप्रधानांनी व्यक्त केला.

केवळ अवधचे क्षेत्रच नाही तर अयोध्येचा परिसरही संपूर्ण उत्तर प्रदेशच्या विकासाला नवी दिशा देईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. या भव्य मंदिराच्या उभारणीमुळे आयोध्येच्या पवित्र नगरीत येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांच्या संख्येत प्रचंड वाढ होणार असल्याचे नमूद करत, या वाढत्या भाविक आणि पर्यटकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इथल्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या सुधारणा केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

अयोध्या विमानतळाला महर्षी वाल्मिकी यांचे नाव दिल्याबद्दलही पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. महर्षी वाल्मिकी रचित रामायण हा ज्ञानाचा मार्ग आहे, हा मार्ग आपल्याला श्री रामाशी जोडतो. आधुनिक भारतातले महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्याला अयोध्या धाम आणि भव्य-दिव्य अशा नव्या राम मंदिराशी जोडणार आहे, असे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात या विमानतळावरून वर्षाला 10 लाख प्रवाशांना सेवा देता येईल, आणि महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी 60 लाख प्रवाशांना सेवा देता येईल, असे त्यांनी सांगितले. सद्यस्थितीत अयोध्या धाम रेल्वे स्थानकावर 10 हजार लोकांची वर्दळ असते, मात्र या रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर ही संख्या 60 हजारांवर पोहोचेल, अशी माहिती त्यांनी दिली. या विमानतळ आणि रेल्वे स्थानकाप्रमाणेच रामपथ, भक्तीपथ, धर्मपथ आणि श्री राम जन्मभूमी पथ, वाहनतळ, नवी वैद्यकीय महाविद्यालये, शरयु नदीचे प्रदूषण रोखणे, राम की पेढीमध्ये घडवून आणले जात असलेले आमूलाग्र परिवर्तन, घाटांचे अद्ययावतीकरण, प्राचीन कुंडांचा जीर्णोद्धार, लता मंगेशकर चौक या सगळ्यामुळेही अयोध्येला नवी ओळख मिळू लागली असून, या सगळ्यातून आयोध्येच्या पवित्र नगरीत उत्पन्न आणि रोजगाराचे नवे मार्ग आणि संधी निर्माण होऊ लागल्या असल्याचेही त्यांनी अधोरेखीत केले.

वंदे भारत आणि नमो भारत या रेल्वे गाड्यांनंतर आता 'अमृत भारत' या रेल्वेगाड्यांची नवी मालिका सुरु होत असल्याची माहिती त्यांनी दिली. यातली पहिली अमृत भारत रेल्वेगाडी अयोध्येतूनच जाणार असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक या राज्यांना या गाड्यांची सेवा आज उपलब्ध झाल्याबद्दल त्यांनी या राज्यांमधल्या जनतेचे अभिनंदनही केले. आधुनिक अमृत भारत गाड्या या गरिबांना सेवा देण्याच्या भावनेतूनच चालवल्या जाणार असल्याचेही पंतप्रधानांनी आवर्जून नमूद केले. ज्या लोकांना अनेकदा आपल्या कामासाठी लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागतो, मात्र तो परवडू शकेल एवढे त्यांचे उत्पन्न नसते, अशा लोकांनाही आधुनिक सुविधांनी युक्त आणि आरामदायी प्रवासाचा हक्क असतो, असे ते म्हणाले. गरिबांच्या जगण्याला सन्मान मिळायला हवा हे लक्षात घेऊनच या गाड्यांची योजना केली असल्याचे त्यांनी नमूद केले. देशातली पहिली वंदे भारत एक्सप्रेस गाडी काशीहून रवाना झाली होती. आज देशभरातल्या 34 मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावत आहेत. वंदे भारत गाड्यांच्या माध्यमातून नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या काशी, कटरा, उज्जैन, पुष्कर, तिरुपती, शिर्डी, अमृतसर, मदुराई अशी केंद्रे जोडली गेली असल्याचेही त्यांनी सांगितले. याच मालिकेला पुढे नेत आज अयोध्येलादेखील वंदे भारत रेल्वे गाडीची भेट मिळाली असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

यावेळी पंतप्रधानांनी देशाच्या सर्व भागांमध्ये होणाऱ्या यात्रांच्या प्राचीन परंपरेचाही उल्लेख केला. अयोध्या धाममध्ये उभारल्या जात असलेल्या सोयी सुविधांमुळे भाविकांची अयोध्या धामची यात्रा अधिक सुखदायक होईल, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.

सर्व 140 कोटी भारतीयांनी श्री रामज्योत प्रज्वलित करावी असे आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केले. आपल्या सर्वांच्या आयुष्यात हा ऐतिहासिक क्षण खूप सुदैवाने आला आहे, याची जाणिव त्यांनी आपल्या संबोधनातून करून दिली. आपल्याला देशासाठी एक नवा संकल्प घ्यावा लागेल आणि तो पूर्ण करण्यासाठी त्याला प्रचंड नव्या उर्जेचे बळ द्यावे लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. प्राणप्रतिष्ठेसाठी उपस्थित राहता यावे ही देशातल्या प्रत्येकाची इच्छा असल्याची आपल्याला जाणीव आहे, मात्र 22 जानेवारीचा कार्यक्रम महत्वाचा असून, त्यादृष्टीने सुरक्षा आणि व्यवस्थेवर पडणारा ताण लक्षात घ्यावा आणि नागरिकांनी या कार्यक्रमानंतरच अयोध्येला भेट देण्याचे नियोजन करावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. आपण 550 वर्षांची प्रतिक्षा केली आहे, आता आणखी काही काळच प्रतिक्षा करा अशी विनंती त्यांनी केली.

भविष्यात अयोध्येतेल्या जनतेला असंख्य पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी तयार राहावे लागणार आहे, त्यादृष्टीने इथल्या नागरिकांनी या क्षेत्राच्या स्वच्छतेवर भर द्यायला हवा असे सांगत इथल्या नागरिकांनी अयोध्येला देशातले सर्वात स्वच्छ शहर बनवावे असे आवाहनही त्यांनी केले. भव्य राम मंदिरासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच 14 जानेवारीपासून देशभरातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी स्वच्छतेची मोठी मोहीम राबवावी, असे आवाहन पंतप्रधानांनी देशाच्या नागरिकांना यावेळी केले.

उज्ज्वला गॅस जोडणी योजनेचा लाभ घेतलेल्या 10 कोटी व्या लाभार्थीच्या घरी जाऊन प्रत्यक्ष घेतलेला अनुभवही पंतप्रधानांनी यावेळी कथन केला. उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यात 1 मे 2016 रोजी सुरू झालेल्या उज्ज्वला योजनेने अनेक महिलांना धुरापासून मुक्त होण्यास मदत केली आणि त्यांच्या जीवनमानात आमुलाग्र बदल घडवून आणला, याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की मागील 50-55 वर्षात केवळ 14 कोटी गॅस जोडण्यांच्या तुलनेत गेल्या 10 वर्षांत 10 कोटी मोफत गॅस जोडण्यांसह एकूण 18 कोटी गॅस जोडण्या देण्यात आल्या.

सर्व शक्तीनिशी लोकांची सेवा करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. आजकाल काही लोक मला विचारतात की मोदींच्या गॅरंटीला (हमीला)  इतकी ताकद कशी प्राप्त झाली? मोदींच्या हमीमध्ये इतकी ताकद आहे याचे कारण म्हणजे मोदी जे बोलतात ते करतात. आज संपूर्ण देशाचा मोदींच्या गॅरंटीवर (हमीवर) विश्वास आहे कारण मोदी जी हमी देतात ती पूर्ण करण्यासाठी मोदी आपले सर्व प्रयत्न पणाला लावतात. अयोध्या नगरीही याची साक्षीदार आहे. आणि आज मी पुन्हा एकदा अयोध्येतील जनतेला आश्वासन देतो की या पवित्र स्थानाच्या विकास कार्यात आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही”, असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

प्रकल्पाचा तपशील

अयोध्येतील नागरी पायाभूत सुविधा सुधारणा

आगामी काळात प्रत्यक्षात नावारूपाला येणाऱ्या राम मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी अयोध्येतील नव्याने पुनर्विकास करण्यात आलेल्या, रुंदीकरण आणि सुशोभित केलेल्या - रामपथ, भक्तिपथ, धरमपथ आणि श्री रामजन्मभूमी पथ या चार रस्त्यांचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले.

यावेळी पंतप्रधानांनी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि अनेक प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले, जे नागरी पायाभूत सुविधांमध्ये वाढ करतील तसेच अयोध्या आणि आसपासच्या सार्वजनिक ठिकाणांच्या सुशोभीकरणात भर घालतील. यावेळी उद्घाटन झालेल्या प्रकल्पांमध्ये राजर्षी दशरथ स्वायत्त राज्य वैद्यकीय महाविद्यालय; अयोध्या-सुलतानपूर रोड-विमानतळ यांना जोडणारा चौपदरी रस्ता, राष्ट्रीय महामार्ग-27वरील बायपास महोब्रा बाजार मार्गे तेढी बाजार श्री रामजन्मभूमीपर्यंत चौपदरी रस्ता; शहरातील अनेक सुशोभित रस्ते आणि अयोध्या बायपास; राष्ट्रीय महामार्ग-330A चा जगदीशपूर-फैजाबाद विभाग; महोली-बारागाव-देवधी रस्ता आणि जसरपूर-भाऊपूर-गंगारामन-सुरेशनगर रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण; पंचकोसी परिक्रमा मार्गावरील बडी बुवा रेल्वे क्रॉसिंगवरील पुलाचे बांधकाम; पिखरौली गावातील घनकचरा प्रक्रिया प्रकल्प; आणि डॉ. ब्रजकिशोर होमिओपॅथिक महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या नवी इमारत आणि वर्गखोल्याचे बांधकाम इत्यादीचा समावेश आहे. मुख्यमंत्री नगर सृजन योजनेच्या कामांशी संबंधित विकास कामे तसेच पाच वाहनतळ आणि व्यावसायिक सुविधांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले.

अयोध्येतील नवीन प्रकल्पांची पायाभरणी

पंतप्रधानांनी यावेळी काही नवीन प्रकल्पांची पायाभरणी देखील केली. यामुळे अयोध्या शहरातल्या नागरी सुविधांच्या सुधारणेस वाव मिळेल आणि तसेच या नवीन प्रकल्पांमुळे अयोध्या शहराचा समृद्ध सांस्कृतिक वारसा अधिक संपन्न होईल. या प्रकल्पांमध्ये अयोध्येतील चार ऐतिहासिक प्रवेशद्वारांचे संवर्धन आणि सुशोभीकरणाचा समावेश आहे; गुप्तार घाट आणि राजघाट दरम्यान नवीन काँक्रीट घाट आणि पूर्वनिर्मित घाटांची पुनर्बांधणी; नया घाट ते लक्ष्मण घाटापर्यंतच्या पर्यटन सुविधांचा विकास आणि सुशोभीकरण; राम की पायडी येथे होणाऱ्या दीपोत्सव आणि इतर जत्रांसाठी पर्यटक सज्जाची उभारणी; राम की पायडी ते राज घाट आणि राजघाट ते राम मंदिर या यात्रेकरू मार्गांचे बळकटीकरण आणि नूतनीकरण इत्यादी कामांचा समावेश आहे.

अयोध्येत 2180 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित केल्या जाणाऱ्या ग्रीनफिल्ड टाऊनशिप (हरित वसाहती) आणि सुमारे 300 कोटी रुपये खर्चून विकसित केल्या जाणाऱ्या वशिष्ठ कुंज निवासी योजनेची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली.

यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रीय महामार्ग-28 (नवीन राष्ट्रीय महामार्ग-27) वरील लखनौ-अयोध्या विभागाची पायाभरणीही केली; राष्ट्रीय महामार्ग-28 (नवीन राष्ट्रीय महामार्ग-27) वरील सध्याच्या अयोध्या बायपास रस्त्याचे बळकटीकरण आणि आधुनिकीकरण; अयोध्येत सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (CIPET) केंद्राची स्थापना आणि अयोध्या महानगरपालिका आणि अयोध्या विकास प्राधिकरण कार्यालयाचे बांधकाम या कामांची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी झाली.

उत्तर प्रदेशातील इतर प्रकल्प

या सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील इतर महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि काही प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. यामध्ये गोसाई की बाजार बायपास-वाराणसी (घाघरा पूल-वाराणसी) (राष्ट्रीय महामार्ग-233) च्या चौपदरीकरण आणि रुंदीकरणाचा समावेश आहे; राष्ट्रीय महामार्ग-730 वरील खुटार ते लखीमपूर भागाचे बळकटीकरण आणि सुधारणा कार्य; अमेठी जिल्ह्यातील त्रिशुंडी येथील एलपीजी प्लांटची क्षमता वाढवणाऱ्या प्रकल्पाची उभारणी; पांखा येथे 30 एमएलडी आणि कानपूर येथील जाजमाऊ येथे 130 एमएलडीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प; उन्नाव जिल्ह्यातील नाल्यांची विविध कामे आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची कामे; आणि कानपूरमधील जाजमाऊ येथे टॅनरी क्लस्टरसाठी सीईटीपी कॉमन इफ्ल्यूएंट ट्रीटमेंट प्लांट उभारणी आदी प्रकल्पांचा समावेश आहे.

रेल्वे प्रकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, पुनर्विकसित केलेल्या अयोध्या रेल्वे स्थानकाचे उदघाटन केले आणि नव्या अमृत भारत आणि वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. तसेच इतर अनेक रेल्वे प्रकल्पही त्यांनी यावेळी देशाला समर्पित केले.

पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानकाचा पहिला टप्पा - अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानक म्हणून ओळखला जाणार आहे. हे स्थानक 240 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित केले आहे. या तीन मजली आधुनिक रेल्वे स्थानक इमारतीत लिफ्ट, सरकते जिने, खाद्यपदार्थांची दुकाने, पूजा साहित्याची दुकाने, सामान जमा करण्यासाठी खोल्या, बालकांसाठी विशेष कक्ष, विश्रामकक्ष अशा सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. स्थानकाची इमारत 'सर्वांसाठी प्रवेशयोग्य' असून ही इमारत भारतीय हरीत इमारत परिषद ('IGBC) प्रमाणित हरीत स्थानक इमारत आहे.

अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकावर झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधानांनी देशातील अमृत भारत एक्सप्रेस या अतिजलद प्रवासी गाड्यांच्या नवीन श्रेणीतील गाडीला हिरवा झेंडा दाखवला. अमृत भारत ट्रेन ही एलएचबी पुश पुल ट्रेन असून त्यात अ-वातानुकूलित डबे आहेत. चांगला वेग पकडण्यासाठी या गाडीच्या दोन्ही टोकांना विशेष इंजिन लावली आहेत. रेल्वे प्रवाशांसाठी सुंदर आणि आकर्षक डिझाईन केलेली आसने, सामान ठेवण्यासाठी उत्तम खण, मोबाईल ठेवण्याच्या सुयोग्य कप्प्यासह मोबाईल चार्जिंग पॉइंट, एलईडी दिवे, सीसीटीव्ही, सार्वजनिक माहिती प्रणाली यासारख्या सुधारित सुविधा या गाड्यांमध्ये केलेल्या आहेत. पंतप्रधानांनी सहा नवीन वंदे भारत गाड्यांनाही हिरवा झेंडा दाखवला.

दरभंगा-अयोध्या-आनंद विहार टर्मिनल अमृत भारत एक्सप्रेस आणि मालदा टाउन - सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनस (बेंगळुरू) अमृत भारत एक्सप्रेस या दोन नवीन अमृत भारत ट्रेन अतिजलद गाड्यांना पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला.

अमृत ट्रेनच्या उदघाटन प्रवासादरम्यान त्यातून प्रवास करणाऱ्या शाळकरी मुलांशी पंतप्रधानांनी संवाद साधला.

पंतप्रधानांनी सहा नव्या वंदे भारत गाड्यांनाही हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये श्री माता वैष्णो देवी कटरा-नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस, अमृतसर-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस; कोईम्बतूर-बंगलोर कॅन्ट वंदे भारत एक्सप्रेस; मंगळूर-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस; जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आणि अयोध्या-आनंद विहार टर्मिनल वंदे भारत एक्सप्रेस, या गाड्यांचा समावेश आहे.

या प्रदेशातील रेल्वेसंबंधी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी 2300 कोटी रुपये खर्च करून तयार केलेले तीन रेल्वे प्रकल्पही पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केले. या प्रकल्पांमध्ये रुमा चकेरी-चंदेरी तिहेरी मार्ग जौनपूर-अयोध्या-बाराबंकी दुहेरीकरण प्रकल्पातील जौनपूर-तुलसीनगर, अकबरपूर-अयोध्या, सोहवाल-पतरंगा आणि सफदरगंज-रसौली हा विभाग प्रकल्प; आणि मल्हार-दळीगंज रेल्वे विभागाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण प्रकल्प, हे प्रकल्प समाविष्ट आहेत.

महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, नव्याने बांधलेल्या अयोध्या विमानतळाचे उदघाटन केले. या विमानतळाला महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात आले आहे.

या अत्याधुनिक विमानतळाचा पहिला टप्पा 1450 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित करण्यात आला आहे. विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 6500 चौरस मीटर असेल, जे दरवर्षी सुमारे 10 लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी सज्ज असेल. टर्मिनल इमारतीचा दर्शनी भाग अयोध्येच्या आगामी श्री राम मंदिराच्या मंदिराच्या वास्तूसारखाच बनविण्यात आला आहे. टर्मिनल इमारतीच्या आतील भाग भगवान श्री रामांचे जीवन दर्शविणारे स्थानिक कलाविशेष, चित्रे आणि भित्तीचित्रे यांनी सजवलेले आहेत. अयोध्या विमानतळाच्या टर्मिनल इमारत विसंवाही छत प्रणाली, एलईडी प्रकाशयोजना, पर्जन्य जल संग्रहण, कारंजी, जल प्रक्रिया प्रकल्प, मलजल शुध्दीकरण प्रकल्प, सौर‌ऊर्जा प्रकल्प आणि इतर अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे, त्यामुळे GRIHA - 5 स्टार रेटिंग देखील पूर्ण केले आहे. या विमानतळामुळे या प्रदेशातील दळणवळण सुधारून पर्यटन, व्यवसाय उद्योग आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळेल.

***

JPS/M.Pange/S.Patil/T.Pawar/V.Yadav/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1991800) Visitor Counter : 203