रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
धुक्यामुळे कमी झालेली दृश्यमानता लक्षात घेत राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते प्राधिकरणाने रस्ते सुरक्षिततेसंदर्भात हाती घेतल्या उपाययोजना
Posted On:
30 DEC 2023 3:02PM by PIB Mumbai
हिवाळा सुरू झाल्यामुळे या दिवसांमध्ये धुक्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील दृश्यमानता कमी होत असते, हे लक्षात घेत, राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते प्राधिकरणाचे (NHAI) अध्यक्ष संतोष कुमार यादव यांनी प्राधिकरणाच्या क्षेत्रिय कार्यालयांना विविध उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने राष्ट्रीय महामार्गांवरून जाणाऱ्यांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण होत असतो, या उपाययोजनांमुळे महामार्ग वापरकर्त्यांची सुरक्षा धोक्यात आणणारे संभाव्य अपघात टाळण्यास मदत होईल.
धुके असताना रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठीच्या उपायांचे, अभियांत्रिकी उपाय आणि सुरक्षा जागरूकता उपाय अशा दोन भागात वर्गीकरण केले आहे. ‘अभियांत्रिकी उपायांमध्ये’ गहाळ/खराब झालेली रस्त्यांवरील चिन्हे पुन्हा उभारणे, फुटलेली किंवा अपुरी पदपथ चिन्हे पूर्ववत करणे, चकचकीत दिशा संकेतांक, दुभाजक चिन्हे प्रदान करून सुरक्षा उपकरणांची दृश्यमानता वाढवणे, वस्ती तसेच अपघात प्रवण ठिकाणी आडवे दिशासंकेतक प्रदान करणे यांचा समावेश आहे. तसेच बांधकाम अपूर्ण असलेल्या भागांतील आणि धोकादायक ठिकाणी मध्यभागी उघड्यावर कार्यरत दिशा संकेतांक व्यवस्थित असल्याची खात्री करणे, वळण असलेल्या आणि रस्ते विलीन होणाऱ्या ठिकाणी खराब झालेले धोक्याचे चिन्ह बदलणे, अशा उपाययोजनांचाही यांत समावेश आहे
त्याचप्रमाणे, रस्ते सुरक्षा जागरूकता उपायांमधे महामार्ग वापरकर्त्यांना दृश्यमानतेच्या कमी झाल्याबद्दल सावध करण्यासाठी पावले उचलणे महत्वाचे आहे. या उपायांमध्ये ‘धुके पसरल्यामुळे सावधानतेचा इशारा (फॉगी वेदर अलर्ट’) आणि वेग मर्यादेचे संदेश प्रदर्शित करण्यासाठी बदलणारी संदेश चिन्हे (व्हेरिएबल मेसेज साइन्स, व्हीएमएस) किंवा इलेक्ट्रॉनिक साइनेजचा वापर, समाविष्ट आहे. धुके असलेल्या भागात ताशी 30 किमी वेगाने वाहन चालवण्याबाबत प्रवाशांना सार्वजनिक सावधानतेचा इशारा देणाऱ्या यंत्रणेचा (पब्लिक अॅड्रेस सिस्टीम) वापर करणे, टोल प्लाझाच्या ठिकाणी सार्वजनिक सेवांच्या घोषणांसाठी इलेक्ट्रॉनिक होर्डिंग, रेडिओ आणि समाज माध्यमांचा वापर, धुक्याच्या परिस्थितीत रस्त्यांलगत विशेष सुविधा करणे आणि महामार्गावरील वाहनांच्या पूर्ण रुंदीवर रिफ्लेक्टिव्ह टेप बसवणे, इत्यादी बाबींचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त, प्राधिकरणाने क्षेत्रीय कार्यालयांना महामार्गावरील दृश्यमानतेचे मूल्यांकन करण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार अतिरिक्त उपाययोजना करण्यासाठी संभाव्य ठिकाणे निश्चित करण्यासाठी प्राधिकरणाचे अधिकारी, बिगर सरकारी अभियंते, सवलती देणारे /कंत्राटदार यांचा समावेश असलेल्या चमूद्वारे प्रत्येक आठवड्याला रात्रीच्या वेळी महामार्गाची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, दाट धुके असलेल्या भागांजवळील महामार्गांवर गस्त घालणारी वाहने उभी केली जातील. महामार्गावर देखरेख करणारे पथक अपघाताच्या वेळी रहदारीला मार्गदर्शन करण्यासाठी लाल/हिरव्या ब्लिंकिंग बॅटन घेऊन जाईल आणि स्थानिक कायद्याची अंमलबजावणी करेल तसेच रुग्णवाहिका सेवा आणि महापालिका अधिकारी यांच्यासोबत अविरत सेवा सहकार्य प्रस्थापित करेल. धुक्याशी संबंधित आपत्कालीन परिस्थितीत कार्यक्षम समन्वय सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते प्राधिकरणाची पथके संयुक्त कवायती आणि सराव देखील करतील.
राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते प्राधिकरण हिवाळ्यात राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासातील जोखीम कमी करण्यासाठी तसेच राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांसाठी सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक ती पावले उचलण्यासाठी वचनबद्ध आहे.
***
M.Pange/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1991754)
Visitor Counter : 104