राष्ट्रपती कार्यालय
भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा, भारतीय महसूल सेवा (सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर) आणि भारतीय सांख्यिकी सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेट
Posted On:
26 DEC 2023 1:20PM by PIB Mumbai
भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा, भारतीय महसूल सेवा (सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर) आणि भारतीय सांख्यिकी सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी आज (26 डिसेंबर 2023) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.
परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, शासन व्यवस्थेतील महत्त्वाच्या पदांवर असताना जनसेवा त्यांना देशाची सेवा करण्याची संधी देईल. ते त्यांच्या संबंधित क्षेत्रामध्ये अभिनव , स्मार्ट आणि नागरिक-केंद्रित कामकाजाद्वारे भारताच्या विकास यात्रेत मोठे योगदान देऊ शकतात. त्यांच्या कृती आणि निर्णयांचा सर्व नागरिकांच्या जीवनावर प्रभाव पडेल हे लक्षात ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला. प्रत्येकजण आपल्या कामात जी सचोटी, कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा दाखवतो , तो आपल्या लोकांच्या विकासाचा वेग निश्चित करण्यात मोठी भूमिका बजावेल असे त्या म्हणाल्या.
भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवेतील अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की त्यांनी जनतेच्या विश्वासाचे संरक्षक आणि आर्थिक विवेकाचे रक्षक म्हणून काम करणे अपेक्षित आहे. निर्णय घेताना आणि कृती करताना त्यांनी नेहमी सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्षता या मूल्यांचे पालन केले पाहिजे. गेल्या काही वर्षांत शासनव्यवस्थेत आपले स्थान मजबूत केले आहे अशा संस्थेचा भाग असल्याचा त्यांना अभिमान वाटला पाहिजे असे त्या म्हणाल्या. हा समृद्ध वारसा पुढे नेणे हे त्यांच्यासारख्या तरुण अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे.
भारतीय महसूल सेवेच्या (सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर) अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, त्यांच्याकडे प्रशासन आणि विविध शुल्क आणि कर संकलनाचे काम सोपवले जाईल. कार्यक्षमतेने ही विविध कामे करण्यासाठी, त्यांना सर्व क्षेत्रातील ताज्या घडामोडींची अद्ययावत माहिती असणे आणि इतर सेवा आणि विभागांच्या अधिकार्यांच्या सहकार्याने काम करणे आवश्यक आहे.
भारतीय सांख्यिकी सेवेतल्या अधिकार्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, धोरणे आखणीपासून ते कार्यक्रम आणि योजनांच्या फलिताचे विश्लेषण करण्यापर्यंतच्या सर्व कामांसाठी डेटा किंवा सांख्यिकी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक तंत्रांचा वापर करून अचूक आणि उच्च दर्जाचा डेटा संच तयार करण्याची गरज आहे. असंख्य माध्यमांद्वारे माहितीच्या वाढत्या उपलब्धतेमुळे, विश्वासार्ह आणि अचूक आकडेवारीचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. आयएसएस अधिकाऱ्यांनी अधिकृत आकडेवारी संकलित करण्यासाठी आणि सर्वेक्षण कामांचे व्यवस्थापन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता , बिग डेटा, डेटा सायन्स आणि इतर विविध क्षेत्रातील आधुनिक पद्धती वापरणे आवश्यक आहे.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -
***
S.Bedekar/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1990458)
Visitor Counter : 92